वास्तवाकडे कलावंत पाहतो, कलाकृतीकडे प्रेक्षक / वाचक पाहतो. कलेनं दिलेली जबाबदारी कलावंतानं स्वीकारलीच नसेल, तर ते प्रेक्षकाला कळतं. सामाजिक- राजकीय आशयाच्या कलेत ‘बांधीलकी’पेक्षा ही जबाबदारी महत्त्वाची ठरते. ती पार पाडणारे अनेक जण आज आपल्यात आहेत! भावकाव्याच्या रसिकाला राजकीय आशयाकडे नेण्याची ताकद असलेला एखादा अमर कन्वरही आहे..
‘गर्द सभोती रान साजणी
तू तर चाफेकळी ’
ही बालकवींची कविता किंवा
‘वाढत्या सांजवेळे
नये पाण्याला ग जाऊ’
ही बा. भ. बोरकर यांची कविता, ही उत्तम भावकाव्ये आहेत. त्यांच्या पहिल्या ओळी अनेकांना आठवतात, अनेकदा मनात रुंजी घालतात. मध्यंतरी अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच्या बातम्यांचं प्रमाण वाढलं होतं, तेव्हासुद्धा याच पहिल्या ओळी कुणाला आठवल्या असतील, त्या बातम्यांमधून आपल्या मुलीबाळींबद्दल जी चिंता वाटली- वाढली त्या चिंतेशी या पहिल्या ओळींचे सूचक अर्थ जुळून त्या ओळी अगदी छळू लागल्या असतील, तर त्यांची रसिकताच अनाठायी ठरवा वी काय?
बालकवींच्या कवितेत चाफेकळीभोवतीच्या गर्द रानाने चिंतित झालेल्या राजाला (नृपाळाला) ‘ती वनमाला’ आत्मविश्वासाने सांगते की तू ज्याला रान म्हणतोस ते माझे घरच आहे. बोरकरांच्या कवितेत चिंता आहे, पण माझी प्रेमभावना तुझ्यापासून कशी वाचणार ग, असा त्या चिंतेचा गाभा आहे!
बालकवी ते बोरकर या कवींचं विचारविश्व, त्यांचं भावविश्व आदर्शवादी, स्वच्छंदतावादी होतं, हे आपल्याला माहीत असतं (अगदी या शब्दांत नसलं तरी, माहीत असतं!) म्हणून आपण त्यांच्या कवितेतली एकच ओळ आठवून चिंतातुर होणं नाकारतो. पण समजा, आजच्या एखाद्या कवीनं इतक्याच रुंजी घालणाऱ्या मृदू शब्दांत, इतक्याच नादमय यतिभंगाच्या वळणानं ‘दिल्ली घटने’वरची कविता लिहिली तर? त्या कवितेवर नापसंतीच व्यक्त होण्याचा संभव अधिक, कारण ‘सामाजिक भावकाव्य’ असा काही प्रकार आपण (चित्रकलेखेरीज अनेक विषयांत गती असलेले मराठी भाषक) मान्य करत नाही. केलेला नाही. तसा प्रश्नच आलेला नाही. किंवा आपण तसा प्रश्न येऊ दिलेला नाही.
