‘स्वप्निल राजकारणाच्या मर्यादा’ हा गिरधर पाटील यांचा लेख (२१ मे) वाचला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर सर्वच विचारवंतांनी मोदींचा झंझावाती प्रचार, काँग्रेसचा नाकर्तेपणा, संघ परिवाराचे योगदान आदी कारणांचा ऊहापोह केला आहे.  हे करीत असतानाच काँग्रेस आता संपली असे भाकीतही काही जणांनी वर्तविण्याची घाई केलेली आहे.  हे खरे आहे की आजच्या घडीला काँग्रेसकडे कणखर, सुजाण नेतृत्व नाही, तसेच कालानुरूप नवविचारही नाही.  मात्र काँग्रेसचे संघटन आजही अस्तित्वात आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  आजही काँग्रेसमध्ये देशहिताचा विचार करून कामं करणारी माणसं आहेत.  तेव्हा काँग्रेस संपली या तर्कापर्यंत आताच येणे योग्य होणार नाही.  आणखी पाच वर्षांनी कदाचित हे भाकीत खरे होऊ शकते.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजून एक निष्कर्ष काढण्याची घाई विचारवंतांना झालेली आहे.  ती म्हणजे काँग्रेसला पर्याय म्हणजे आप पक्ष.  सर्वसामान्यांच्या मनात आपबद्दलची विश्वासार्हता, अपेक्षा याबद्दल उगाचच शब्दच्छल केला जातो. आपचे अरिवद केजरीवाल व इतर बोलभांड नेते, कार्यकर्ते हे केवळ आरोप करण्यापलीकडे काहीच करीत नाही. आपण सोडून सर्व राजकारणी भ्रष्ट आहेत, प्रत्येक श्रीमंत व्यक्ती वाईटच आहे आणि त्याच श्रीमंत व्यक्तीने आपल्या पक्षाला देणगी दिली की ती चांगली होते.  या असल्या भ्रामक विचारांनी फार काळ लोकांना फसवता येत नाही. काँग्रेसचे सरकार सत्तेत असेपर्यंतच आपचे अस्तित्व अवलंबून होते.
 विरोध नक्की कोणाला व कोणत्या कारणासाठी करावयाचा हेच न समजल्याने आपची आत्मविस्मृत अवस्था होईल.  मोदींच्या काळात विरोधकांची गरजच वाटणार नाही असे जनतेला वाटते आहे व म्हणूनच त्यांनी तसा कौल दिला आहे.  तेव्हा उगाचच तो शोधण्याचा प्रयत्न आपण न करणे सयुक्तिक ठरेल.

नाममात्र विरोधकांचा विरोध काय करणार?
‘मोदींच्या शपथविधीला यायचं हं!’ (२२ मे ) आणि ‘मोदी यांचा शपथविधी : काँग्रेस व जयललिता यांची टीका’ (२३ मे) या बातम्या वाचल्या. आपल्या शपथविधीला ‘सार्क’ सदस्यांना आमंत्रित करून काहीशा थिजलेल्या भारतीय परराष्ट्र धोरणात मोदींनी जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे खरे तर जनतेने आणि ‘नाममात्र’ विरोधकांनीही स्वागतच करावयास हवे. पण, विरोध हाच आमचा स्थायीभाव आहे या आविर्भावात वावरणाऱ्या राजकीय पक्षांची आपल्या देशात अजिबात वानवा नाही. करुणानिधी असो किंवा मग त्यांना धूळ चारणाऱ्या जयललिता असो, हे नेहमीच आपल्या अखत्यारीत नसलेल्या ‘भारत-श्रीलंका’ प्रश्नावर केंद्र सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न का करतात      हे सर्वश्रुत आहे. राहिला प्रश्न काँग्रेसचा. तर त्यांनी खरे तर, नरेंद्र मोदींनी धोरणलकव्याच्या उपचारास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आभार मानावयास हवे.
अतिरेक्यांचा सुळसुळाट, काश्मीर प्रश्न आणि अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या माघारीनंतर या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात मत्रीपूर्ण संबंध असणे गरजेचे आहे. मोदींनी ही चलाख खेळी करून ‘चेंडू’ पाकिस्तानच्या पारडय़ात पाठवून त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. त्यात सकारात्मक प्रतिसाद आला तर उत्तम नाहीतर ‘आम्ही प्रयत्न केला पण ..’ अशी सबब पुढे करून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उघडे पाडता येईल. कुठल्याही विरोधाची तमा न बाळगता ‘मोदी’ सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहून पुढील वाटचालीची कल्पना करून दिली आहे. घटक पक्ष असो वा नसो, प्रादेशिक पक्षांनी परराष्ट्र धोरणात नाक खुपसण्याचे काहीच कारण नाही. तसेही ‘मोदी’ सरकारकडे आकडे असल्यामुळे हे ‘नाममात्र’ विरोधक ‘नाममात्र’ विरोध करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाहीत.
विशाल भगत, नाशिक

