जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो! श्रीगोंदवलेकर महाराज यांचं हे वाक्य मायेच्या पकडीत प्रपंच करीत असलेल्या आपल्यासारख्या साधकांसाठी आहे. सहज शुद्ध विरक्त साधकाला ते लागू नाही. श्रीमहाराज काय सांगतात? आपल्या आयुष्यात ज्याचं जसं स्थान आहे त्यानुसार त्याच्याशी कर्तव्यपूर्तीचा व्यवहार पाळलाच पाहिजे. प्रत्येक नात्याची एक पायरी आहे आणि कालमानाने त्या पायरीतही बदल होतो. एका नात्याचं उदाहरण पाहू. लहान मुलासंबंधात आई-वडिलांचं कर्तव्य ठरलेलं आहे. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झालेल्या तरुणात जेव्हा त्या मुलांचं रूपांतर होतं तेव्हा आई-वडिलांची कर्तव्यं बदलतात. लहान मुलाला आई-बापाविना दुसरा भावनिक, मानसिक आधार नसतो. त्याचं जग त्यांच्यापुरतंच सीमित असतं. काही हवं असलं की ते आई-बापाकडेच धाव घेतं. त्यातून मुलाच्या भावविश्वात आईबापही गुंतून जातात. ते मूल त्यांचं ऐकत असतं, नाही ऐकलं तर थोडय़ा शिक्षेनंही ते ऐकतं. पण याच मुलाचं वय जसजसं वाढत जातं तसतसे त्याचे भावनिक, मानसिक आधार विस्तारत जातात. आई-वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे, असंही त्याला वाटत नाही. लहानपणच्या शिक्षाही निरुपयोगी असतात. तरुण मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याच्या भावविश्वात समान वाटा असलेली व्यक्ती पत्नीच्या रूपानं प्रवेश करते. आता भावनिक, मानसिक सुखाला शारीरिक सुखाचे परिमाणही लाभतं. त्याच्या खाजगी आयुष्यात इतका शिरकाव दुसऱ्या कुणाचाच नसतो म्हणूनच तो आधार सर्वात प्रभावी आणि मोठा असतो. आता आई-वडील आणि मुलगा या नात्याची कालमानाने बदललेली ही पायरी जर ओळखता आली नाही तर व्यवहारात अर्थात कर्तव्यात आणि वर्तनात अधिक-उणेपणा येतोच येतो. त्यातूनच मोह, अहंकार, भ्रम, हट्टाग्रह, दुराग्रह, आसक्ती, दुराशा उफाळून येतात. नात्याची कालमानानुसार बदललेली पायरी ओळखण्यात गफलत झाली की ‘मुलगा पूर्वीप्रमाणे वागत नाही’ आणि ‘आईवडील पूर्वीसारखे वागत नाहीत’ हा अनुभव दोन्ही बाजूने येऊ लागतो. मनातून आसक्ती सुटलेली नाही आणि देहानं कर्तव्य व मोहजन्य कर्म यातली सीमारेषा संपून कर्माचा अतिरेक किंवा कर्माची टाळाटाळ सुरू झाल्यानेच हा अनुभव येतो. मन व्यवहारानं बरबटलं तर मनाचे सर्व अवगुण आणि मोह त्या व्यवहारात गोंधळ माजवितात. देहानं जे कर्तव्य करायचं आहे ते करताना मन त्यात आसक्त होत गेलं तर मनाच्या होकायंत्रापायी कर्तव्याची दिशाही चुकू लागते. नात्यांची कालमानानुसार, परिस्थितीनुसार बदललेली पायरी मला ओळखता आली तर कर्तव्यातला बदलही सहज स्वीकारता येईल. लग्न झालेल्या मुलानं प्रत्येक गोष्टीत आपलंच ऐकावं, या हट्टानं नको त्या गोष्टीतही आईबाप अडकतात आणि अपेक्षाभंगाचं दुखं भोगतात, तर ‘मी मोठा झालो आता आईबापानं मला काही सांगू नये,’ असं मुलगा मानू लागला तर आवश्यक त्या गोष्टीतही तो त्यांच्या अनुभवाच्या सल्ल्याला मुकतो. दोघांचीही पायरी चुकतेच.