डेव्हिड कोलमन हेडली हे नाव आता मुंबईकरांना अपरिचित नाही. मात्र ते २६/११ चा हल्ला होण्यापूर्वी राहुल भटला वडिलांसमान होते.  हेडलीच्या अटकेनंतर ‘राहुल’ हे नाव पुढे आले, तेव्हा तो कोण असावा, याचे विविध आडाखे बांधण्यास भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरुवात केली होती. न्यूज चॅनेल्स राहुलचा उदोउदो करत होते. तेव्हा अस्वस्थ झालेला राहुल पुढे आला आणि त्याने ‘तो मीच’ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. राज्याचा दहशतवादी विभाग, इंटिलिजन्स ब्युरो (आयबी), रिचर्स अ‍ॅण्ड अ‍ॅनालायसिस विंग (रॉ) अशा त्याच्या वाऱ्या सुरू झाल्या.
या संपूर्ण काळात तो कसा सामोरा गेला, त्याची मानसिकता आणि हेडलीने त्याच्यावर कसा प्रभाव टाकला  याची कहाणी म्हणजे ‘हेडली अ‍ॅण्ड आय’ हे पुस्तक.
त्याचे लेखक एस. हुसैन झैदी हे क्राइम रिपोर्टर. ‘डोंगरी ते दाऊद’ व  ‘ब्लॅक फ्रायडे’ या पुस्तकांमुळे ते सुपरिचित आहेत. राहुलच्या  निमित्ताने फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) आणि भारतीय तपास यंत्रणेने हेडलीच्या केलेल्या चौकशीचाही तपशील देण्याचा प्रयत्न केल्यामुळे केवळ राहुलचे आत्मकथन असा या पुस्तकाचा बाज न राहता २६/११ चा हल्ला आणि त्याच्या पूर्वतयारीची संपूर्ण माहिती होते. शहानिशा करण्यासाठी दिलेले संदर्भही तितकेच विश्वासार्ह असल्यामुळे पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचनीय झाले आहे.
हेडली हा राहुलचा आदर्श होण्यामागे त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमी कारणीभूत होती. त्याचे वडील महेश भट त्याला भेटले ते फक्त आईशी भांडताना. त्यामुळे त्याला आपल्या वडिलांबद्दल घृणा होती. ताडदेवच्या ‘मोक्ष जिम’मध्ये फिजिकल ट्रेनर विलास वारकने त्याची हेडलीशी ओळख करून दिली.  सुरुवातीला न्युट्रीशनचे धडे तो हेडलीला द्यायचा. वाढत्या संपर्कातून तो हेडलीच्या अधिकाधिक जवळ गेला. परंतु सुदैवाने हेडलीने त्याचा वापर करून घेतला नाही, असे या पुस्तकातून जाणवते.
राहुलने हेडलीसोबत तब्बल हजार तास घालवले. राहुलमुळे काही ठिकाणी हेडलीला सहज प्रवेशही मिळाला. हेडली हा एकाच वेळी अमेरिका आणि पाकिस्तानबद्दल वाट्टेल ती माहिती राहुलला देत होता. त्याचे शस्त्रांबाबतचे ज्ञान अफलातून होते. पण कुठल्याही दृष्टीने तो दहशतवाद्यांसाठी काम करत होता, असे राहुलला वाटले नाही. मात्र हेडलीने राहुलचा मुंबई ऑपरेशनसाठी इथेच्छ वापर करून घेतला. इतकेच नव्हे तर लष्कर-ए-तोयबाला लिहिलेल्या मेलमध्येही त्याने ‘राहुल’ हा कोड वापरला.
राहुलने या संबंधांची कबुली दिली तेव्हा अगदी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन टीमने त्याच्याकडे दोषी म्हणूनच पाहिले. परंतु वारंवार चौकशी होऊनही काहीही निष्पन्न न झाल्याने त्याला क्लिन चीट मिळाली! परंतु राहुल हा सेलिब्रिटी डॅडचा मुलगा नसता तर अशी क्लिन चीट मिळाली असती का, असा प्रश्न पुस्तक वाचून पडतो.
हेडली आणि राहुल यांच्याभोवती फिरणाऱ्या या पुस्तकातून दोघांच्या हुशारीची माहितीही मिळते. हेडली हा डबल एजंट होता तर राहुलला रॉचा एजंट व्हायचे होते. त्यासाठी त्याची तयारी सुरू होती. गुप्तचर यंत्रणेशी संबंधित साऱ्या पुस्तकांचा त्याने फडशा पाडला होता. राहुलचेही या यंत्रणांबाबतचे ज्ञान जबरदस्त होते. बाजारात कुठलेही नवे पिस्तूल आले तरी तो नुसते पाहून त्याची बनावट सांगे. हेडली कदाचित त्याच्या याच गुणांमुळे आकर्षित झाला असावा.
हेडलीचे ध्येय स्पष्ट होते. राहुल संभ्रमात होता की, फिल्ममध्ये करिअर करायचे की, शरीरयष्टी कमवायची की, गुप्तहेर बनायचे? हेडली त्यात मदत करत होता. परंतु तो अचानक गायब झाला. एकेदिवशी त्याला फोन आला की, मुंबईत काही भयानक घडले का? राहुलला काहीच कळले नाही. मात्र हेडली पकडला गेल्यानंतर राहुल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. हेडलीने विश्वासघात केला तेव्हा ज्यांच्याबाबत घृणा होती त्या बापानेच त्याला या दिव्यातून बाहेर काढले, असाच निष्कर्ष या पुस्तकातून निघतो.
हेडलीसारखे अनेक डबल एजंट आजही आपल्याभोवती असतील. त्यांची माहिती मिळणे कठीण आहे. एखाद्या हल्ल्यानंतरच अशा एजंटची कल्पना येऊ शकते, हेच या पुस्तकातून भासवण्याचा प्रयत्न दिसतो. कोणाशीही जवळीक साधताना काळजीपूर्वकच राहायला हवे, हा बोध मिळतो.
हेडली अ‍ॅण्ड आय : एस. हुसैन झैदी,
हार्पर कॉलिन्स, नवी दिल्ली,
पाने :  २०६, किंमत : ३५० रुपये.