अमिताभ बच्चन हा ‘अँग्री यंग मॅन’ जंजीर (१९७३) या चित्रपटातून भारतीय मध्यमवर्गाला मिळाला, त्याच्या आधीपासून ते आतापर्यंत, कधीही ‘अँग्री’ न होणारा एक ‘ओल्ड मॅन’ याच मध्यमवर्गाच्या सोबतीला होता. कधीही न रागावता, अंगभूत मिश्कीलपणा कायम ठेवून आल्या प्रसंगाला सामोरे जाणारे हे पात्र म्हणजे ‘चाचा चौधरी’. या चाचांच्या फेटय़ाचा आणि मिशीचा आब टिकून राहिला तो चाचांचा दोस्त (गुरूग्रहाकडून अतिमानवी शक्ती घेऊन आलेला पैलवान) साबू याच्यामुळे.. आणि त्याहीपेक्षा, छापील चित्रकथांमधल्या (कॉमिकमधल्या) या दोघाही पात्रांचे जन्मदाते, व्यंगचित्रकार व लेखक प्राणकुमार शर्मा यांच्यामुळे.
‘प्राण’ एवढय़ाच नावाने १९६० पासून शर्मा परिचित होते. ‘चाचा चौधरी’ प्रथम अवतरले ते १९६९ साली ‘लोटपोट’नावाच्या कॉमिक मासिकातून. परंतु १९७१ पासून चाचा चौधरी आणि साबू यांची निराळी कॉमिक-पुस्तके काढणे ‘डायमंड कॉमिक्स’ने सुरू केले. चाचा चौधरी हे खऱ्या अर्थाने ‘आधुनिक भारतीय’ कॉमिक पात्र, म्हणून प्राण यांचे ‘भारताचे वॉल्ट डिस्ने’ असे कौतुक अमेरिकेतील कॉमिक-विश्वकोशाने केले.  फाळणीअगोदर, १९३८ साली लाहोरनजीकच्या कसूर गावी जन्मलेल्या आणि तेथील सारे सोडून दिल्लीस आलेल्या प्राण यांनी पंचविशी गाठेपर्यंत अनेक फाळणीग्रस्तांचे संसार बहरलेले पाहिले, भारतात प्रगती होऊ शकते यावर विश्वास बसण्याचा काळ पाहिला आणि त्याच वेळी मध्यमवर्गाचे दैनंदिन जगणेही पाहिले. हे जगणे रोजच्या साध्या साध्या प्रश्नांशी झुंजणारे.. आपल्या कुवतीबाहेरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून झापडे ओढणारे.. हे सारे प्राणकुमार शर्मा यांनी वयाची तिशी गाठेपर्यंत नक्की पाहिलेले होते. ‘आम्हाला आधी वडीलधाऱ्यांचा धाक होता, आता पोरांचा’ असे म्हणणारी ‘श्रीमतीजी’ शीला, लेटमार्क टाळण्याची धडपड रोज फोल ठरणारा तिचा नवरा किशोर हे जोडपे तर प्राण यांच्या समाजनिरीक्षणांची खूण पटवणारे. पण याच समाजाला रिझवण्यासाठी माफक स्वप्नरंजनाचीही गरज असते, त्या स्वप्नरंजनातून व्यवस्थेवरला विश्वास शाबूत राहिला तर उत्तमच, हा हेतू त्यांच्या चाचा चौधरी आणि साबू चित्रकथांतून वारंवार दिसतो. प्राण यांचा मानसपुत्र बिल्लू, मानसकन्या पिंकी हेही, मध्यमवर्गीय मुलांच्या आशाआकांक्षा दाखवून देतात. या साऱ्या पात्रांची मिळून ५०० पुस्तके निघाली, ती १० भारतीय भाषांत २० लाखांहून अधिकांनी वाचली.  
आपल्या हयातीत प्राण यांना स्वत:बद्दलचे गंभीर लिखाण आवडले नसते.. पण ‘चाचा चौधरी का दिमाग कम्प्यूटर से भी तेज चलता है’ हे मान्य करायला लावणारा हा अवलिया ‘समाजशास्त्रज्ञ से तेज’ होता!