अशी एकंदर आपली स्थिती आहे. एखादा सामाजिक आजार किंवा एखादी राजकीय जखम हा कलाकृतीचा आधार जर आहे, तर तो आधार घेणाऱ्या कलावंताने फक्त सामाजिक / राजकीय आशय मांडावा, अशी आपली अपेक्षा बहुतेकदा असते. इतकेच नव्हे तर, लगेच तो कलावंत डावा की उजवा, कुठल्या संघटनेचा वा कोणा विचारवंताचा प्रभाव त्याच्यावर आहे की नाही, याचीच चिकित्सा होते. कवितेत प्रज्ञा दया पवार किंवा चित्रकलेत सुधीर पटवर्धन यांना या असल्या चिकित्सेचा त्रास झाला का, किंवा त्रास होऊ नये यासाठी या दोघांनी काही मार्ग आधीपासूनच शोधले आहेत ते कोणते, याचे कुतूहल फार कमी जणांना असते. कलाकृती घडवताना कलाकृतीच्या म्हणून काही मागण्या असतात, किंबहुना भाषणे वा प्रचार करण्याऐवजी कलाकृती घडवणे हा मार्ग कलावंतावर कलेची (राजकीय वा सामाजिक नव्हे) जबाबदारी टाकत असतो. ती जबाबदारी त्यांनी ओळखली की नाही, हा प्रश्न सामाजिक/ राजकीय आशयाच्या कलेची चिकित्सा करताना अनेकदा झाकोळून जातो. मग, एकतर सामजिक बांधीलकी म्हणून उदो उदो करायचा, नेमकी कशाशी बांधीलकी हे शोधून काढून हे बांधीलपण ‘माझिया जातीचे’ असेल तर अधिकच डोक्यावर घ्यायचे किंवा मग कलावंताची ग्रेस यांच्यात नाहीच, हे रसिकांचे हृदयनाथ नव्हेतच, अशी खूणगाठ बांधून टाकायची हा आपला शिरस्ता आहे. पवार (प्रज्ञा आणि काही प्रमाणात संजय), पटवर्धन या असल्या खूणगाठींच्या पलीकडे जाऊ शकले. थेट राजकीय, सामाजिक वास्तव मांडूनही ते ‘कलावंत’ राहू शकले.
अमर कन्वर हा सामजिक / राजकीय आशय मांडणारा कलावंत असूनही तो प्रचारकी का ठरत नाही, याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इथे पटवर्धन वा पवार उपयोगी पडणार आहेत. राजकीय आशय म्हणजे, त्याने सरळ पंजाबच्या सरदारांना ‘कौम’ का महत्त्वाचा वाटतो, याच प्रश्नाला हात घातला होता! किंवा मणिपूरमध्ये सततच्या दंडेलीचा आणि महिलांवरील पोलिसी अत्याचारांचा निषेध म्हणून आसाम रायफल्सच्या प्रवेशदारासमोर ‘करा, करा आमच्यावर बलात्कार’ असे कापडी फलक घेऊन निर्वस्त्र निदर्शने करणाऱ्या स्त्रियांनी इतके मोठे पाऊल का उचलले, याची उकल करावी असे अमरला वाटले होते. यासाठी त्याने फिल्म (लघुपट) या माध्यमाचा आधार घेतला.
‘होय, मला राजकीय वास्तव छळते, पण कला म्हणून काही आहे, ते माझे क्षेत्र आहे. म्हणून पंजाबच्या फिल्ममध्ये माझे पंजाबी असणे आड न येता, उलट दृश्ये निवडण्यासाठी त्याची छान मदतच झाली,’ असे काहीतरी अमर एकदा दिल्लीत, भर परिसंवादात आणि ‘अमर कसा अव्हां गार्द आहे’ याचे कौतुक असणाऱ्या गीता कपूर यांच्यासमोर बोलला होता, तेव्हा त्याच्या प्रेरणा पारदर्शक आहेत आणि ‘राजकीय आशयाच्या कले’वर लादलेल्या अपेक्षा एखाद्या कोठडीइतक्याच गडद, अपारदर्शक आहेत, अशी लख्ख जाणीव झाली होती.
हे एकदा समजल्यावर, अमरच्या अन्य कलाकृती पाहणे सोपे जाणार असे वाटू लागले. पण तोवर तो फक्त फिल्म न दाखवता, मांडणशिल्प आणि फिल्म यांची सांगड घालू लागला होता. मोठी पुस्तके, त्या उघडय़ा पुस्तकांवर स्लाइड शोच्या तंत्राने दाखवली जाणारी दृश्ये, अशी गुंफण करू लागला होता. अमरला ‘मीडिया’त चर्चा होणाऱ्या घटनाच महत्त्वाच्या का वाटतात, अशी एक शंका कुणाला असलीच, तर तिचे उत्तर आता अधिक सशक्तपणे मिळू लागले होते. घटना भले मीडियात चर्चा झालेली असेल, पण एखाद्या घटनेचा वेध घ्यायचे ठरवले की तिचा किती सर्वागीण अभ्यास अमर करतो, ती घटना घडण्यास जी परिस्थिती कारणीभूत झाली त्या परिस्थितीशी तो किती समरसून जातो, हे दिसण्याच्या आणखी वाटा प्रेक्षकाला अमरच्या या नव्या मांडणशिल्पांतून मिळू लागल्या!
