12 July 2020

News Flash

कथा अकलेच्या कायद्याची

पहिले पेटंट कुणी दिले? कुणाला? इटलीमध्ये मध्ययुगात सुरू झालेली ही पद्धत आधी युरोपात आणि मग समुद्रापार केव्हा गेली? हा इतिहासदेखील रोचक आहेच.. तो पेटंटबद्दल अधिक

| July 16, 2015 02:59 am

 

एकमेकांशी तात्काळ संवाद साधण्यासाठी भ्रमणध्वनी, जगाच्या कानाकोपऱ्यांत काय चालू आहे हे एका क्षणात आपल्यापर्यंत पोचवणारे चित्रवाणीसंच, संगणक, रावापासून रंकांपर्यंत सगळ्यांना परवडतील इतक्या प्रकारच्या कार्स, दुर्धर रोग दूर करणारी औषधे, विविध ऊर्जावर चालणारी उपकरणे.. तंत्रसाधनेतील अथक संशोधनामुळे आपल्यापर्यंत येणाऱ्या या सर्व वस्तूंमधील संशोधनाची राखण केलेली असते ‘पेटंट्स’ या बौद्धिक संपदेने. बौद्धिक संपदांचे ट्रेडमार्क्‍स, कॉपीराइट्स, इंडस्ट्रियल डिझाइन्स, भौगोलिक निर्देशक हे अनेक प्रकार आपण पहिले. पण या सर्व प्रकारांचा मेरुमणी म्हणजे पेटंट्स. वस्तूंचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यांचे अर्थकारण यावर दूरगामी परिणाम करणारी ही बौद्धिक संपदा.

