News Flash

सर्जनाचे गाणे!

रागसंगीताची मूळ चौकट कितीही पोलादी असली, तरीही ती आतून मोठी करण्याचे असामान्य धैर्य अनेक कलावंतांनी दाखवले. एकाच रागाकडे वेगवेगळय़ा अंगांनी पाहण्याची दृष्टी त्यातून विकसित झाली.

| August 2, 2014 03:30 am

रागसंगीताची मूळ चौकट कितीही पोलादी असली, तरीही ती आतून मोठी करण्याचे असामान्य धैर्य अनेक कलावंतांनी दाखवले. एकाच रागाकडे वेगवेगळय़ा अंगांनी पाहण्याची दृष्टी त्यातून विकसित झाली. रसिकाला हे बहुपर्याय आवडू लागले आणि या विविध शैली मांडणाऱ्या घराण्यांना लोकप्रियता मिळू लागली. असे असले, तरीही घराण्यांच्या चौकटीही काही कमी कणखर नव्हत्या. त्या मोडणे हे पापच मानले जात होते, पण सर्जनाच्या प्रक्रियेत त्याही मोडण्याचे पाप अनेकांनी केले.
अभिजाततेला सर्व समूहाला कवेत घेता येण्याचे सुख नसते. ती बहुतांश विशिष्ट वर्गापुरती, अभिजनापुरती मर्यादित राहते. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेले कलांचे सर्व पर्याय अभिजन नाकारत असताना, त्यांच्यासाठी सतत नवे काही विचार घेऊन अभिजातता प्रकट होत राहते. केवळ अभिजनांसाठी, म्हणून सामान्यांसाठी तिचे महत्त्व नसते असे नाही. सामान्यांमध्ये प्रिय असलेल्या कलांच्या विविध प्रकारांमध्ये ही अभिजातता हळूहळू झिरपत राहते आणि कालांतराने तिचा सगळय़ाच कलांवर चांगला परिणाम दिसून येतो. हे घडणे कुणाच्या हाती नसते आणि कुणी ते ठरवून करूही शकत नाही. भारतीय संगीताच्या बाबतीत हे कसे घडले असेल, याच्या शक्यता तपासायच्या असतील, तर देशी संगीतातून मार्गी संगीत निर्माण होण्याची कारणे सापडावी लागतील. निवासीकरणाच्या प्रगत अवस्थेत जी नागर संस्कृती निर्माण झाली, तिने जगण्याची परिमाणे बदलून टाकायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आवडीनिवडीवरही झाला. ही आवड केवळ रस आणि गंध यांच्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर दृष्टी आणि श्रवणेंद्रिये यांच्यावरही तिचा परिणाम होत गेला. कुणा एका व्यक्तीने करायची वा घडवायची ही गोष्ट नव्हे. एकाच्या बरोबरीने अनेकांना ते आवडत जाण्यानेच त्या कलेतील अंतर्गत मूलभूत चौकट बदलण्यास सुरुवात होते.
संगीत ही गोष्ट माणसाच्या गळय़ापासून सुरू झाली. ऐकलेल्या आवाजांच्या अनुकरणातून त्याची स्वत:ची अशी एक सौंदर्यदृष्टी निर्माण झाली आणि ते अनेकांना आवडू लागल्याने त्या समूहाची म्हणून एक आवड तयार झाली. भारतीय संगीत लोकसंगीतात उतरले याचे हे एक कारण असावे. लोकसंगीतात अनेकांना सहभागी होण्याची संधी असते. त्यातील प्रत्येक जण स्वत:ची सर्जनशीलता पणाला लावण्याच्या भानगडीत न पडता, सामूहिक आविष्कारात सहभागी होत राहतो. काही वेळा त्याला चार पायऱ्या खाली उतरावे लागते, तर काही वेळा तो दोन पायऱ्या उंच असतो. ही प्रक्रिया घडवून आणणारा असा कुणी ‘मुखिया’ नसल्यामुळे सगळे जण त्या संगीतातील नियम सारख्याच पद्धतीने पाळतात. लोकसंगीतातील गीतांच्या स्वररचना कुणा एकाच्या नसतात. जे जे संचित परंपरेने पुढच्या पिढय़ांकडे पोहोचते, त्यात त्याच्या निर्मात्याला फारसे महत्त्वही राहत नाही. कारण समूहातील कुणी त्यात केलेला छोटासा बदलही सगळय़ांनी स्वीकारला, तर तो बहुमुखी होत जातो. सोपे उदाहरण भोंडल्याच्या गीतांचे. