सेवा ही दृश्यात असते आणि भाव हा आंतरिक असतो. जोवर अंतरंग सद्गुरूचरणी लीन होत नाही तोवर, जोवर ज्ञानेंद्रियांच्या चिंतन, मनन, बोधाचा विषय केवळ सद्गुरूमयता होत नाही तोवर कर्मेद्रियांनी होणारी सेवा ही स्थूलच होते. देहबुद्धीनेच होते. जेव्हा चिंतन, मनन, विचार यात एकवाक्यता येते तेव्हाच ही सेवा खऱ्या अर्थानं अंतर्बाह्य़ एकरूप सेवा होते. जोवर चिंतन, मनन, विचार यात ‘मी’पणामुळे द्वैतमयता असते तोवर देहबुद्धीनुसारच आपण ‘सेवा’ करतो, त्या ‘सेवे’द्वारे काही तरी अपेक्षितो, आपली स्तुती आणि लोकेषणाही अपेक्षितो. श्रीसद्गुरूंसोबत आम्ही पाच-सहाजण पुण्याजवळच्या एका गावात वीसेक दिवस राहिलो होतो. तिसऱ्या मजल्यावर आमचा मुक्काम होता आणि अंगणातल्या नळावरून पिण्याचे पाणी भरून आणावे लागे. पहाटे पाचपासून रात्री बारापर्यंत गुरुजींचा सहवास हाच सत्संग असे. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे दिवसभर पाणीही बरंच लागे. एकदा नळावर पाणी भरत असताना मनात सूक्ष्म विचार आला, ‘‘आपण भरतो ते पाणी गुरुजीही पितात. आपली सेवा किती मोलाची आहे. आपलं भाग्य आहे.’’ काही वेळानं वर गेलो, तोवर हा विचार विसरूनही गेलो होतो. गुरुजी गंभीर मुद्रेनं बोलत होते. बोलण्याच्या ओघात म्हणाले, ‘‘तुम्ही माझी सेवा करता, म्हणजे काय करता? तर मला पाणी आणता! अरे पाणी काय तुम्ही उत्पन्न केलंत? ते परमात्म्यानं उत्पन्न केलं. त्यासाठी तुम्हाला भगीरथ प्रयत्न करावे लागत नाहीत की मैलोन् मैल जावंही लागत नाही. इथंच मिळतं. मग त्यात तुम्ही काय विशेष केलंत? तेव्हा तुम्ही सेवा करतच नाही, तुम्हाला सेवेचा योग दिला जातो!’’ ‘स्वरूपानंद स्मृतीसौरभ’मध्ये सौ. स्नेहलता मोरेश्वर फडके यांनी म्हटलं आहे की, ‘गणपति पुळ्याजवळ लक्ष्मी नारायणाचं स्थान आहे. तिथून (स्वामींसाठी) पाणी येत असे. ते पिण्याकरिता गाळून भरून ठेवलं जात असे..’ आता या सर्व पाणीसेवेत सहभागी असलेल्यांच्या मनात माझ्या मनात डोकावला तसा विचार डोकावला असेलही. सद्गुरू ‘आपैसा’ झाल्याचं भासवतात आणि मग त्यांच्या नित्याच्या साध्या जगण्यातील अनेक लहान-सहान कामं पार पाडण्याची सेवेची संधीही देतात. त्यांची अशी लहान-सहान कामं पार पाडणं आणि त्यांच्या दर्शनाला आलेल्यांचं आगत-स्वागत करणं या सेवेबरोबरच धोक्याचं एक वळणही येतं! या व्यापात सद्गुरूंचं जे अलौकित्व आहे, त्याचं भान अतिपरिचयाने वा अतिजवळिकीने पटकन सुटू शकतं. मग ती कामं, ती सेवा अधिक महत्त्वाची होते आणि त्यापायी सद्गुरूंनाही मनुष्य पातळीवर पाहिलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी वर्तन होतं. अतिपरिचयानं अहंभाव वाढून जे औद्धत्य मनात शिरकाव करू शकतं, त्या धोक्याचा हा संकेत कायम लक्षात ठेवावा असाच आहे. तेव्हा मी करीत असलेली सेवा मोठी असो वा छोटी. साधी असो वा कठीण. ती मी ‘करीत’ नाही, माझ्याकडून ‘करवून’ घेतली जाते, हे भान टिकणं आवश्यक आहे. त्या सेवेसाठीची बुद्धी, शक्ती सद्गुरूच देतात, मी फक्त त्या सेवेसाठी उपस्थित आणि तत्पर असलं पाहिजे.