दक्षिण कोरियातील दुर्घटनेतून एक गोष्ट अधोरेखित झाली.. ज्यांच्यावर विसंबून आश्वस्त असावे, त्यांच्याच बेदरकार मानसिकतेचा पहिला बळी बालकांनीच का व्हावे? हे कोवळेपण जपण्याच्या सामूहिक जबाबदारीचे भान समाजाला नसावे, इतका आपला वर्तमानकाळ क्रूर कसा काय?
दक्षिण कोरियातील दानवॉन शाळेचे दरवाजे एक आठवडय़ानंतर काल उघडले, आणि प्रत्येक बंद दरवाजाआडच्या भिंतींनी आठवडाभर दाबून ठेवलेला दु:खाचा कढ अचानक उचंबळून बाहेर पडला. या शाळेला आता एखाद्या स्मृतिस्थळाची कळा आली आहे. सर्वत्र फुलांचे गुच्छ पडले आहेत, पण ते गुच्छ आसपासच्या वातावरणाला प्रसन्नता देऊ शकत नाहीत. प्रत्येक गुच्छ जणू आतल्या आत कुढतोय, तेथून पुढे जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला हुंदके अनावर होताहेत, आणि शाळेतील नेहमीचा कोलाहल कुठल्या कुठे गायब झाला आहे. त्या शाळेला अक्षरश: स्मशानकळा आली आहे, आणि मागे राहिलेल्या मुलांच्या मनावरचे आघात हलके कसे करायचे, या चिंतेने शाळेच्या प्रशासनाला ग्रासले आहे. मानसशास्त्रज्ञांची अवघी फौज या शाळेत दाखल झाली आहे. हा धक्का जबर आहे. टायटॅनिक नावाच्या एका जहाजाला जलसमाधी मिळाली, त्याचा इतिहास या शाळेतील मुलांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी, सुहृदांनी कधी वाचला-ऐकला होता. पण काल-परवापर्यंत आपल्यासोबत असलेला कुणी आपला जिवलग मित्र, त्या इतिहासाच्या भीषण पुनरावृत्तीचा बळी ठरेल हे कधी कुणाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. सोल शहराच्या दक्षिणेकडील या शाळेतील मुले सहलीच्या आनंदाचे काही क्षण वेचण्याकरिता शेजारच्या एका निसर्गरम्य बेटावर निघालेली असताना अचानक त्यांच्या नौकेला जलसमाधी मिळाली आणि तीनशेहून अधिक मुलांचे जीवन भूतकाळात जमा झाले. दक्षिण कोरियावरील गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा आघात आहे. सारे जग या अपघाताने हादरून गेले आहे, आणि त्यापाठोपाठ या दुर्घटनेने काही प्रश्नदेखील जिवंत केले आहेत. त्यांची उत्तरे शोधणे सोपे नाही. पण एक गोष्ट मात्र यातून अधोरेखित झाली आहे. ती म्हणजे, ज्यांच्यावर विसंबून आश्वस्त असावे, त्यांच्याच बेदरकार मानसिकतेचा पहिला बळी बालकांनीच का व्हावे?..
गेल्या अनेक वर्षांत जगभरातील अनेक देशांत असंख्य आपत्ती कोसळल्या, अनेक दुर्घटना घडल्या. काही नैसर्गिक होत्या, तर काहींना मानवी विकृतीचा पाशवीपणा कारणीभूत होता. या घटनांमधील पहिला बळी मात्र, निष्पाप बालकांनाच व्हावे लागले. वडीलधाऱ्यांवर विश्वासाने विसंबून असलेल्या आणि त्यांच्या प्रेमाच्या छायेखाली आपल्या भविष्याची निरागस स्वप्ने रंगविणाऱ्या मुलांनाच जेव्हा अशा प्रसंगांची शिकार व्हावे लागते, तेव्हा, दुर्बलांवरच पहिला आघात होतो, या उक्तीची सत्यता पुरेपूर पटून जाते. दुर्बल आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा महापूर, भूकंपासारख्या संकटांमध्ये जगण्याच्या लढाईत केवळ नशिबावर हवाला ठेवावा लागतो, ही वर्तमान मानसिकतेची शोकांतिका म्हणावी लागेल. ज्यांना संरक्षणाची पहिली गरज आहे, त्या जिवांनीच पहिला बळी ठरावे, हा उफराटा न्याय प्रबळ ठरत असेल तर पालकत्वाच्या भावना आणि संकल्पना केवळ कागदावर आणि बोलण्यापुरत्याच उरल्या की काय, हा प्रश्न मोठी होणारी पिढी भविष्यात कधी तरी विचारेल, तेव्हा त्यासाठी कोणते उत्तर आजच्या पालकविश्वाकडे असेल, हा प्रश्नही अशा अनेक घटनांमधून उमटू लागला आहे.. मध्य आफ्रिकेत धुमसत राहिलेल्या युद्धजन्य स्थितीत बालकांनाच लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या जगासमोर येऊ लागल्या, तेव्हा त्याच्या कारणांचाही शोध सुरू झाला, आणि त्याचे मूळ धर्माधतेच्या वैचारिक विकृतीमध्ये असल्याची शंकाही व्यक्त होऊ लागली. