मंत्रिमंडळ सचिव पद हे केंद्र सरकारमधील फार महत्त्वाचे पद असते. विशेष म्हणजे सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका असते. मंत्रालयांमधील समन्वय राखणे, त्यांच्यातील मतभेद दूर करणे व सचिवांच्या स्थायी समितीत विविध विषयांवर मतैक्य घडवून आणणे ही महत्त्वाची कामे त्यांना करावी लागतात. या पदावर अलीकडेच ऊर्जा सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते अजित सेठ यांची जागा घेतील.
नवे मंत्रिमंडळ सचिव सिन्हा हे उत्तर प्रदेश केडरचे १९७७च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांना मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जुलै २०१३ पासून ते ऊर्जा खात्याचे सचिव होते. त्यापूर्वी त्यांनी जहाज बांधणी खात्यात सचिव म्हणून काम केले आहे. १९७७ च्या तुकडीतील सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांची नेमणूक करताना सेवाज्येष्ठतेचे तत्त्व वापरले आहे यात शंका नाही. सिन्हा यांचा जन्म १८ जुलै १९५५ रोजी झाला. त्यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्या कार्यकालाबाबत सरकारने काही म्हटले नसले तरी सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळ सचिवांना दोन वर्षांचा कालावधी दिला जातो. यापूर्वीचे मंत्रिमंडळ सचिव सेठ व के. एम. चंद्रशेखर यांना मुदतवाढ देण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चार वर्षे काम करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत सर्वाधिक काळ मंत्रिमंडळ सचिव राहणाऱ्यांमध्ये बी. डी. पांडे हे एकच आहेत ते १९७२ ते १९७७ मध्ये मंत्रिमंडळ सचिव होते. नवे मंत्रिमंडळ सचिव सिन्हा हे अगदी सुरुवातीला अलाहाबादचे साहाय्यक जिल्हाधिकारी, नंतर आग्रा येथे जिल्हाधिकारी होते. २०१३ मध्ये ते ऊर्जा सचिव झाले. तेल  व नैसर्गिक वायू व युवक कामकाज खात्यातही त्यांनी काम केले आहे. सिन्हा हे मृदुभाषी आहेत, त्यांचा कामाचा झपाटा मोठा आहे. प्रतिमा स्वच्छ आहे. चटकन व अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. उच्च अधिकारी असूनही ते कधी आवाज चढवत नाहीत,  पण पूर्ण विचारांतीच निर्णय घेतात. एखादा विषय जरुरीपेक्षा जास्त ताणण्याची त्यांना सवय नाही. विशेष म्हणजे ऊर्जा, बंदरे व पेट्रोलियम या खात्यांत त्यांनी पायाभूत प्रकल्प वेगाने पुढे नेले आहेत. जहाज उद्योग सचिव असताना त्यांनी पूर्वी केवळ तीन प्रकल्प झालेले असताना २०१३ या एका वर्षांत बंदरांसाठीचे २१ पायाभूत प्रकल्प सुरू केले, त्यामुळे त्यांची नेमणूक सरकारला अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यात उपयोगी पडेल यात शंका नाही.