News Flash

प्रस्थान त्रयी

भारताच्या तत्त्वचिंतक वाङ्मयात पवित्र व भारदस्त वाङ्मय म्हणून प्रस्थान त्रयीला मोठा मान असून अनेक मोठमोठय़ा पंडितांच्या विद्वत्तेला प्रस्थान त्रयीवर भाष्य केल्यावरच मान्यता प्राप्त झालेली आहे.

| March 16, 2015 12:16 pm

भारताच्या तत्त्वचिंतक वाङ्मयात पवित्र व भारदस्त वाङ्मय म्हणून प्रस्थान त्रयीला मोठा मान असून अनेक मोठमोठय़ा पंडितांच्या विद्वत्तेला प्रस्थान त्रयीवर भाष्य केल्यावरच मान्यता प्राप्त झालेली आहे. प्रस्थान त्रयीने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध काही केलेले नसून ते फक्त सांगितलेले आहे. ईश्वर आहे, आपण त्याची उपासना केली पाहिजे ही तिची मते आहेत. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, म्हणून तर बुद्धिप्रामाण्यवाद्यांना  ते पटत नाही.

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानांतील व जनमनांतील ‘ईश्वर-अस्तित्व-समर्थक मताचे’ सारसर्वस्व ‘प्रस्थान त्रयीत’ आहे असे मानले जाते. या त्रयीत ‘उपनिषदे’ हे पहिले व मूलाधार असे प्रस्थान असून त्याच्याविषयी काही माहिती आपण मागील एका प्रकरणात घेतलेली आहे. यासाठी काही जण दशोपनिषदे म्हणजे दहा, तर काही जण तेरा किंवा अठरा उपनिषदे मानतात. ते राहो. दुसरे प्रस्थान ‘ब्रह्मसूत्रे’ म्हणजेच ‘वेदांतसूत्रे’ हे असून त्याची रचना बादरायणाचार्य ऋषीने केली असे मानले जाते आणि तिसरे प्रस्थान गीता किंवा भगवद्गीता हे आहे. भारताच्या तत्त्वचिंतक वाङ्मयात पवित्र व भारदस्त वाङ्मय म्हणून प्रस्थान त्रयीला मोठा मान असून अनेक मोठमोठय़ा पंडितांच्या विद्वत्तेला प्रस्थान त्रयीवर भाष्य केल्यावरच मान्यता प्राप्त झालेली आहे. प्राचीन उपनिषदांच्या रचना इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १००० पर्यंत झाल्या असाव्यात. सर्वात प्राचीन उपनिषदांनंतर दोन-चार शतकांनी ब्रह्मसूत्रे रचली गेली असावीत व ब्रह्मसूत्रांनंतर लवकरच केव्हा तरी, पण इ.स.नंतरच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात गीतेची रचना झाली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. व्यासरचित ‘जय’ या मूळ महाभारतात गीता नव्हती व ती फार उशिरा त्यात पडलेली भर आहे, असे तज्ज्ञ संशोधकांचे म्हणणे आहे.
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नासदीय सूक्तात जगाचा निर्माणकर्ता व अध्यक्ष सृष्टीच्या बाहेर उच्चतम आकाशात राहतो, अशी स्पष्ट कल्पना आलेली आहे; पण वेदांतकालीन तत्त्ववेत्त्यांनी ही कल्पना सोडून दिली व ईश्वर विश्वातच सामावलेला आहे व तो अणुरेणूत समाविष्ट आहे, अशी कल्पना मांडली. तसे पाहता ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तात ‘विश्वाची सर्व भूमी व्यापून ईश्वर दहा बोटे शिल्लक उरला आहे’ अशी कल्पना झालेली आहे, तर तो ईश्वर अणुरेणूंत भरलेला आहे, ही कल्पना प्रस्थान त्रयीने एकमुखाने उचलून धरली. याबाबत विशेष हे की, ‘ईश्वर विश्वाच्या अणुरेणूंत भरलेला आहे, ही कल्पना जगात फक्त भारतीय (हिंदू) तत्त्वज्ञानातच आहे. अमर आत्मा, ब्रह्मरूप ईश्वर, ‘आत्मा व ब्रह्म यातील अद्वैत व अखेरीस आत्म्याला मोक्ष’  या सर्व कल्पना आधी उपनिषदांनी, नंतर ब्रह्मसूत्रांनी व त्यानंतर गीतेने हिंदू जनमनावर ठसविल्या आहेत.
