लग्नातल्या अपेक्षाभंगातून पदरी पडलेल्या वेदनेला पवित्र मानून आयुष्यभर जखडून राहण्याचा काळ  आता राहिलेला नाही. नेमक्या याच वास्तवाचे रसभरीत वर्णन असलेली आणि स्त्रियांचे नेमके भावनांदोलन मांडणारी ही कादंबरी आहे.
मुंबई. एकाच वेळी अनेक बिरुदं मिरवणारं, अनेक वैशिष्टय़ं सांगणारं आणि अनेकांना सामावून घेणारं शहर. इथला प्रत्येक घटक आपलं खास वैशिष्टय़ जपणारा. त्यामुळेच इथल्या प्रत्येक घटकाने छापील आणि दृक्श्राव्य माध्यमांमध्येही स्थान मिळविलेले दिसते. मुंबईचा व्यापारी, मुंबईचा उद्योजक, मुंबईची तरुणाई, इतकंच काय तर मुंबईच्या डबेवाल्यानेही माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र आजपर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या एका घटकाकडे आता वाचकांचे लक्ष वेधले आहे ते लेखिका माधुरी बॅनर्जी यांनी ‘स्कॅण्डलस् हाऊसवाईव्हस्’ या कादंबरीद्वारे.
बदलत्या आíथक-सामाजिक वातावरणाचा, आपल्या हाताच्या बोटांवर येऊन बसलेल्या वेगवान तंत्रज्ञानाचा sam06आणि माध्यमांच्या उपभोगवादी स्वरूपाचा खूप मोठा परिणाम समाजव्यवस्थेवर आणि पर्यायाने आपल्या कुटुंबसंस्थेवर झालेला दिसून येतो. स्वाभाविकपणे कुटुंबसंस्थेचा कणा असलेली विवाहसंस्थादेखील या परिणामापासून दूर राहिलेली नाही.
समाजातल्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांत आजही कुटुंब आणि विवाहसंस्था बऱ्याच प्रमाणात टिकून राहिलेली दिसत असली तरी महानगरांमधले चित्र मात्र यापेक्षा काहीसे वेगळे आहे. ते या कादंबरीत प्रकर्षांने जाणवते.
मुंबईतल्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या चार मत्रिणींच्या कौटुंबिक जीवनाला कलाटणी देणारे स्कॅण्डल्स हा या कादंबरीचा विषय. मात्र हे स्कॅण्डल्स केवळ मौजमजा किंवा उपभोगाच्या विचारातून घडत गेलेले नाही, तर वर्षांनुवष्रे ‘गृहिणी’ म्हणून स्त्रियांना सगळ्याच बाबतीत ‘गृहीत’ धरण्याच्या मानसिकतेविरुद्धचे नकळतपणे घडलेले बंड आहे.
लौकिक अर्थाने उच्चभ्रू घरातल्या या चार गृहिणींचे कौटुंबिक वास्तव मात्र बरेच भिन्न आहे. थोडय़ाफार फरकाने समान आर्थिक परिस्थिती असूनही प्रत्येकीचे आपले म्हणून काही प्रश्न आहेत. मात्र, रोज संध्याकाळी नित्यनियमाने सोसायटीतल्या लॉनवर भेटणाऱ्या या चौघी जणी आपले सगळेच प्रश्न एकमेकींशी शेअर करू शकत नाहीत, कारण प्रत्येकीची धडपड असते ती स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाची प्रतिमा सांभाळण्याची. तरीही रोजच्या दैनंदिन व्यापातून वेळ काढून एकमेकींना भेटणं, एकमेकींशी बोलणं, एकमेकींची काळजी घेणं यातून त्यांचं मत्रीचं नात फुलत जातं. शिवाय त्याला जोड मिळते व्हॉटस्अपवरच्या ‘लव्हली लेडी’ ग्रुपची. या ग्रुपमध्ये आहे- नेहमीच नवऱ्यासाठी दुर्लक्षित असलेली, दोन मुली झाल्या म्हणून नवऱ्यासह सासूसासऱ्यांचे टोमणे ऐकणारी, सतत घरातल्या तणावपूर्ण वातावरणात दबून वावरणारी गीता. नवऱ्याशी, जयशी चांगले भावनिक आणि शारीरिक संबंध असलेली, पण दोन मुलांची आई असूनही पालक म्हणून फारशी जागरूक नसलेली आणि अतिशय काटकसर करणाऱ्या गुजराती कुटुंबातली सरिता. तरुण वयात यशस्वी मॉडेल असूनही फोटोग्राफरच्या प्रेमात पडून लग्न केल्यानंतर गृहिणी राहणंच पसंत करणारी, पण या निर्णयामुळे नवऱ्याकडून सतत टोमणे ऐकणारी आणि शीघ्रकोपी स्वभावाच्या नवऱ्यामुळे कौटुंबिक िहसाचाराला बळी पडलेली नताशा. आकंठ प्रेमात बुडूनही केवळ मॅरेज मटेरिअलचा विचार करून आपल्याच प्रियकराच्या मित्राशी लग्न करणारी, लग्नानंतर नवऱ्यातल्या शारीरिक कमतरतेचे वास्तव जाणणारी, प्रियकराचे मूल आपलेच असल्याचे नवऱ्याला भासवणारी आरती.
