गेल्या दोनेक दशकांमध्ये चित्रपट बदलला त्याचे श्रेय संगणकीय ‘स्पेशल इफेक्ट्स’, कॅमेऱ्यांच्या अद्ययावत आवृत्त्या आदी आधुनिक तंत्रज्ञानाला दिले जाते, त्याहून कैक पटींनी हॉलिवूडमधून जगभर वेगवान अ‍ॅक्शन चित्रशैली निर्यात करणाऱ्या क्वेन्टीन टेरेन्टीनो, रिडली स्कॉट, जॉन वू आदी दिग्दर्शकांच्या फळीला दिले जाते. यातला महत्त्वाचा आणि फारच अज्ञात राहिलेला भाग म्हणजे या सर्व दिग्दर्शकांच्या निर्मितीची प्रेरणा ही हॉलीवूडऐवजी पूर्वेकडील कंग फू चित्रपट आहे. हाँगकाँगमधील ‘शॉ ब्रदर्स’ यांच्या फॅक्टरीमधून १९६० साली ‘कंग फू’ या चित्रप्रकाराने जन्म घेतला. हाणामारीच, पण शिस्तबद्ध- आकर्षक- तालबद्ध आणि डोळ्यांसमोर चमत्कार घडविणाऱ्या मार्शल आर्ट्सच्या कौशल्याने सजविणाऱ्या या चित्रप्रकाराला ब्रूस ली नंतर जॅकी चॅन, जेट ली या त्याच्या अनुकर्त्यांनी जागतिक परिमाण दिले. या चित्रप्रकाराची घाऊक निर्मिती करून त्याला जगभरात मान्यता मिळवून देण्याचे काम रन रन शॉ या उद्योगी चित्रकर्त्यांने खऱ्या अर्थाने केले.
कापडविक्रेत्या चिनी कुटुंबात जन्म घेतलेल्या या उद्योजकाने १९२० साली आपल्या भावांसोबत मूकचित्रपट निर्मितीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. दुसऱ्या महायुद्धानंतर हाँगकाँगलाच कर्मभूमी मानून तेथे त्यांनी प्रतिहॉलीवूडची स्थापना केली. फ्रेन्च न्यू वेव्हमधून मुरलेल्या कलात्मक चित्रपटांचा प्रवाह आणि दुसऱ्या बाजूला हॉलिवूड स्टारडम युगाची लोकप्रियता असणाऱ्या काळात १९६१ साली हाँगकाँगमध्ये हॉलीवूड स्टुडिओच्या वैभव, श्रीमंती आणि सुविधांना लाजवेल अशी सव्वा हजार एकरांची  ‘शॉ मुव्हीटोन’ नामक चित्रसंस्था शॉ यांनी उभारली.
एका बाजूला अवजड वैचारिक डोस पाजणारा कलात्मक चित्रपट आणि दुसऱ्या बाजूला भपकेबाज, खर्चीक निर्मितीतून भव्य-दिव्यतेची नवनवी क्षितिजे तयार करणारा व्यावसायिक चित्रपट यांच्यामध्ये विशुद्ध पैसावसुली मनोरंजन, मारहाणीच्या शिस्तबद्ध कवायती कंग फू चित्रपटांनी प्रेक्षकाला पाहायला दिल्या. हाँगकाँगमधील पहिले टीव्हीबी हे टीव्ही नेटवर्क त्यांनीच उभारले आणि आग्नेय आशियाई देशांत बडय़ा शैक्षणिक, आरोग्य संस्थांची उभारणी त्यांनीच केली. खगोल, औषधशास्त्र आणि विज्ञानातील संशोधनासाठी आशियाई नोबेल म्हणून ओळखला जाणारा ‘शॉ पुरस्कार’ त्यांच्या नावे दिला जातो. खाशा प्रसिद्धीझोतापासून लांब राहत दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या सांस्कृतिक सामाजिक उन्नत्तीसाठी आयुष्यभर राबणाऱ्या शॉ यांचे नुकतेच १०६व्या वर्षी निधन झाले. आजचा जॉन वू ते जॉनी टो यांचा समृद्ध हाँगकाँगचा सिनेमा असो किंवा व्हाया हॉलिवूड, दक्षिण भारतीय चित्रशैली अंगीकारत बदललेला रोहित शेट्टीचा हिंदी मारधाडपट असो, त्याला रन रन शॉ यांचा ऋणाईतच राहणे भाग आहे.