परंपरांचा आत्ताच्या समकालीन समाजावर होणारा परिणाम टिपणारे कादंबरीकार पेरुमल मुरुगन हे आता मेले.. यापुढे पी. मुरुगन हे आपले पगारी काम नीट पार पाडणार आहेत. लेखकाचा हा मृत्यू काही आकस्मिक वगैरे समजण्याचे कारण नाही. जे झाले, ते सारे भारतीय झुंडसंहितेला धरूनच झालेले आहे..

लेखक पेरुमल मुरुगन मेले ते बरे झाले! त्यांनी आत्महत्या केली. तेही बरेच झाले. त्यांनी फारच जगण्याचा हट्ट धरला असता, तर कोणाला तरी त्यांचा वध करावा लागला असता. ते टळले. तसे त्यांच्या जगण्याचेही प्रयोजन राहिलेले नव्हतेच. मुळातच एकेकटय़ा माणसाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आपण ठेवलेलाच नाही. तो केव्हाच रद्दबातल केला आहे. अद्याप तसा कायदा झालेला नाही. वटहुकूमही निघालेला नाही. पण समूहाचा कायदा राज्यघटना आणि दंडसंहिता वगरेंहून अधिक महत्त्वाचा ठरतो. त्या भारतीय झुंडसंहिते (भाझुंसं)नुसार एकेकटय़ा व्यक्तीचा असण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यातही ती व्यक्ती विचारवंत, कलावंत, साहित्यिक अशा दर्जाची असेल तर त्यांना तातडीने आपला मेंदूमृत्यू घोषित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुळात कोणत्याही व्यक्तीकडे एकाहून अधिक मेंदू असणे हा भाझुंसंनुसार गुन्हा आहे. लहान मेंदूने काम भागत असताना मोठय़ा मेंदूची चन करण्याचे कोणालाही कारण नाही. पेरुमल मुरुगन यांना त्याचीच शिक्षा मिळाली. त्यांनी देहान्त प्रायश्चित्त घेतले.
येथे अनेकांना हा प्रश्न पडला असेल की कोण होते हे पेरुमल मुरुगन? वस्तुत: अशा मुरुगनांची ओळख स्वच्छ पुसणे हेच यापुढील आपले राष्ट्रीय अभियान असताना त्यांच्या स्मृतींना िपड देण्याची काहीही गरज नाही. परंतु विचार करू पाहणारांना जनसमूहाची जरब बसावी म्हणून ते सांगितलेच पाहिजे. पेरुमल मुरुगन हे एक लेखक होते. तामिळनाडूतील नमक्कल हे त्यांचे गाव. तेथील सरकारी कला महाविद्यालयात प्राध्यापकी हा त्यांचा पेशा. एक-दोन विद्यापीठीय प्रबंध लिहून एखाद्या राजकीय नेत्याच्या बंगल्याची दारे सातत्याने पुजून सहजी कुलगुरुपदापर्यंत पोहोचण्याची मनीषा सोडून साहित्यलेखनाची अवदसा सुचण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. पण त्यांनी सात कादंबऱ्या लिहिल्या. ते कथा-कविताही करतात. तामिळनाडूच्या पश्चिमेकडील दहा जिल्ह्यांचा भाग म्हणजे कोंगुनाडू. तेथील कोंगू या बोलीभाषेचा शब्दकोश तयार करण्याचे कामही त्यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजीत भाषांतरित झाल्या आहेत. मधोरुबागन ही त्यांपकी एक. चार वर्षांपूर्वी त्यांनी ती लिहिली. गेल्या डिसेंबरात पेंग्विन प्रकाशनाने ती इंग्रजीत आणली. ही कादंबरी तमिळमध्ये होती तोवर बहुधा ठीक होते. पण ती इंग्रजीत आली आणि कोंगुनाडूमधील आबालवृद्धांच्या भावनांना ठेच लागली. नमक्कलमध्ये वेल्लाल गौंडूर ही क्षत्रिय कुलवतंस जात चांगलीच प्रबळ. त्या जातीतील स्त्री-पुरुषांना तर त्या कादंबरीने प्रचंड वैचारिक धक्का दिला. त्याचे निरसन करण्यासाठी मग त्यांना तेथे बंद पुकारून झुंडसामथ्र्य दाखवून द्यावे लागले. त्यांचे बरोबरच होते. वाचक-समीक्षकांनी नावाजलेल्या या कादंबरीने त्यांच्या श्रद्धेचा विनयभंग केला होता. एखाद्या पुस्तकाने वा कलाकृतीने आमच्या भावना दुखावल्या असे कोणी म्हटले की ‘त्या कशा?’ असा प्रश्न विचारायचा नसतो, अशी पद्धत आहे. पण येथे त्यास अपवाद करून सांगता येईल, की भावना दुखावण्यास सुरुवात कादंबरीच्या नावातूनच झाली आहे. मधोरुबागन म्हणजे अर्धनारीश्वर. हे शिवशंकराचे एक रूप. पुरुष आणि प्रकृतीचे एकत्व दर्शविणारे. हा अर्धनारीश्वर नमक्कलमधल्या तिरुचेंगोडचे ग्रामदैवत. तेथे दरवर्षी रथयात्रा भरते. पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत त्या यात्रेत एक सुफलनविधी चाले. जी अभागी गृहिणी आपल्या कुटुंबास वंशाचा दिवा देऊ शकत नसे, ती या यात्रेत येई. भेटेल त्या पसंतीच्या पुरुषाशी रत होई आणि कोणत्याही महिलेचा मोक्ष म्हणजे जे मातृत्व ते मिळवून जाई. हा