मेक्सिकन दिग्दर्शक आलेहान्द्रो इनारितू ‘ऑस्कर’ सोहळ्यात ‘बर्डमॅन’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक ठरणे, या चित्रपटाची प्रसिद्धीहवा सुरू झाली, तेव्हाच पक्के झाले होते. दक्षिण अमेरिकेतील या दिग्दर्शकाने करून ठेवलेल्या कामाचा दबदबा जगभर झिरपण्याची प्रक्रिया अद्याप थांबलेली नाही. ‘आमोरेस पेरोस’ या त्याच्या चित्रपटाचा आधार घेऊन आपल्याकडे ‘युवा’ नावाचा (अन् गंमत म्हणजे उगाच प्रवाहपतित वगैरे गणला गेलेला) सिनेमा आला होता. ‘आमोरेस पेरोस’, ‘ट्वेंटीवन ग्रॅम्स’ आणि ‘बॅबल’ या मृत्युचित्रत्रयी यापूर्वी ऑस्करवर धडकल्या होत्या; पण तेव्हा त्यांना मान्यता देणारी वेळ आली नव्हती. गायल गार्सिया बर्नाल, बेनिशिओ डेल टोरो आदींसह डझनभर कलाकारांचा करिअरग्राफ उंचावणारा आणि चित्रपटातील कथानिवेदनाच्या संकल्पनांमध्ये संपूर्णपणे नव्या आराखडय़ांचा प्रवाह तयार करणारा दिग्दर्शक म्हणून इनारितू सिनेतक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेच.
ऐन तारुण्यात मालवाहू बोटीवर काम करीत युरोप, आफ्रिकेतील राष्ट्रांत झालेल्या प्रवासातून या दिग्दर्शकाचा दृश्यअभ्यास पक्का झाला. पुढे पारंपरिक शिक्षणाच्या आधाराने त्याने रेडिओ आणि संगीतात बस्तान बसविले. २००० नंतर स्थानिक चित्रसंस्था उभारून शॉर्ट फिल्म्स, टीव्ही मालिकांची निर्मितीही सुरू केली. पहिल्याच ‘आमोरेस पेरोस’पासून त्याचा पुढचा प्रत्येक सिनेमा हा साहित्य, संगीत आणि कला यांचा अद्भुत मिलाफ साधणारा ठरला. भूत-वर्तमान-भविष्याचा अवघड खेळ करणारा २१ ग्रॅम्स किंवा तीन खंडांतील चार देशांमध्ये एकसंध कथानक घडविणारा बॅबल आदी चित्रपटांनी मुख्य प्रवाहात नसूनही या दिग्दर्शकाला अनंतासमान आदर मिळवून दिला. त्याचीच परिणती म्हणजे ‘बर्डमॅन’सारख्या प्रायोगिक चित्रपटात हॉलीवूडच्या यच्चयावत श्रेष्ठ कलावंतांची पंगत कसदार भूमिका ओरपून घेण्यासाठी एकत्रित बसली. बॅटमॅनच्या भूमिकेने १९८९ साली तारांकित अवस्था उपभोगून झाल्यावर अनेक वर्षे यशोशिखराच्या तळाजवळच भरकटलेल्या मायकेल किटनपासून सध्या कलात्मक व व्यावसायिक या दोन्ही सिनेमांतील अभिनयांत चलनी नाणी असलेल्या कलाकारांना ‘बर्डमॅन’च्या ताफ्यात अचूक गुंफण्याची भूमिका इनारितूने बजावली आहे. कलाकार, त्याची ‘मास्टरपीसी’ भूमिका, त्याच्या सामान्य जगण्याला त्या भूमिकेने आयुष्यभरासाठी लावलेले ग्रहण आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या कैक प्रश्नांची उत्तरे इनारितूने ‘बर्डमॅन’च्या फॅण्टसी-वास्तवमिश्रित अंगाने सहजपणे दिली आहेत.जिंकण्यासाठीच हॉलीवूडच्या मुख्य धारेत शिरकाव केलेल्या इनारितूची ही नवी सुरुवात आहे.