पेटंट पद्धतीचे खांदे पुरस्कत्रे आहेत तसेच ही पद्धत मोडीत काढावी असे म्हणणारे लोकही. ‘आपल्याकडे जर पेटंट्स अस्तित्वात नसती तर त्यांच्या आíथक परिणामांची जाणीव झाल्यानंतर आपण ती अस्तित्वात आणावीत, असे अजिबात म्हटले नसते. पण ही पद्धत पूर्वापार चालत आलीच आहे तर ती आता नष्ट करणेही बेजबाबदारपणाचे होईल’ हे उद्गार आहेत फ्रित्झ माचलूप या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाने १९५८ मध्ये काढलेले. पण मुळात ही पेटंट पद्धत आली कुठून? ‘पूर्वापार’ म्हणजे कधीपासून?
इतिहास शोधत मागे जायचे झाले तर आपण ख्रिस्तपूर्व ५०० मधील ग्रीसमधल्या सायबेरीस या प्रांतात जाऊन पोहोचतो. हे खवय्यांचे गाव असावे. इथे जो कोणी नवी स्वादिष्ट पाककृती शोधून काढेल त्या बल्लवाला तिच्यावर एक वर्षांसाठी मालकी दिली जायची. म्हणजे, पुढील एक वर्ष दुसऱ्या कुणालाही तो पदार्थ बनवता यायचा नाही.
‘फिलिपो ब्रुनालेच्ची या आपल्या शहरातल्या असामान्य विद्वान कलाकाराने माल वाहतुकीसाठी एक नवे जहाज शोधून काढले आहे. आणि ते जहाज वापरायला सुरुवात केली तर अनेक लोकांना आपली ही कल्पना कळेल आणि लोक ती चोरतील या भीतीने ब्रुनालेच्ची हे जहाज दडवून ठेवत आहेत. म्हणून फ्लोरेन्स शहराचे आम्ही कौन्सिल सदस्य अशी आज्ञा देत आहोत की, आजच्या तारखेपासून पुढील तीन वष्रे केवळ फिलिपो ब्रुनालेच्ची यांना अशा पद्धतीने आपले जहाज मालवाहतुकीसाठी नदीवर, समुद्रावर किंवा इतर कुठल्याही जलमार्गावर वापरायचा अधिकार आहे. दुसऱ्या कुणीही अशा नव्या प्रकारचे जहाज वापरल्यास ते जाळून टाकले जाईल.’ ही वाक्ये आहेत १९ जून १४२१ रोजी बहाल करण्यात आलेल्या पहिल्या पेटंटमधली. आपल्या बुद्धीने लावलेल्या शोधावर संशोधकाला मक्तेदारी मिळावी, या मक्तेदारीला राजसत्तेने संरक्षण द्यावे, आणि या बदल्यात संशोधकावर त्याचे संशोधन आमजनतेला शिकविण्याची सक्ती करण्यात यावी, ही आधुनिक पेटंट कायद्यातील संकल्पना केवढी जुनी आहे हे पाहिले की आपण थक्क होऊन जातो.
फिलिपो ब्रुनालेच्ची हा इटलीतील एक सुप्रसिद्ध शिल्पकार होता. फ्लोरेन्स या शिल्पाकृतींनी नटलेल्या गावातील किती तरी उत्तमोत्तम शिल्पे ब्रुनालेच्चीने घडवलेली आहेत. या शिल्पांचा शिरोमणी म्हणजे त्याने घडवलेला येथील जगप्रसिद्ध द्युओमो. करारा हा इटलीमधील प्रांत उत्तम संगमरवरासाठी आजही सुप्रसिद्ध आहे. आपल्या या द्युओमोच्या घुमटासाठी ब्रुनालेच्चीला करारा येथून संगमरवर आणायचा होता. फ्लोरेन्स हे आर्नो नदीच्या तीरावर वसलेले गाव. करारा येथून पिसा येथे आणि तेथून जलमार्गाने या आर्नो नदीतून फ्लोरेन्सला संगमरवर आणता यावा म्हणून ब्रुनालेच्चीने एक खास जहाज बनवले. आणि त्यावर त्याला मक्तेदारी देण्यात आली. हे मानवी इतिहासातील पहिले पेटंट समजले जाते, पण हा संगमरवर वाहून आणता आणता हे जहाज नदीत बुडाले आणि त्याबरोबरच फ्लोरेन्सची पेटंट पद्धतही बुडाली!
पण पहिला पेटंट कायदा म्हणाल तर तो संमत केला गेला इटलीमधल्याच व्हेनिस येथे १४७४ मध्ये. या कायद्याचा मसुदा हा पेटंट कायद्याच्या अभ्यासकांसाठी फार वाचनीय आहे. यात लिहिले आहे : ‘असे जाहीर करण्यात येते की जो कुणी या शहरात कुठलीही नावीन्यपूर्ण वस्तू संशोधन करून बनवील आणि अशा प्रकारची वस्तू जर याआधी कुणीही बनवलेली नसेल, तर त्याने अशा वस्तूवर प्रयोग करून ती योग्य रीतीने काम करते आहे हे सिद्ध करावे. त्यानंतर राज्याच्या जनकल्याण मंत्रालयाला त्याची कल्पना द्यावी. मग, या संशोधकाची परवानगी घेतल्याशिवाय राज्यात त्याच प्रकारची वस्तू दुसऱ्या कुणालाही पुढील दहा वष्रे बनविता येणार नाही. जर कुणी या आज्ञेचा भंग केला तर मूळ संशोधक असे करणाऱ्या व्यक्तीला या शहरातील दंडाधिकाऱ्यामार्फत बोलावू शकेल आणि त्याला १०० डय़ुकाट इतका दंड केला जाईल. तसेच त्याने चोरून बनविलेल्या वस्तूची विल्हेवाट लावली जाईल. परंतु सरकारला गरज पडल्यास मात्र अशी वस्तू संशोधकाकडून घेऊन वापरण्याची सरकारला मुभा असेल.’