पुरुष म्हणजे परमेश्वराचा अवतार मानला जाई आणि त्याच्यापासून होणाऱ्या वंशाच्या दिव्या-दिवटय़ांना अर्धनारी किंवा सामी पिल्लई (देवदत्त मूल) म्हणत. त्या महिलेचा पती आणि कुटुंब आनंदाने ती देवाची देणगी स्वीकारत असत. अशा प्रथा सर्वच प्राचीन समाजात असत. महाकाव्यांनी अजूनही त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. त्या आपण अर्थातच नाकारायच्या असतात किंवा त्यांच्यामध्ये कृत्रिम गर्भधारणा, मूलपेशी यांसारखे विज्ञान शोधून त्याचे ढोलताशे वाजवायचे असतात. परंतु मुरुगन यांनी ही वस्तुस्थिती जशीच्या तशी उचलली आणि त्यावरून एका विनापत्य जोडप्याची करुण कहाणी रचली. मूल नसल्यामुळे एखाद्या बाईच्या वाटय़ाला येणारे भोग आणि सामाजिक व कौटुंबिक दबाव याने त्यांच्यातला संवेदनशील लेखक अस्वस्थ झाला. त्या भरात त्यांनी तिरुचेंगोडूच्या पाश्र्वभूमीवर काली आणि पून्ना या जोडप्याची कथा रंगवली. त्यामुळे तिरुचेंगोडूची, अर्धनारीश्वराच्या यात्रेची, तेथील गौंडूर समाजाची बदनामी होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही. वस्तुस्थिती, सत्य हे बदनामीकारक असू शकते आणि ते चारचौघांत सांगायचे नसते, त्याचा वापर वाङ्मयनिर्मितीसाठी, मानवी भावभावनांच्या शोभादíशकेसाठी करायचा नसतो, धर्म आणि संस्कृतीला तर हातही लावायचा नसतो हे कळत नसेल त्या कलावंताला कलावंत म्हणून जगण्याचा अधिकारच नसतो. अखेर संस्कृतिरक्षकांनाच त्यांना झुंडसंहितेची आठवण करून द्यावी लागली.
मुरुगन हे गौंडूर समाजाचेच. पण त्यांच्याविरोधात हा समाजच पेटून उठला. सुदैवाने महाराष्ट्रातसुद्धा विजय तेंडुलकर, दया पवार, आनंद यादवांपासून भालचंद्र नेमाडेंपर्यंत अशी उदाहरणे आढळतात. जातीसाठी माती खावी हे अस्मिताभान आपण गमावले नाही ही किती गर्वाची गोष्ट आहे. मुरुगनविरोधी आंदोलनात जात तर आलीच, पण प्रश्न श्रद्धेचा असल्याने धर्मही आला. या िहदू धर्मीय लेखकांची प्रतिभा अन्य धर्मीयांबाबत कोठे गोमय खावयास जाते असा सवालही आला. साहित्यलेखन हे पत्रके लिहिण्याएवढे सोपे नसते याचे भान येथे असणे आवश्यक नव्हतेच. त्यामुळे भाजप आणि िहदू मुन्नानीचे वीर पुढे सरसावले. त्यांचा जोश असा की द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांनाही चिडीचूप बसावे लागले. वास्तविक द्रविडी चळवळीचे प्रणेते पेरियार ई व्ही रामसामींचे जन्मगाव तिरुचेंगोडूनजीकचे. ते कट्टर िहदुमूर्तिभंजक. त्यांच्याच भूमीत िहदू धर्माच्या नावाने एका लेखकाला माती देण्याचे काम सुरू असताना त्यांचा वारसा सांगणारे पक्ष गप्प बसतात याचे कारण मतांच्या राजकारणात आहे. गौंडूर हा प्रबळ समाज. त्याला दुखावून राजकारण का नासवा असे ते गणित. सत्तेपुढे आविष्कार वगरे स्वातंत्र्याला तशी काही किंमत असण्याचे कारणच नाही. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनानेही मुरुगन यांना जामले. त्या सगळ्या दबावापुढे अखेर मुरुगन यांना झुकावे लागले. त्यांनी पुस्तके जाळणाऱ्या धर्ममरतडांना लेखी माफीनामा लिहून दिला. त्यामुळे ते एवढे कोसळले की त्यांनी स्वत:च आपला लेखक म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर करून टाकले. ‘आता आपण केवळ पी. मुरुगन नावाचा शिक्षक म्हणून जगणार. यापुढे काहीही लिहिणार नाही. लिहिलेले सगळे फेकून देणार. वाचकांनी त्यांच्याकडची पुस्तके जाळून टाकावीत’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यामुळे देशातील काही लोकांना दु:ख वगरे झाले. काहींनी त्यांना, पुढचे पाऊल मागे घेतले म्हणून दोष दिला. त्यातून दोष देणारांना झुंडीचे सामथ्र्य माहीत नाही हेच दिसले. एकंदर आपण आपल्या झुंडसंहितेला अनुसरून एका लेखकाला मारले. आविष्काराचे स्वातंत्र्य तर आपल्यालाही मान्य आहे.. फक्त तो आविष्कार आपला देव, समाज आणि धर्म याविरोधात असता कामा नये. हा एक फार महत्त्वाचा संदेश यातून गेला. लेखक, कलावंत हे समाजसंस्कृतीचे निर्माते. पण संस्कृती टिकविण्यासाठी आपण त्यांचीही गय करणार नाही, हे आपण दाखवून दिले. ते बरेच झाले.