मनसेचे इंजिन पुन्हा यार्डातच!
‘लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत नाही’ ही बातमी (२२ मे) वाचली. एवढय़ा दारुण पराभवानंतरही मनसेला वेडी आशा वाटते आहे असेच म्हणावे लागेल.   राज ठाकरे आणि मनसे या पक्षाने गेल्या आठ वर्षांत काहीही काम केलेले नाही याची पोचपावती मतदारांनी या वेळी दिली. राज म्हणतात मला संपूर्ण सत्ता द्या, बघा कसा बदल घडवतो ते. नाशिक महानगरपालिकेत पूर्ण सत्ता असूनही हा पक्ष तिथेही निष्प्रभ ठरला. त्यामुळे केवळ तोंडाची हवा दवडणाऱ्या पक्षाच्या इंजिनातून कोणतीच हवा बाहेर पडण्याची शक्यता नाही. तेव्हा येत्या निवडणुकीतही हे इंजिन यार्डात जाणार हे सांगायला आता कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही.
गार्गी बनहट्टी, दादर

हा लोकशाहीचा दुर्गुण?
अरविंद केजरीवालांना तिहार जेलमध्ये पाठवलंय. सगळेच लोक आणि माध्यमे केजरीवालांच्या या अटकेला राजकीय डाव म्हणत आहे. खरे म्हणजे सर्वाना माहीत आहे की गडकरींनी  ‘पूर्ती’प्रकरणात गैरप्रकार केले आहेत. पण या लोकशाहीत ते बोलून दाखवणारा तुरुंगात जातो आणि गैरप्रकार करणारा त्यावर हसतो. याला लोकशाहीचा दुर्गुणच म्हणता येईल का?
उद्धव होळकर ,औरंगाबाद

सरकारी यंत्रणेला आता धाक बसेल?
कोणालाही नक्षलवादी ठरवण्याच्या गृहखात्याच्या अजब निर्णयाच्या विरोधात न्यायालयाने जो निवाडा दिला, त्यासंबंधीची बातमी  (२३ मे) वाचली. सर्वसामान्य आणि निरपराध माणसांना अतिरेकी ठरवून त्यांना खरोखरीचे अतिरेकी बनायला भाग पाडणाऱ्या सरकारी यंत्रणेला या निर्णयाने धाक बसेल आणि निरपराध व्यक्तींना आपले कोणीतरी ऐकते, आपल्याला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटेल. अशाच प्रकारे न्याय करण्याची शक्ती उत्तरोत्तर वाढत जाणे राज्याच्या हिताचे आहे.
अ‍ॅड. अण्णासाहेब लेले, कळवा

मग त्याला मदर टेरेसाही अपवाद नकोत..
‘अंनिसला स्थानमाहात्म्य इतके महत्त्वाचे वाटते’ हे  पत्र (लोकमानस, ७ मे) वाचले. पुण्याव्यतिरिक्त दादर, शहादा, नाशिक अशा अनेक शाखांमध्येही निषेध व्यक्त केला गेला. स्थानमाहात्म्याचा हेतू असता तर कार्यकर्त्यांनी तात्काळ तिकिटे काढून पुण्यातच जाऊन निषेध केला असता. देवकी देशमुख, ‘चमत्कार’.. हे फसवेगिरीचे दुसरे नाव. दैवी नाव- हा फसवेपणा कोणीही केला, तरी तो फसवेपणाच! मग त्याला  मदर टेरेसा – याही अपवाद का ठराव्यात? आक्षेप घेण्याचा हेतू हा केवळ चमत्काराच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक व शोषण यांना केलेला विरोध होय! जाहिरातीचा विरोध हा अंनिसनेनव्हे तर माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी केला होता.
अनुजा मंगल दत्ता, गिरगाव