ब्रह्मसूत्राचा उद्देश ‘ईश्वराचा शोध’ असा आहे व तो त्या ग्रंथाच्या पहिल्याच वाक्यात ‘अथा तो ब्रह्मजिज्ञासा’ असा आलेला आहे. ब्रह्मसूत्रात ईश्वर असा शब्द वापरलेला नाही. ब्रह्म म्हणजेच ईश्वर. दोहोत काही फरक नाही, तर अशा ईश्वराचा शोध घेताना ब्रह्मसूत्रांनी हिंदूंची षड्दर्शने विचारात घेतली असे मानले जाते; पण प्रत्यक्षात असे दिसते की, सांख्य, वैशेषिक व पूर्वमीमांसा ही तीनही दर्शने जी वेदांना मानणारी, पण निरीश्वरवादी आहेत त्यांना ब्रह्मसूत्रांनी काहीही महत्त्व दिले नाही. तसेच जैन व बौद्ध या नास्तिक तत्त्वज्ञानांचाही त्यांनी नावाने कुठे उल्लेख केलेला नाही. त्याचप्रमाणे चार्वाकांचे देहात्मवादी मत त्यांनी खोडून काढले असे मानले जाते. बरोबरच आहे. यांना आत्म्याचे गुणगान गायचे होते व चार्वाकांना आत्माच मान्य नव्हता. तसेच ब्रह्मसूत्रे तर्काधारित नाहीत, असे नक्कीच म्हणता येते, कारण फक्त ‘श्रुतीला (वेदांना) विरोधी नसलेला तर्कच त्यांना मान्य होता. चार्वाकांचा ‘खुला तर्क’ त्यांना मान्य नाही.
उपनिषदांतील ईश्वरविषयक उल्लेख सारांशाने असे आहेत. ‘हे सर्व जग ब्रह्ममय (ईश्वरमय) आहे. ब्रह्मातच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय होते. हे जाणून शांतचित्ताने, त्याची (ब्रह्माची) उपासना करावी. वाणी व मन जेथे पोहोचू शकत नाही, असा हा आत्मा (ब्रह्म) आनंदमय आहे, तो निर्भय आहे. हा सूक्ष्म आत्मा फक्त मनालाच कळतो. ते ब्रह्मच पुढेमागे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे, खाली, वर व सर्वत्र पसरलेले आहे. हे सर्व जग ब्रह्मच आहे. तशी गीता ही ब्रह्मसूत्रानंतरची असली तरी जवळजवळ समकालीन असावी, असे विद्वान म्हणतात; परंतु गीता प्रवृत्तीमार्गी आहे व ब्रह्मसूत्रे निवृत्तीमार्गी आहेत, असा दोहोत फरक आहे.
प्रस्थान त्रयीने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध केलेले आहे असे अनेक जण मानतात; पण आम्हा निरीश्वरवाद्यांना, बुद्धिप्रामाण्यवाद्यांना ते काही पटत नाही. म्हणून ‘ईश्वराचा शोध’ या शंकरराव सावंतरचित ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीतून प्रस्थान त्रयीचे सिद्धान्त म्हणून जे मांडलेले आहेत ते इथे सारांशाने पाहू या.
१) आत्मा, ईश्वर, ब्रह्मन या वेगवेगळ्या संकल्पना नसून चित्शक्तीचे ते निरनिराळे नामोल्लेख आहेत. २) आत्मा अणूपेक्षा सूक्ष्म व विश्वापेक्षा मोठा आहे. ३) आत्मा शरीरविरहित आहे. (४) आत्मा वाचा, मन, नेत्र अशा इंद्रियांकडून जाणला जात नाही. (५) तो तर्कानेही जाणला जात नाही (६) मानवी हृदयात वास करीत असला तरी आत्मा सुखदु:खाचा वाटेकरी नाही. (७) जीवात्मा परमात्म्याचाच अंश आहे. ते एकच आहेत. (८) ईश्वर जगरहाटीत उदासीन असतो. तो कुणाचे पाप अगर पुण्य घेत नाही. (९) यामुळे जगात जी विषमता व क्रौर्य दिसते, त्याचा दोष ईश्वरावर येत नाही. (१०) ईश्वर ज्याच्यावर प्रसन्न होतो, त्याच्यासमोर तो आपणहून प्रकट होतो. (११) आत्मा अमर आहे व तो ‘जन्म न पावलेला’ आहे. (१२) तुम्ही ज्याची उपासना करता ते ब्रह्म नव्हे. ब्रह्म त्यापेक्षा वेगळे आहे. (१३) ज्ञान कर्म समुच्चयाच्या तत्त्वानुसार वागा व त्यागी वृत्तीने जगाचा उपभोग घ्या. (१४) ईश्वर मूर्तीत नाही, परंतु मूर्तीकडे ईश्वर या दृष्टीने पाहिल्यास मात्र तिथे ईश्वर दिसेल. तर मला असे वाटते की, प्रस्थान त्रयीने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध काही केलेले नसून ते फक्त सांगितलेले आहे. ईश्वर आहे, आपण त्याची उपासना केली पाहिजे ही तिची मते आहेत. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, म्हणून तर आम्हाला ते पटत नाही.