अतिशय वैशिष्टय़पूर्ण कायदा होता हा. त्याचे पहिले वैशिष्टय़ असे की तो लॅटिनमध्ये नव्हे तर व्हेनेशियन या स्थानिक भाषेत लिहिलेला होता. म्हणजेच तो विद्वानांसाठी नव्हे तर त्या भागातील कारागिरांसाठी आणि सामान्य व्यक्तींसाठी होता आणि दुसरे विशेष म्हणजे आधुनिक पेटंट कायद्यातील एकूण एक वैशिष्टय़ांचा त्यात अंतर्भाव झालेला होता.
व्हेनिसमधल्या कारागिरांसोबत तिथली पेटंट पद्धत ही सगळ्या युरोपात पसरली. आणि सन १६०० च्या आसपास जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इंग्लंड या सगळ्या देशांनी आपापले पेटंट कायदे निर्माण केले. १५ ते १६ व्या शतकाच्या दरम्यान पहिल्या राणी एलिझाबेथच्या आधिपत्त्याखालील इंग्लंड हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश होता, औद्योगिकीकरणाच्या बाबतीत आपल्या इतर युरोपीय शेजारी देशांच्या मानाने मागे होता. म्हणून कुशल परदेशी तंत्रज्ञांना आकर्षति करण्यासाठी राणीने पेटंट कायद्यानुसार मक्तेदारी देऊ केली. त्यानंतर मात्र या क्षेत्रात आपपरभावाचे पेव फुटले. राणीच्या जवळच्या चमच्यांना धडाधड पेटंट्स दिली गेली तर इतरांना नाकारली गेली. सर वॉल्टर रॅली या राणीच्या खास प्रेमातील सरदाराला तर चक्क अमेरिकेतील व्हर्जििनया प्रांतात वस्ती वसविण्यासाठी पेटंट देण्यात आले. आणि याने लोकांत प्रचंड नाराजी पसरली. इंग्लंडच्या या पेटंट कायद्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले १८५२ मध्ये.
इंग्लंडच्या पेटंट पद्धतीने प्रेरित होऊन इकडे अमेरिकन वसाहतीही पेटंट देऊ लागल्या होत्याच. आणि नंतर मग यातून प्रथम अमेरिकन राज्यांपुरती मर्यादित आणि मग देशाची फेडरल पेटंट पद्धती उदयास आली. १७९० मध्ये अमेरिकेचा पेटंट आणि कॉपीराइट कायदा पारित झाला तो मॅडिसन आणि िपकने या दोन सेनेटर्सच्या पुढाकाराने. पण थॉमस जेफरसन हे त्यांचे सहकारी मात्र असली मक्तेदारी देणाऱ्या कायद्याच्या विरोधात होते. पण लवकरच त्यांना याचे महत्त्व समजले आणि पुढे त्यांनी अमेरिकन पेटंट कायद्याच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. या कायद्यात पुढे १७९३, १८३६, १८७० आणि १९५२ व शेवटी २०११ मध्ये सुधारणा करण्यात आल्या.
स्वत:च्या नावावर पेटंट असलेले सर अब्राहम िलकन हे कदाचित एकमेव राष्ट्राध्यक्ष असावेत! िलकन स्वत: संशोधक होते आणि त्यांच्या नावावर, जहाजांना अडथळा आल्यास जहाज तरंगते करता येणाऱ्या एका युक्तीचे पेटंटही होते. िलकन यांच्या मते तर पेटंट पद्धती अस्तित्वात येणे ही जगाच्या इतिहासातील तीन महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक ठरावी. (अमेरिकेचा शोध आणि छपाईचे तंत्रज्ञान या अन्य दोन घडामोडी). अशा या पेटंट पद्धतीचे फायदे आणि तोटे कोणते, परिणाम कोणते आणि दुष्परिणाम कोणते, पेटंट कशाला मिळते आणि कशाला नाही, निरनिराळ्या देशांचे पेटंट कायदे कसे आहेत, पेटंट्समुळे वस्तूंचे अर्थकारण कसे बदलते, विकसित आणि विकसनशील देशांमध्ये याबाबत कोणते वाद आहेत हे आपण पुढच्या काही लेखांत विस्ताराने पाहणार आहोत..

लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
ईमेल mrudulabele@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2015 2:59 am

Web Title: the story of the intellectual law
Next Stories
1 मुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..
2 फक्त ‘कलाकार’ म्हणा!
3 सख्खे शेजारी!
Just Now!
X