मात्र आपल्या वैयक्तिक जीवनातील हे वास्तव त्या चौघी जणींनी एकमेकींपासून दडवून ठेवलेले. त्यामुळेच त्यांच्या गप्पांचे विषय मुलांच्या शाळा, अभ्यास, एखादी पार्टी, एकमेकींचे कपडे, व्हॉटस्अपवरचे जोक्स आणि सासूसासऱ्यांविषयीच्या तक्रारी एवढय़ाच मर्यादेत राहणारे.
इथपर्यंत अतिशय सरळ साध्या पद्धतीने पुढे सरकणारी ही कादंबरी वाचकाला एखाद्या प्राइम टाइमच्या सीरिअलसारखी वाटते. क्वचितच त्यात सोसायटीच्या मीटिंग्जचे संदर्भ येतात, पण मुख्यत: या चौघींचे रुटीन आयुष्य आपण वाचत जातो.. आणि अचानक प्रत्येकीच्या आयुष्यात एक नवीन वळण येते.
जबाबदार, खोडकर आणि प्रेमळ स्वभावाचा धाकटा दीर नवऱ्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या गीताचे लक्ष वेधून घेतो, काटकसरी गुजराती कुटुंबातल्या सरिताच्या किशोरवयीन मुलाला नवऱ्याकडून दुखावलेल्या नताशाचा आधार वाटू लागतो, पूर्वाश्रमीच्या प्रियकराची पुनभ्रेट होताच शरीरसंबंधांच्या आरतीच्या जाणिवा जागृत होतात..
नेमक्या याच वळणापासून सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या गृहिणींचे स्कॅण्डल सुरू होते आणि त्यातून प्रत्येकीच्या आयुष्यातील दुखऱ्या कोपऱ्यांचे कंगोरे उलगडत जातात. या ठिकाणी लेखिकेने स्त्रियांच्या भावविश्वाचे अनेक तपशील खूप सविस्तरपणे मांडले आहेत. विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेवर नेमकेपणाने भाष्य केले आहे. उच्चभ्रू कुटुंबातील स्त्रियांची घुसमट, आर्थिक स्वातंत्र्यावरील मर्यादा, परंपरेच्या नावाखाली आचारविचारांना घातलेले कुंपण या सगळ्यांचे मार्मिक वर्णन आधुनिक म्हणवणाऱ्या कुटुंबांबद्दलचे वास्तववादी चित्र रेखाटते.
आपल्याच विश्वात रमलेल्या आणि मुलांवर आपली स्वप्ने लादणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या पालकांच्या मानसिकतेवरही कादंबरी चपखल भाष्य करते.
सेक्स हा या कादंबरीचा केंद्रिबदू असला तरी, त्या विषयाचा परिघ मात्र सहजीवन, कुटुंबसंस्था, विवाहसंबंध, किशोरवयीन मुलांच्या समस्या, पालकत्व, कौटुंबिक िहसाचार, परंपरांच्या ओझ्याखाली स्वत्व हरवून बसलेल्या गृहिणी अशा असंख्य मुद्दय़ांभोवती विस्तारत जातो.
नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे पिचून गेलेल्या गीताला स्वत:चा कॅटिरग व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्या दिराची, साहिलची मदत मिळते. आपल्या नवऱ्याने, शैलेशने त्याच्या मनाविरुद्ध केवळ आईवडिलांच्या सांगण्यावरून आपल्याशी लग्न केल्याचा गीताचा संशय दिवसेंदिवस अधिकच बळावतो. शैलशऐवजी साहिल आपला नवरा असता तर.. या विचारानेसुद्धा गीताच्या दुखऱ्या मनाला दिलासा मिळतो. कारण लग्न म्हणजे स्त्री-पुरुषाने केवळ एका घरात राहणे किंवा एका पलंगावर झोपणे इतका त्याचा मर्यादित अर्थ निश्चितच नाही. पती आणि पत्नी या दोघांचे परस्परावलंबित्व, तडजोड, सहवास, समजूतदारपणा, अ‍ॅडजस्टमेंटस्, निकोप शरीरसंबंध या कशाचाच पत्ता नसलेल्या या लग्नांमध्ये होरपळून गेलेल्या मत्रिणींचे हे भावनांदोलन आहे. मुख्य म्हणजे शरीरसुख हा मानवी जीवनातला महत्त्वपूर्ण (किंवा अपरिहार्य) घटक मानून लेखिकेने मांडणी केली आहे.
विवाहबाह्य़ संबंधातून आपल्या आत खदखदणाऱ्या प्रश्नांना वाट करून देण्याच्या प्रयत्नात त्या अक्षरश: बुडून जातात. नाही म्हणता म्हणता त्या चक्रव्यूहात अडकतात. पण डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी त्यांची अवस्था होते एक दिवस त्यांच्या स्कॅण्डलविषयीची ईमेल संपूर्ण सोसायटीच्या सदस्यांपर्यंत पोहोचते. अतिशय नाटय़मयरीत्या हे प्रसंग चितारून लेखिका आपल्याला धक्क्यावर धक्के देते.
एकमेकींच्या विवाहबाह्य़ संबंधांविषयी कळल्यामुळे लव्हली लेडी ग्रुपची ताटातूट होते. आपल्याच किशोरवयीन मुलाबरोबर संबंध ठेवणाऱ्या नताशाचा तर सरिताला प्रचंड तिरस्कार वाटू लागतो. आईवडिलांचा विश्वासघात केलेल्या राहुलला घर सोडावे लागते. या सगळ्याचा ताण आपल्याही मनावर येत असतानाच ही कादंबरी गोड शेवटाकडे वाटचाल करू लागते आणि वाचक म्हणून काहीसा भ्रमनिरास होतो. ताटातूट झालेल्या ‘लव्हली लेडी ग्रुप’चे रूपांतर ‘स्ट्राँग सीस्टर’ या नवीन ग्रुपमध्ये होण्यासाठी राहुलच्या आत्महत्येचे निमित्त पुरते. काल्पनिक प्रकारात मोडणाऱ्या या कादंबरीचा शेवटही अशा प्रकारे काल्पनिक होऊ नये, ही अपेक्षा मात्र भंग पावते.
गीता, नताशा आणि आरती नवऱ्यांना सोडून सुखाच्या दिशेने वाटचाल करतात, परदेशात चित्रकलेचे धडे गिरविण्याचे आपल्या मुलाचे, राहुलचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जय आणि सरिता पुढाकार घेतात. मात्र, लग्न या संकल्पनेतून येणारी कमिटमेन्ट किंवा सामंजस्य याच्या आधारे गीता, नताशा आणि आरती यांपकी कोणाचेच लग्न टिकत नाही, याचे आश्चर्य वाटत राहते या कादंबरीला मुंबई या मोहमयी शहराची पाश्र्वभूमी असल्यामुळे हेच वास्तव असावे, अशी स्वत:ची समजूत काढावी लागते.
‘‘१८ ते ४५ या वगोटातील स्त्रिया आणि स्त्रियांना समजून घेऊ इच्छिणारा प्रत्येक पुरुष हा माझा वाचकवर्ग आहे,’’ असं माधुरी बॅनर्जीनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यांच्या विधानाची अनुभूती ही कादंबरी वाचताना येत राहते.

स्कॅण्डलस् हाऊसवाईव्हस् : माधुरी बॅनर्जी
रुपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली
पाने : २६४,
किंमत : २९५ रुपये.