ज्या आद्य शंकराचार्याना (केरळ, इ.स. ७८८ ते ८२०) भारतात हिंदू धर्म पुनरुत्थानाचे श्रेय सामान्यत: दिले जाते, त्यांनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षांपासून, रस्ते, वाहने नसलेल्या त्या कठीण काळात, भारतभर प्रवास करून, विद्वानांना वादात जिंकून, आपल्या शिष्यपरंपरा व मठस्थापना केल्या. शृंगेरी, द्वारका, बद्रिनारायण व जगन्नाथपुरी अशा भारताच्या चार दिशांना चार मठांच्या स्थापना त्यांनी केल्या. जैन व बौद्ध धर्माचा प्रभाव स्थापित झालेल्या त्या काळात त्यांनी जनमनावर प्रचंड प्रभाव पाडला. शंकराचार्याच्या नंतरही आजपर्यंत प्रस्थान त्रयीवर अनेक विद्वानांनी आपापली भाष्ये केली आहेत; त्यात त्यांची (शंकराचार्याची) काही मते विवाद्य ठरलेली आहेत; तरीही त्यांचे मोठेपण मात्र कुणीही नाकारीत नाही.
शंकराचार्याची वादग्रस्त ठरलेली तीन मते इथेच पाहू या. पहिले उदाहरण हे की, गीतेने ‘संन्यास’ (म्हणजे कर्मसंन्यास किंवा ज्ञानयोग) आणि कर्मयोग, हे दोन्ही मार्ग ‘मोक्षपद’ आहेत; पण त्या दोहोत कर्मयोग श्रेष्ठ आहे, असे स्पष्ट सांगितलेले असूनही शंकराचार्यानी गीतेच्या या स्पष्ट उल्लेखाला ‘अर्थवादात्मक’ म्हणजे ‘पोकळ स्तुतीने भरलेला’ असे ठरविले आणि आपल्या वादविवादपटुत्वाने किंवा वकिली कौशल्याने म्हणा चक्क विरोधी मत गीतेच्या नावाने खपविले. शंकराचार्य स्वत: कृतिशील कर्मयोगी असूनही, त्यांनी कर्मसंन्यास मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग हाच मुक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, असे सांगितले. शंकराचार्याच्या पुढील काळातील सर्वच विद्वानांना गीतेचा असा कर्मसंन्यासपर अर्थ मान्य नसून कर्मपर अर्थ मान्य आहे.
दुसरे उदाहरण म्हणून ‘ईश्वर’ आणि ‘ब्रह्म’ या दोन संकल्पना समानार्थी आहेत, की त्यात काही फरक आहे हा मुद्दा घेऊ या. वास्तविक ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि ओम हे चारही शब्द वेदांनी नव्हे, तर फक्त उपनिषदांनी अनेक वेळा वापरलेले आहेत. त्यात आत्मा हा शब्द शरीर, जीवात्मा व ब्रह्म अशा वेगवेगळ्या अर्थानी वापरलेला असून ‘ईश्वर, ब्रह्म आणि ओम’ हे तीन शब्द अगदी समानार्थी वापरलेले आहेत. उपनिषदांची ईश्वर ही कल्पनाच मुळी ब्रह्म स्वरूपाची असून तीच व्यक्त करण्यासाठी त्यांनी ओम ही संज्ञा वापरलेली आहे. तेव्हा खरे तर ईश्वर आणि ब्रह्म यात काही फरक नाही; पण शंकराचार्यानी असे निराधार मत मांडले की, भक्तीने प्राप्त होणारा ‘सगुण ईश्वर’ लहान असून, फक्त ज्ञानमार्गाने प्राप्त होऊ शकणारे ‘निर्गुण ब्रह्म’ ही त्याहून मोठी संकल्पना आहे.
तिसरे उदाहरण म्हणून शंकराचार्याचा ‘ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या, जीवो ब्रrौव नापर:’ हा सुप्रसिद्ध सिद्धान्त घ्या. यातील ब्रह्म सत्य आहे हे पहिले व ‘जीव हे वेगळे काही नसून ब्रह्मच आहे’ हे दुसरे, ‘सजीव विश्वाची एकात्मता सांगणारे पद’ म्हणून ठीक म्हणू या; पण मधले पद म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे जग मात्र खोटे, मिथ्या किंवा माया आहे हे कसे बरोबर म्हणता येईल? मिथ्याचा अर्थ ‘अशाश्वत’ असा घेतला तरी ते बुद्धाच्या अनित्यतावादाचेच एक स्पष्टीकरण होईल, तर मग जगाला मिथ्या, माया, खोटे म्हणायचे हे कुठल्या ओढूनताणून आणलेल्या अर्थाने तरी पटेल काय?
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2015 12:16 pm

Web Title: prasthana trayi
टॅग : Hinduism
Next Stories
1 स्मृतिपुराणे
2 धर्मसूत्रे
3 चार्वाक दर्शन
Just Now!
X