ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या जन्मदिनी ज्या वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात आले त्यात भारतीय वंशाचे भौतिकशास्त्रज्ञ वैज्ञानिक तेजिंदर विर्दी यांना ‘नाइटहूड’ हा किताब देण्यात आला आहे. हिग्ज-बोसॉन (देवकण) कणाच्या प्रयोगात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तेजिंदर विर्दी हे लंडनच्या प्रख्यात इंपिरियल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा गौरव हा अणूच्या सूक्ष्म उपकणाचा (हिग्ज-बोसॉन) शोध घेण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रयत्नांचा सन्मान आहे. लार्ज हैड्रॉन कोलायडर या हिग्ज-बोसॉन कण शोधून काढण्याच्या प्रयोगात जे तीन प्रयोग करण्यात आले, त्यातील १९९१ मध्ये सुरू झालेल्या सीएमएस प्रयोगाचे ते प्रमुख संकल्पक होते. सीएमएस प्रयोग हा जीनिव्हात सर्नच्या लार्ड हैड्रॉन कोलायडरमध्ये करण्यात आलेल्या तीन प्रयोगांचा एक भाग होता. ३८ देशांच्या तीन हजार वैज्ञानिकांना एकत्र घेऊन समन्वयाने काम करणे सोपे नव्हते, पण वैज्ञानिकामध्येही नेतृत्वगुण असावे लागतात ते त्यांच्याकडे असल्याने हा प्रयोग पूर्णत्वास गेला. ‘प्रा. विर्दी हे इंग्लंडमधील एक प्रथितयश भौतिकशास्त्रज्ञ असून कॉम्पॅक्ट म्युऑन सॉलेनॉइड (सीएमएस) प्रयोगाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत व त्यांनी हिग्ज-बोसॉनच्या संशोधनात दिलेले योगदान मोलाचे आहे’, असे त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रात म्हटले आहे. कण भौतिकीमध्ये त्यांनी संशोधन केले असून विज्ञान शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी भारत व आफ्रिकेत काम केले आहे. विर्दी यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढल्यामुळे अणूच्या सूक्ष्म कणांचे विश्लेषण करणे शक्य झाले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत. त्यांच्या सीएमएस प्रयोगातील कार्याबद्दल त्यांना २००७ मध्ये ‘हाय एनर्जी फिजिक्स’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. युरोपिअन फिजिक्स सोसायटीने त्यांना २०१३ मध्ये सीएमएस प्रयोगातील नेतृत्वासाठी गौरवले, पण नाइटहूड किताबाची नजाकत त्यांच्यासाठी वेगळीच असणार यात शंका नाही. उधम कौर व चैन सिंग विर्दी यांचे पुत्र असलेल्या विर्दी यांचे शालेय शिक्षण केनियातील किसुमू बॉइज हायस्कूल येथे झाले. त्यांचे कुटुंब मूळ भारतीय असून केनियातील परिस्थिती बिघडल्यानंतर ते बर्मिगहॅमला आले. तिथे त्यांना हॉवर्ड स्टॉकले या शिक्षकामुळे भौतिकशास्त्राची गोडी लागली. त्यानंतर त्यांनी बी.एस्सी. पदवी घेतली. जगातील वैज्ञानिकांची पंढरी असलेल्या लंडनमधील इंपिरियल कॉलेजमधून त्यांनी पीएच.डी. ही पदवी संपादन केली. १९७९ मध्ये ते जीनिव्हातील सर्न प्रयोगात सहभागी झाले. विर्दी यांनी केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून संशोधन केले नाही, तर ते प्रत्यक्ष प्रयोगशाळेच्या रणांगणात उतरले व नायकाची भूमिका पार पाडली. त्यांनी लार्ज हैड्रॉन कोलायडर प्रयोगावर अनेक व्याख्याने दिली आहेत. विज्ञान समाजापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणारे प्रभावी संवादक म्हणूनही ते परिचित आहेत. ही त्यांची जमेची आणखी एक बाजू.