आस्रेलर-मित्तल कंपनीने ज्या ओडिशा राज्यातून आपला प्रकल्प गेल्याच आठवडय़ात काढून घेतला, तिथे- अगदी त्या भागात- अमर कन्वर तीन वर्षांपूर्वीच पोहोचला होता. हा भाग आदिवासीबहुल, पण इथे तांदळाच्या २६६ जाती आहेत! निसर्गाच्या साथीने मानवही जैव-विविधतेच्या वाढीला कारणीभूत होतो म्हणजे काय, हे या २६६ तांदूळजाती पाहून कळावे. अमरने या सर्व जातींचे तांदूळ मांडणशिल्पासारखे मांडले. एक स्व-निर्मित पुस्तकही ठेवले, तांदळाच्या जातींची नावे एकमेकांशी कशी संबंधित असतील, याची संगती साधणारे. सोबतीला एक फिल्म- मूकपट! फक्त काही शीर्षके, बाकी ओडिशाचा निसर्ग. हे सारे नष्ट होणार, याची दुखरी जाणीव प्रेक्षकांना देणारी निसर्गदृश्ये. अमरची ही कलाकृती जर्मनीतल्या ‘डॉक्युमेन्टा’ या अव्वल महाप्रदर्शनात दिसली. पुढे भारतातल्या पहिल्यावहिल्या कोची-मुझीरिस बिएनालेमध्ये तिची आवृत्ती मांडली गेली आणि नंतर म्हणे शारजा बिएनालेतही याच आवृत्तीचा सहभाग होता.
अमर यापुढे काय करील नेम नाही. काहीही करील. कदाचित इशरत जहानबद्दल फिल्म बनवील तो! त्याच्या प्रत्येक कलाकृतीशी आपले किंवा आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांचे राजकीय कल जुळतीलच असं नाही. मतभेद असतीलच आणि ते ‘याला हेच कसं काय महत्त्वाचं वाटलं?’ या प्रश्नापासून सुरू होणारे असतील. अमरच्या बाबतीत हे आक्षेप पूर्वीही आले आहेत, पण त्याच्या एकंदर कामाकडे पाहताना त्याचं म्हणणं आपण ऐकतो की नाही, हे अधिक महत्त्वाचं ठरतं. एकमेकांचं ऐकायचंच नाही आणि आपलंच घोडं दामटायचं (घोडं = संघटना/ उमेदवार / बाइक/ मारुती स्विफ्ट) या आजच्या रीतीचे आपण सामील ‘लाभार्थी’ आहोत, हे किंचितकाळ विसरायला लावण्याची ताकद अमर कन्वरच्या अनाग्रही, पण सांगत्या कलाकृतींमध्ये आहे.
त्याच्या कलाकृती म्हणजे जणू भावकाव्यच, असं कुणाला वाटेल. वाटू देत! (आपण कुणा- कुणाला थोपवणार?!) पण भावकाव्य पडद्यावर नाही, अमरच्या निर्णयांत आहे, हे लक्षात असलेलं बरं.
आणि हो, कलाकृतीबाबत कलावंताचा आणि / किंवा प्रेक्षक वाचकाचा निर्णय अथवा ‘अप्रोच’ महत्त्वाचा ठरणार हे एकदा लक्षात घेतलं की मग दिल्लीच्या त्या बसमध्ये, पुरुषी उन्मादाच्या रानात  कुणाला ‘चाफेकळी’ दिसू लागली तर ते अनाठायी ठरू नये.