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकातील १८ वर्षांखालील मुलांची वेचून हत्या केली जात असून, त्यांना जणू मरण्यासाठीच सैन्यात भरती केले जाते किंवा कुणाची तरी वैषयिक वखवख भागविण्यासाठी त्यांच्यावर लैंगिक गुलामगिरी लादली जाते, हे अंगावर शहारे आणणारे एक भयाण वास्तवही सामोरे आले. मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या १८ वर्षांखालील वयाची आहे आणि या युद्धाचा पहिला फटका या पिढीलाच बसला आहे. मुलांना ठार केले, तर एका विशिष्ट धर्माची पुढची पिढीच नामशेष होईल आणि नको असलेला तो धर्मदेखील आपोआपच खुंटेल या विकृत विचारातून केल्या जाणाऱ्या या अमानवी कृतीचा पहिला फटका या मुलांनाच बसला आहे. ज्यांच्या जगण्याच्या वर्तमानात ज्या गोष्टींना फारसे स्थानदेखील नसेल, हे जग सुंदर आहे आणि या सौंदर्याचा मनमुराद आनंद उपभोगण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, एवढय़ाच निरागस भावना ज्या मनामनांत उमलत असतात, ज्या मनांना धर्म, पंथ, जातिभेदाच्या विषारी विचारांचा स्पर्शदेखील झालेला नसतो, त्यांनाच या कारणासाठी बळी जावे लागणे हे सद्यस्थितीचे दुर्दैव मानले पाहिजे.
उमलत्या वयातील मुलांचा केवळ आपल्या भविष्यासाठी केवळ पालकांवर भरवसा असतो. पालक म्हणजे, केवळ जन्मदाते आईवडील ही संकल्पना जोवर संपुष्टात येत नाही, तोवर हे कोवळेपण जपण्याच्या सामूहिक जबाबदारीचे भान समाजालाही येणार नाही. आपली पुढची पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम, बुद्धिमान, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या क्षमतेची घडावी यासाठी केवळ आईवडिलांचे प्रयत्न अलीकडच्या काळात पुरेसे नाहीत. त्यासाठी समाजाने जबाबदारीचा वाटा उचलावयास हवा. दक्षिण कोरियातील या अपघातग्रस्त बोटीतील मुलांच्या अखेरच्या संकटग्रस्त अवस्थेतील अखेरच्या क्षणांच्या आता जगासमोर येऊ लागलेल्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, यासाठी आता सरकारवर सामाजिक दबाव वाढू लागला आहे. हा केवळ अपघात नसून अमानुष हत्याकांड आहे, अशा शब्दांत दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यून हु यांनीच या दुर्घटनेचे वर्णन केले आहे. त्यामुळे, मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे, या भावनेचा या बोटीच्या चालकांना संपूर्ण विसर पडला होता, हे सत्य अधोरेखित होते. या अखेरच्या क्षणी या निरागस बालकांच्या मनात कोणती वादळे उठली असतील हे ओळखणे अवघड असले, तरी त्यांच्यापैकी काहींच्या अखेरच्या संदेशातून बोलकी झालेली ही मने, आपल्या आईवडिलांच्या प्रेमावरच विसंबून होती, हे स्पष्टपणे उमटून गेले आहे. ‘माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मला माफ कर..’ असा एक हृदय पिळवटून टाकणारा आर्त संदेश अशाच एका बालकाने आपल्या अखेरच्या क्षणी आपल्या कुटुंबीयांसाठी फोनवर टाइप करून ठेवला होता. सुटकेची प्रतीक्षा करता करता, अखेरचा क्षणच समोर येऊन ठाकला हे समजून चुकल्यानंतर त्या कोवळ्या मनाला पश्चात्तापाच्या भावनेने का भारले असावे, हा प्रश्न मागे ठेवून ही दुर्घटना घडून गेली आहे. अशा एखाद्या जीवघेण्या संकटातून वाचविण्यासाठी आपले सुहृद नक्की प्रयत्न करतील, या आशेने त्याचे डोळे सुटकेकडे लागून राहिले असतील, आणि आपण काहीच करू शकलो नाही, याची चुटपुट त्या कुटुंबीयांनाही पुढे छळत राहील. पण त्या क्षणी अशा जिवांना वाचविण्याची जबाबदारी ज्यांची होती, त्यांनी मात्र, आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढला, हे वास्तव दाहक आहे.. स्वत:चा जीव वाचविण्याच्या प्रयत्नांत आपण अनेक निरागस जिवांचा बळी देत आहोत, हा विचारदेखील त्यांना शिवला नसेल, तर त्यांना उमलत्या कळ्या कुसकरण्याच्या मानसिक विकृतीचेच प्रतिनिधी मानले पाहिजे. ही मानसिकता संपली नाही, तर केवळ नशिबाच्या हवाल्यावरच भविष्याकडे झेपावणाऱ्या पिढय़ांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतील.