गरीब लोकच दारिद्रय़ाचा पराभव करू शकतात यावर त्यांचा विश्वास होता, त्यातूनच त्यांनी बीआरएसी (बांगलादेश रुरल अ‍ॅडव्हान्समेंट कमिटी) ही स्वयंसेवी संस्था स्थापन करून आफ्रिका व आशियातील १५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, आणखी १० देशांत त्यांच्या संस्थेचा विस्तार होत आहे, १९७० मध्ये बांगलादेशात वादळामध्ये पाच लाख लोक मरण पावले. त्यानंतर १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाची झळ बसली, त्या वेळी मदतकार्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे..
त्यांचे नाव आहे फाजली हसन आबेद. त्यांना नुकताच जागतिक अन्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अडीच लाख डॉलरचा हा पुरस्कार त्यांना ऑक्टोबरमध्ये प्रदान केला जाणार आहे. आबेद यांचा जन्म बांगलादेशातील हबीबगंज येथे २७ एप्रिल १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण पौना जिल्हा शाळेत झाले. नंतर ढाका महाविद्यालयातून पदवी घेऊन ते ग्लासगो विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी अगदी वेगळ्या म्हणजे जहाजबांधणी विषयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ ते शेल तेल कंपनीत काम करीत होते. बांगलादेश मुक्ती युद्धात शरणार्थीच्या सेवेसाठी ते लंडनची सदनिका विकून मायदेशी आले व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी बीआरएसी संस्था सुरू केली.
बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, आरोग्य सेवेत सुधारणा करणे, महिलांना सक्षम करणे, कृषी प्रशिक्षण देणे अशा अनेक उद्देशांच्या पूर्ततेसाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या मते अब्जापेक्षा अधिक लोक रोज १.२५ डॉलरपेक्षा कमी कमाई करतात ते तर दारिद्रय़रेषेखाली आहेतच, पण लाखो लोक त्यापेक्षाही निम्मेच पैसे कमावतात ती गरिबीची परिसीमा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार ते ज्या बांगलादेशचे नागरिक आहेत, तेथे १९९१-९२ मध्ये गरिबीचे प्रमाण ५६.७ टक्के होते ते २०१० मध्ये ३१.५ टक्के इतके खाली आले. बालकांच्या लसीकरणाचे प्रमाण बांगलादेशात २ टक्के होते ते आता ९५ टक्के आहे. अर्थातच आबेद यांच्या प्रयत्नांचा यात मोठा वाटा आहे.
बांगलादेशात कॉलरा व डायरियाने मुले मरण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे त्यांनी घरोघरी  मातांना जलसंजीवनी तयार करण्याचे शिक्षण दिले. महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत सहभागी करून घेण्यावर भर दिला. त्यांना आतापर्यंत मॅगसेसे, आलोफ पामे पुरस्कार, हेन्री क्राविस पुरस्कार आणि नाइटहूड (‘सर’ उपाधी) असे मानसन्मान मिळाले आहेत.