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा.. या गीताची चाल परंपरेने पुढे येत राहिली. त्यात कणाकणाने फरक पडला असल्याचीही शक्यता आहे. पण बव्हंशी ते गाणे कुणालाही सहज गाता येईल, असेच असते. केवळ सोपेपणा हा त्याचा एकमेव गुणधर्म नसतो. सगळय़ांच्या ‘गळय़ाला पेलणे’ ही त्याची प्राथमिक गरज असते. समूहाने एकत्र राहण्याच्या आवश्यकतेमुळे आपोआपच प्रत्येक कृतीला सामूहिक अधिष्ठान मिळाले आणि त्यातून जगण्याच्या अनेक प्रसंगांमध्ये स्वरांची साथ घेत सगळय़ांनी आपल्या भावना व्यक्त करण्याची परंपरा स्थापन झाली. इतरेजनांहून कांकणभर अधिक सर्जनाचे दान मिळालेल्याला या समूहातून बाहेर पडून आपल्या प्रज्ञेला साद घालण्याची गरज न वाटती तरच नवल!
भारतीय संगीत लोकसंगीतातून देवळात आले आणि तिथून त्याचा प्रवास दोन मार्गानी सुरू झाला. एक समूहाने केलेली आळवणी आणि दुसरे, स्वसर्जनाचा हट्ट. देवाला खूश करणे हा देवळातल्या संगीताचा मुख्य हेतू आणि तरीही त्यात एकटय़ाने आपल्या कल्पनेने केलेले स्वरांचे छोटेमोठे इमले असायचेच. देवाला संगीत आवडतच असेल, तर त्याला शरण जाताना आपल्यातले जे जे उन्नत आणि उदात्त आहे, तेच अर्पण करायला हवे, अशी मानसिकता त्यामागे होती. समूहातून बाहेर पडून स्वप्रतिभेला साद घालणाऱ्या या संगीताला नव्या कल्पनांचे वावडे नव्हते. तेथे अन्य कुणाला बरोबर घ्यायचे नसल्याने कसलीच तडजोड करायची नव्हती. आपण आणि आपले सर्जन एवढाच त्या संगीताचा परीघ. देवळातल्या भजन-कीर्तनातून गायक आणि श्रोता अशी नवी रचना उदयाला आली. कलावंताने आपली कला सादर करताना समोर बसलेल्या श्रोत्यांशी सौंदर्यपूर्ण संवाद साधायचा आणि रसिकानेही त्याला प्रतिसाद द्यायचा असे या रचनेतील गृहीत. संगीताच्या आरंभी असलेले मातीचे नाते या रचनेत हळूहळू गळून पडायला सुरुवात झाली. लोकसंगीताला मातीचा अस्सल वास असतो आणि अभिजातता या मातीपासून उंच उडण्याच्या प्रयत्नात असते. कुमार गंधर्वासारख्या प्रज्ञावान कलावंताने या लोकसंगीताचा आविष्कार करताना, त्यात अभिजातता कशी अप्रतिमपणे मिसळली आहे, याचे विलोभनीय दर्शन माळवा की लोकधुनें, गीतवर्षां, ऋतुराज महफिल यांसारख्या कार्यक्रमांतून पाहायला मिळते. किशोरी आमोणकर यांनी निर्गुणी भजनांमध्ये जो रंग भरला, तो त्यांच्या प्रतिभेचाच साक्षात्कार म्हटला पाहिजे. महाराष्ट्रातील भक्तिसंगीताला पं. भीमसेन जोशी यांनी अभिजाततेचा जो स्पर्श केला आहे, त्याने त्या संगीतालाही वेगळा दर्जा प्राप्त झाला.
 लोकसंगीतातून राग संगीत निर्माण होणे हा या प्रक्रियेचा भाग होता. स्वरस्थाने निश्चित होणे, त्यांचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित होणे आणि त्यातून एकसंध अशी स्वरांची लड तयार होणे हे सारे अजब होते, बुद्धिगम्य होते. त्याला प्रतिभेचा स्पर्श होता. या साऱ्या घडामोडींचा मोठा आधार निसर्ग होता. त्याचे चलनवलन आणि त्याची साद घालण्याची रीत, प्रतिसाद देण्याची तऱ्हा या सगळय़ा गोष्टी अभिजाततेच्या प्रवासातल्या महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. हे सारे फक्त भारतीयत्वाच्या क्षेत्रातच घडले, असे नाही. जगातल्या बहुतेक भागांत लोकसंगीतातून बाहेर पडलेल्या संगीताने स्वत:ची वाट चोखाळली. त्यात स्वप्रतिभेची भर घातली. स्थानिक संस्कृतीने त्याला जशी साथसंगत केली, तशी ती बहरत गेली. काही ठिकाणी समूहसंगीतही अभिजाततेच्या वाटेवर चालू लागले! भारतीय पातळीवर एकटय़ाच्या प्रतिभेला बुद्धीच्या क्षेत्रातही सतत प्राधान्य मिळाले. कलांच्या पातळीवर त्याचेच अनुकरण झाले. समूहाने सादर होणाऱ्या सगळय़ा कला अशा विलग होत एकल होत गेल्या. नृत्यात जे झाले, तेच संगीतात. त्यामुळे वरच्या पायरीवर जाताना समूहाच्या लघुत्तम साधारण विभाजकाशी तडजोड करीत बसण्याची गरज राहिली नाही. आपण एकटेच आपल्या कलेला आविष्काराला पुरून उरू असा आत्मविश्वास त्यामुळे कलावंताच्या ठायी आला.
