‘मी जगाच्या एका टोकावर राहतो’ असा उल्लेख २०१४ सालचे ‘मॅन बुकर पारितोषिक’ हे प्रतिष्ठेचे सन्मानचिन्ह मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार पहाटे) रिचर्ड फ्लॅनेगन यांनी केला; त्यात अजिबात अतिशयोक्ती नव्हती. त्यांच्या रोजबेरी या गावी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडल्या मेलबर्नपासून जायचे तरी दहा तास लागतात. ऑस्ट्रेलियन पार्लमेंटात अवघे पाच सदस्य पाठवणाऱ्या तास्मानिया बेटावर हे गाव, तिथेच त्यांच्या पाच पिढय़ा राहिल्या. आजोबांपर्यंत सारे अशिक्षित; मजूरच. पण वडील लष्कराच्या सेवेतले, म्हणून दुसऱ्या महायुद्धात देशाबाहेर गेले. तिथे जपान्यांनी रिचर्डच्या वडिलांना पकडून, त्या वेळच्या ब्रह्मदेशात रेल्वेमार्ग घालण्याच्या कामी जुंपले.. या रेल्वेमार्गाच्या उभारणीकाळातच, ‘द नॅरो रोड टु द नॉर्थ’ ही रिचर्ड यांची बुकर-विजेती कादंबरी घडते!
बालपणी रिचर्डसह त्याच्या दोघा भावांना पत्रकारिता, लेखन यांबद्दल कुतूहल होते. पुढे एक भाऊ क्रीडापत्रकार झाला. रिचर्ड यांनी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास केला. अगदी ऑक्सफर्डला जाऊन शिकले. तेथून परतल्यावर, कुणाकुणाची पुस्तके छुपेपणाने लिहून देण्याचेही काम केले. पर्यावरण, कला, साहित्य या क्षेत्रांमध्ये पत्रकारिताही केली. मात्र कादंबरी लिहायचीच हा ध्यास कायम ठेवला. पत्रकारितेत रुळल्यामुळे १९८५ पासून- म्हणजे पंचविशी गाठता-गाठता त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित होऊ लागली खरी, पण ती ललितेतर होती. ‘अ टेरिबल ब्यूटी- हिस्टरी ऑफ द गॉर्डन रिव्हर काउंटी’ हे अशा पाच पुस्तकांपैकी पहिले. उरलेली चारदेखील, तास्मानियाचे पर्यावरण, राजकारण यांबद्दलच होती. अखेर १९९४ साली ‘डेथ ऑफ अ रिव्हर गाइड’ ही कादंबरी प्रकाशित झाली. पाठोपाठ ‘द साऊंड ऑफ वन हॅण्ड क्लॅपिंग’ (१९९७), ‘गौल्ड्स बुक : अ नॉव्हेल इन ट्वेल्व्ह फिश’ (२००१), द अननोन टेररिस्ट (२००६) आणि ‘वाँटिंग’ (२००७) अशा कादंबऱ्याही निघाल्या. पण पुरस्कार, मानसन्मान मात्र पाचव्या कादंबरीला मिळाला.
कादंबरी हा वाङ्मय प्रकार संपत चालला आहे का वगैरे चर्चाच फजूल मानणारे रिचर्ड फ्लॅनेगन, कादंबरी या प्रकारामध्ये आजही मानवी बुद्धी, सौंदर्य जाणिवा आणि अध्यात्मभाव यांना आवाहन करण्याची पुरेपूर ताकद असल्याची ग्वाही देतात.. हा त्यांचा विश्वास तोंडदेखला नाही, अशी दाद बुकरसारख्या पुरस्कारामुळे आता मिळाली आहे. पर्यावरणप्रेम, निसर्गनिरीक्षण आणि मानवी कष्टांची जाणीव हे लेखनगुण त्यांनी पत्रकारिता, ललितेतर गद्यलेखन आणि कादंबरीलेखन अशा तिन्ही प्रकारांमध्ये सांभाळलेले आहेत.