गोंदवल्याची वारी मन प्रसन्न करणारीच होती. त्या वारीच्या आठवणीतच दोन आठवडे कधी सरले, ते कळलंच नाही. मग चौघांनी कर्णोपकर्णी अर्थात ‘कर्ण उपकरणीं’ संपर्क साधून एका रविवारची भेट मुक्रर केली. ज्ञानेंद्रच्या बंगलीतील अभ्यासिका हे भेटीचं ठिकाण ठरलं. वेळ पडली तर रविवारी रात्री रहायचंही ठरलं. तशी वेळ पडणारच नाही, पुढचं पुढे, अशी ख्यातीची समजूत कर्मेद्रनं घातली होती. सिद्धी लहानग्या गायत्रीसह माहेरी गेल्यानं योगेंद्र मोकळाच होता. आजूबाजूला माना उंचावून तोऱ्यात उभ्या असलेल्या निवासी मनोऱ्यांच्या सावलीत ज्ञानेंद्रची वडिलोपार्जित बंगली आपला आब राखून होती. या बंगलीतील समुद्राचं दर्शन घडविणाऱ्या अभ्यासिकेचं रूपांतर खरंतर पार्टीरूममध्येच केलं पाहिजे, हे कर्मेद्रचं अनेक वर्षांपासूनचं मत होतं! नऊच्या सुमारास त्या प्रशस्त व ध्यानस्थ बंगलीत तिघा मित्रांनी प्रवेश केला तेव्हा ज्ञानेंद्रनं अगत्यानं त्यांचं स्वागत केलं..
ज्ञानेंद्र – मित्रहो, प्रज्ञानं तुम्हा सर्वाची आधीच माफी मागितली आहे. तिचा सहकारी आजारी पडल्यानं तिला अचानक परिषदेसाठी हैदराबादला जावं लागलंय..
कर्मेद्र – अरेरे.. फार छान!
हृदयेंद्र – (हसत) नेमकं काय? अरेरे की छान?
कर्मेद्र – (हसत) म्हणजे ती बिचारी या ज्ञानचर्चेला मुकली त्यासाठी अरेरे आणि आपली कॅलरीप्रमाणित जेवणातून सुटका झाली तसंच चर्चेत ‘मद्यांतर’ही घेता येईल, म्हणून फार छान!
योगेंद्र – ए गप रे.. या आध्यात्मिक चर्चाभेटींत तर व्यसनबंदी लागू आहे हं..
ज्ञानेंद्र – हो या चर्चात केवळ विचारांच्या नशेत बुडायला परवानगी आहे! (कर्मेद्र उसासा टाकतो आणि तिघे हसतात.)
हृदयेंद्र – पण आता अभंग कोणता घेऊया?
ज्ञानेंद्र – अभंगच कशाला? अनंत पुस्तकांनी कपाटं भरली आहेत की..
योगेंद्र – तरी अभंगाची कल्पनाच छान आहे रे..
ज्ञानेंद्र – हरकत नाही.. आधी न्याहरी करू, मग वर अभ्यासिकेत जाऊन विचार करू..
तोच सखारामनं नाश्ता आणल्याची वर्दी दिली. सखारामचं काम नोकराचं होतं, पण त्याचं स्थानं घरातल्या जुन्या माणसाचंच होतं. चौघं दिवाणखान्याच्या कोपऱ्यातील टेबलाभोवती विसावले. गरम पोह्यांनी भरलेल्या बश्या, अननसाचे तुकडे आणि त्यावर किसलेल्या कोबीचे तसेच कलिंगड-पपईच्या कापाचे बाउलही टेबलावर ताटकळत होते..
ज्ञानेंद्र – खाता खाता काही ऐकणार का?
योगेंद्र – काय आहे?
ज्ञानेंद्र – कुमारांचा हमीर.. परवीन सुल्तानांचा नंदकौस.. मुकुल शिवपुत्रजींचा तोडी..
कर्मेद्र – अरे ही पदार्थाची नावं आहेत की माणसांची?
ज्ञानेंद्र – (हसत) सॉरी कर्मू.. तू बशीपलीकडे पाहू नकोस आणि ऐकू नकोस.. बरं, किशोरीताईंचा हंसध्वनीच ऐकू.. कितीदा ऐकला तरी कानांची तहान भागत नाही..
योगेंद्र – ए पण अख्खा तास जाईल.. तो रात्री ऐकू.. त्यापेक्षा गाणंच लाव..
कर्मेद्र – मित्रांनो ते ‘ये मोह मोह के धागे’ काय भन्नाट आहे.. हृदूचंही ते आत्ताचं आवडतं गाणं आहे..
हृदयेंद्र – (हसत) हो.. आणि तो ‘दम लगा के हैशा’ही या मातीचा गंध असलेला उत्तम चित्रपट आहे, पण आत्ता चित्रपटगीतं नकोत.. भजनच लाव..
ज्ञानेंद्र – अरे या ठरवाठरवीतच पोहे संपतील.. सखाराम तूच लाव एखादं भक्तीगीत.. डाव्या बाजूच्या खोक्यात आहेत बघ भक्तिगीतांच्या सीडीज..
‘जी’ म्हणत सखाराम गेला. ज्ञानेंद्रच्या स्वभावानुसार कपाटात सर्व सीडीज वर्गवारीसकट रचल्या होत्या. त्यामुळे सखारामला कष्ट पडले नाहीतच. पोह्यांचा आणि फळफोडींचा आस्वाद घेत असतानाच कानांवर किशोरी आमोणकर यांचा अभंग-ध्वनी झंकारला.. पहाटेच्या वेळी दरवळणाऱ्या धुपासारखा भावतन्मय.. दवबिंदूंच्या स्नानानं शूचिर्भूत झालेल्या नाजूक प्राजक्त फुलांसारखा प्रसन्न.. गाभारा स्वरकंपित करणाऱ्या घंटानादासारखा आत्मगंभीर आणि कानांतून हृदयाची तार छेडणारा तो स्वयंभू स्वर ऐकताच चित्तवृत्तींना जणू दिव्यत्वाचा स्पर्श झाला.. किशोरीताई गात होत्या.. अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन!!
चैतन्य प्रेम