मराठी साहित्यात साठीचं दशक हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तसा अमेरिकन साहित्यात सत्तर-ऐंशीचा. या दशकांतल्या कथाकारांचा नंतरच्या कथाकारांवर मोठय़ा प्रमाणावर प्रभाव पडला. अ‍ॅन बीटी ही त्या अग्रेसर कथाकारांपैकीच एक. तिच्या कथांमधून तीक्ष्ण उपरोध आणि विसंगती यांचं दर्शन होतं.
सत्तर-ऐंशीची दशकं हा अमेरिकी कथालेखनाच्या पुनरुज्जीवनाचा काळ मानला जातो. रेमंड कार्वर, अ‍ॅन बीटी, रिचर्ड फोर्ड यांसारख्या लेखकांनी आपल्या मिनिमलिस्ट शैलीनं अमेरिकी कथेला एक वेगळं वळण दिलं आणि कथालेखनाला पुन्हा एकदा साहित्याच्या मुख्य धारेत आणून बसवलं. आपल्या ‘बेबी बुमर’ (पन्नास-साठच्या दशकात जन्माला आलेली पिढी) पिढीचे ते प्रमुख बखरकार ठरले. या लेखकांनी अमेरिकी लेखकांच्या नव्या पिढीवर मोठा प्रभाव पाडला. अजूनही अमेरिकी कथांमध्ये त्यांचे अनुयायी, नकलाकार सापडतात.
या पिढीतल्या लेखकांत अ‍ॅन बीटी नेहमीच अग्रेसर मानली गेली आहे. विद्यापीठात इंग्रजी साहित्यावर पदवी संपादन करत असताना अ‍ॅननं वयाच्या विशीत कथा लिहायला सुरुवात केली. तिनं आपल्या कथा ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकाला पाठवायला सुरुवात केली. नवे आणि प्रस्थापित लेखक आपलं लिखाण न्यू यॉर्करमध्ये प्रकाशित व्हावं म्हणून प्रयत्नशील असतात. त्यात कथा प्रकाशित होणं, म्हणजे एक प्रकारे आपल्या साहित्यिक दर्जावर शिक्कामोर्तब होण्यासारखंच मानलं जातं. तिच्या पहिल्या चार-पाच कथा परत आल्या, पण त्याबरोबर संपादकांनी ‘आम्हाला यापुढचं लिखाणही जरूर पाठवा’, ‘थेट संपादकांच्या नावानं पाठवा’ वगरे उत्तेजनार्थ टिपणंही जोडली होती. अखेर १९७६ साली तिची ‘अ प्लॅटॉनिक रिलेशनशिप’ नावाची कथा न्यू यॉर्करमध्ये प्रकाशित झाली. आणि बीटी आणि न्यू यॉर्करचा अनुबंध जुळला. पुढची तब्बल तीन दशकं कमी-अधिक वेगानं तिच्या कथा न्यू यॉर्करमधून प्रकाशित झाल्या. त्याच अठ्ठेचाळीस कथांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे.
या संग्रहातल्या ‘अ प्लॅटॉनिक रिलेशनशिप’ या पहिल्या कथेमध्ये आपल्याला इलेन नावाची तरुणी भेटते. तिचं एका वकिलाशी लग्न झालेलं आहे आणि ते दोघं उपनगरीय, सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत; पण इलेन खूश नाही. तिच्या मते याही पलीकडचं ‘एक चांगलं जग’ आहे. तिला तिचं स्वातंत्र्य हवंय. त्यामुळे ती नवऱ्यापासून वेगळी राहायला लागते. एका शाळेत कला शिक्षिकेची नोकरी पकडते. लवकरच एक वकिली शिकत असलेला, शांत, अबोल आणि काहीसा विचित्र स्वभावाचा सॅम नावाचा मुलगा तिचा रूममेट होतो. त्या दोघांमध्ये एक प्रकारची अशारीरिक जवळीक, आपलेपणा निर्माण होतो; पण एक दिवस सॅम तिला तो खूश नसल्याचं आणि शिक्षण सोडून त्याला मोटारसायकलवर भटकत अमेरिका पाहायची असल्याचं सांगतो. त्यामुळे सॅम निघून जातो आणि इलेन पुन्हा एकदा आपल्या नवऱ्याबरोबर राहायला लागते. एक दिवस रस्त्यावरून चालत असताना तिला मोटारसायकलवरून जाणारे तरुण-तरुणी दिसतात आणि ती आपण सॅमच्या मोटारसायकलवर मागे बसल्याची कल्पना करू लागते.
इथे इलेनला मिळालेलं स्वातंत्र्य कुठलाही संघर्ष न करता मिळालेलं आहे. ती घर सोडते, तेव्हा तिचा नवरा तिच्याशी भांडतसुद्धा नाही. उलट तो तिला घरही शोधून देतो. ती पुरुषांना नाकारते, पण त्यांच्याशिवाय कसं राहायचं, हेच तिला माहीत नाही. ती एकटी राहायला लागल्यावर तिला कळतं की, तिला एकटीला घरात भीती वाटत असते. ती शिक्षिकेच्या नोकरीतही रमत नाही. ज्या जगापासून तिला लांब जायचं असतं, त्याच जगाच्या आणखी जवळ आल्यासारखं तिला वाटत राहतं. तिला मिळालेल्या स्वातंत्र्याला पूर्णपणे अंगीकारण्यात ती असमर्थ आहे.
‘अ व्हिन्टेज थंडरबर्ड’ या कथेत आपली भेट निक आणि कॅरनशी होते. ते एके काळी एकमेकांच्या प्रेमात असतात, पण आता त्याचं रूपांतर मत्रीत झालेलं असतं. कॅरन आता त्यांच्या नात्याला मागे टाकून पुढे गेलेली असते, तर निक अजूनही भूतकाळातल्या गोड आठवणींत अडकून पडलेला असतो. ते एकत्र असताना कॅरननं एक उंची, जुनी थंडरबर्ड गाडी विकत घेतलेली असते. निकला खूपच आवडणारी ती गाडी कॅरन त्याला अधूनमधून चालवायला देत असते. त्या गाडीच्या माध्यमातून तो त्यांच्या भूतकाळाशी नातं कायम ठेवून असतो. त्यामुळे नवे नातेसंबंध निर्माण करणं त्याला कठीण जात असतं, तर कॅरनकडे असलेला पसा आणि स्वातंत्र्य तिला कुठल्याही नातेसंबंधाशी पूर्णपणे बांधील राहून देत नसतं. ती एका अर्थहीन प्रेमसंबंधापासून दुसऱ्या अर्थहीन प्रेमसंबंधापर्यंत भरकटत असते; पण जेव्हा जास्त विचार न करता ती थंडरबर्ड विकते, त्या क्षणी दोघांनाही आपल्या वर्तमान आयुष्याच्या दिशाहीनतेची जाणीव होते.
अ‍ॅनच्या कथांमधली पात्रं सामाजिक, आर्थिक बंधनांपासून मुक्त झालेल्या मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या जीवनावर, विचारांवर, आकांक्षांवर साठच्या दशकातल्या विद्रोही, मुक्त पिढीचा एक गाढ प्रभाव पडलेला दिसतो. मिळालेल्या स्वातंत्र्याचं अखेर काय करायचं, या संभ्रमात ही पात्रं सापडलेली दिसतात. शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक, लैंगिक स्वातंत्र्य मिळालेले हे लोक खऱ्या अर्थाने मुक्त होण्यापेक्षा भरकटलेल्या जहाजाप्रमाणे भासतात. आत्मकेंद्रीपणा, घटस्फोट, अनेक प्रियकर-प्रेयसी, मत्री-प्रेमसंबंध या नात्यांमधल्या धूसर झालेल्या रेषा यांमुळे त्यांचं भावनिक जीवन अधिक गुंतागुंतीचं झालेलं दिसतं. त्यामुळे ही पात्रं इतर कुठल्याही बाह्य घटकापेक्षा स्वत:शीच झगडताना दिसतात. त्यांना नक्की काय हवंय, हे शोधण्यासाठी अंधारात चाचपडताना दिसतात; परंतु जसजशी बेबी बुमर्सची ही पिढी मध्यम वयात पोहोचली तसतसे तिच्यात झालेले बदलही अ‍ॅनच्या नंतरच्या काळातल्या कथांमधून आपल्याला दिसून येतात. भरकटलेल्या तारुण्यानंतर अखेर या पिढीने घरदार, मुलं-बाळं अशा जबाबदाऱ्यांभोवती आपली मुळं पसरवल्याचं दिसून येतं. अ‍ॅन हेही परिवर्तन आपल्या कथांमधून सक्षमपणे आणि सूक्ष्मपणे मांडते.
या पुस्तकाच्या शेवटी अ‍ॅननं पॅरिस रिव्हय़ू या साहित्यविषयक नियतकालिकाला दिलेल्या विस्तृत मुलाखतीच्या संपादित अंशाचा समावेश करण्यात आला आहे. या मुलाखतीत तिनं आपला लेखनप्रवास, सत्तर-ऐंशीच्या दशकात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आलेले अनुभव, वाचकांशी असलेलं नातं, प्रेरणा, अशा अनेक विषयांवार दिलखुलास चर्चा केलेली आहे. ही संपूर्ण मुलाखत पॅरिस रिव्हय़ूच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तिथे इतरही अनेक दिग्गज लेखकांच्या मुलाखतींचा खजिना आहे. त्याला भेट द्यावी.
या कथा साधारण ३२ वर्षांच्या कालावधीत लिहिल्या गेल्या आहेत. पुस्तकात या कथा कालानुक्रमे घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकावरून आपल्याला अ‍ॅनच्या कारकिर्दीचं एक प्रकारे सिंहावलोकन करता येतं. अ‍ॅनकडे तीक्ष्ण उपरोध आणि विसंगती हेरण्याची विलक्षण प्रतिभा आहे. त्यामुळे तिच्या लेखनात आपल्याला अगदी अचूक, मर्मभेदी उपरोध सापडतात. त्यात कुठेही अलंकारिक उपमा, नाटय़मयता आढळत नाही. नेमक्या शब्दांत काहीशा त्रोटकपणे या कथा पुढे जातात. त्यामध्ये पात्रांची किंवा स्थळांची अवास्तव, अतिशयोक्त, विस्तृत वर्णनं कुठेही नाहीत. तरीही पात्रांची, त्यांच्या एकूण परिस्थितीची पूर्णाकृती उभी करण्यात अ‍ॅन यशस्वी होते. यातून तिची ओरिजिनॅलिटी, तसंच तिच्या लेखनाचं कौशल्यही दिसून येतं. त्यामुळे या कथांमध्ये एक प्रकारचा थेटपणा आणि गती आहे. ‘कथा’ या साहित्यप्रकारात रस असलेल्या वाचकांनी हा कथासंग्रह मिळवून जरूर वाचावा. त्यांचा सहसा अपेक्षाभंग होणार नाही.
द न्यू यॉर्कर स्टोरीज : अ‍ॅन बीटी,
प्रकाशक : स्क्रीब्नर, सायमन अँड शुस्टर,
पाने : ५३९, किंमत : ५९९ रुपये.