नागर संस्कृतीच्या उगमानंतर आवडीनिवडी बदलण्यास सुरुवात झाली आणि एका नव्या सौंदर्याच्या जाणिवेचा शोध सुरू झाला. मेंदूत तयार होणाऱ्या सर्जनाच्या रसायनाला योग्य त्या मुशीत ओतण्याच्या या प्रयत्नांना वैचारिक बैठक प्राप्त होणे हीही एक आवश्यकता बनू लागली. परिणामी, सौंदर्याच्या नव्या तत्त्वांची पृष्ठभूमी निर्माण झाली. कलांच्या आविष्काराला चौकट मिळण्याचा हाच तो काळ. प्रबंध गायकीपासून ते आजच्या ख्याल गायकीपर्यंत प्रत्येक शैलीमध्ये काही शिस्त तयार होत गेली. ती मोडून नवे काही करण्याची प्रबळ इच्छा प्रज्ञावंतांना होणेही स्वाभाविक होते. त्यातून नव्या आकृतिबंधांचा जन्म झाला. बदलांचे हे चक्र कधीच थांबणारे नसते. सतत नवे काही करण्याची क्षमता निर्माण होत जाणे आणि त्यातून कलेच्या चौकटी आणि शिस्त मोडून नव्या शैलीचा उगम होणे, हे अभिजाततेचे खरे लक्षण. रागसंगीताची मूळ चौकट कितीही पोलादी असली, तरीही ती आतून मोठी करण्याचे असामान्य धैर्य अनेक कलावंतांनी दाखवले. एकाच रागाकडे वेगवेगळय़ा अंगांनी पाहण्याची दृष्टी त्यातून विकसित झाली. रसिकाला हे बहुपर्याय आवडू लागले आणि या विविध शैली मांडणाऱ्या घराण्यांना लोकप्रियता मिळू लागली. असे असले, तरीही घराण्यांच्या चौकटीही काही कमी कणखर नव्हत्या. त्या मोडणे हे पापच मानले जात होते. पण सर्जनाच्या प्रक्रियेत त्याही मोडण्याचे पाप अनेकांनी केले. मुळात कलेचे प्रवाहीपण, असलेले मोडून नवे उभे करण्यातच असल्याने, ते सातत्याने होत राहिले.
समूहातून संगीत बाहेर पडले, ते नवोन्मेषी सर्जनाच्या रेटय़ाने. त्याने अभिजाततेची पातळी गाठण्याचा प्रयत्नही त्यामुळेच केला. त्याचा परिणाम जनसंगीतावर झाला. मोठय़ा समूहाला आवडणाऱ्या अशा संगीतात त्यामुळे बदल होणे अपरिहार्य ठरले. भारतीय संगीतात चित्रपटसंगीताने जनसंगीताचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यानंतर त्याचेच अनुकरण लोकसंगीतातही होत असल्याचे आपण पाहत आहोत. चित्रपटांच्या प्रारंभीच्या काळात तर अभिजात संगीतच त्याचा आधार होता. काळ बदलला. नव्या तंत्रज्ञानाने जगातले संगीत प्रवास करू लागले आणि त्याने या जनसंगीतालाही नवे प्रयोग करण्याची ऊर्मी प्राप्त झाली. पाश्चात्त्य संगीताचा अपरिहार्य परिणाम दिसत असतानाच अभिजात संगीताची कास धरून या संगीतात आजही नवे काही घडते आहे. समूहाने गायचे संगीत एकल होणे ही सामाजिक आणि कलात्मक अपरिहार्यतेशी संबंधित घटना असते, हे लक्षात आले की आपण कुणाच्याही घरी गेलो, की तिथल्या कुटुंबीयांबरोबर नृत्य का करीत नाही आणि समूहसंगीतात सहभागी होण्यासाठी आपल्याला भेंडय़ांची गरज का वाटते, याची उत्तरे आपोआप मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 3:30 am

Web Title: song of dynamic song of creative
टॅग : Music,Song
Next Stories
1 कथा फाळणीच्या, व्यथा माणसांच्या
2 आहे पॉप्युलर तरी..
3 कुणाही नेत्याला ना आस्था, ना तळमळ