जंकफूडचे माहेरघर असलेल्या अमेरिकेत राहूनही बदामाचे दूध, गाजर, हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त धान्ये असा आहार आणि योगसाधना, यांच्या बळावर स्वत:चे आरोग्य टिकवणारे डॉ. विवेक मूर्ती आता अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक- सर्जन जनरल- म्हणून शपथ घेत आहेत! अमेरिकी महाशल्यचिकित्सक म्हणजे ज्याच्या सहीशिवाय तेथील आरोग्याबाबतच्या योजनांचे पानही हलत नाही आणि तिन्ही सेनादलांचे आरोग्यही ज्यांच्या निर्णयांवर अवलंबून असते, असे बडे पद. अमेरिकेत १८७१ पासून असलेल्या या पदावरील मूर्ती हे १९वी व्यक्ती. अध्यक्ष बराक ओबामा यांनीच त्यांना या पदासाठी नोव्हेंबरात नामांकन दिले; तर भारतीय वंशाच्या डॉक्टरांसह अमेरिकी काँग्रेसजनांचाही पाठिंबा त्यांच्या नावास मिळाला.
 मूर्ती यांचा जन्म ब्रिटनमध्ये हडर्सफील्ड गावात झाला, पण ‘विवेक हाळगिरी मूर्ती’ या त्यांच्या पूर्ण नावात कर्नाटकातील हाळगिरी हे मूळ गाव कायमचे राहिले! अमेरिकेतील मायामीत (फ्लोरिडा) मूर्ती कुटुंबीय आले, त्या वेळी विवेक अवघे तीन वर्षांचे होते. याच देशात १९९४ मध्ये पदवी घेतल्यानंतर ‘येल स्कूल ऑफ मेडिसीन’ या संस्थेतून एमडी, तर ‘येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतून २००३ मध्ये एमबीए झाले. प्रथम बर्मिगहॅम येथे, मग बोस्टनच्या महिला रुग्णालयात काम करीत होते. ‘डॉक्टर्स ऑफ अमेरिका’ या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अमेरिकी अध्यक्षांना आरोग्य-धोरणविषयक सल्ला देणाऱ्या समितीत त्यांचा समावेश होता. वैद्यकीय क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान सुविधांचीही जाण त्यांना आहे. १९९५ मध्ये त्यांनी एड्स प्रतिबंध व जनजागृती या क्षेत्रात मोठे काम केले, त्यासाठी त्यांनी व्हिजन्स वर्ल्डवाइड ही स्वयंसेवी संस्था काढली, या संस्थेचे कार्य भारतातही आहे.
मूर्ती हे एवढे मोठे डॉक्टर असले, तरी त्यांच्यात मुळीच गर्विष्ठपणा नाही. ते पोरसवदा होते तेव्हा त्यांचे अनेक मित्र प्रेमात पडणे, विवाह, संसार-मुलेबाळे अशी नेहमीचीच मळलेली पायवाट धरत होते पण मूर्ती ‘अंकल’ हे अनेकांना भेटवस्तू पाठवायचे, प्रत्येकाचा आनंदाचा क्षण साजरा करायचे. आरोग्यासारख्या जीवन-मृत्यूच्या क्षेत्रात राहूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व सदाबहार आहे. राजकीयदृष्टय़ाही डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांचे समर्थन त्यांना आहे. अमेरिकेत आरोग्य विमा आवश्यक असतो, त्यासाठी ओबामा यांनी जी आरोग्य काळजी योजना आखली, त्यावर आता मूर्ती पुढे कशी प्रगती करतात हे पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या मित्र परिवारातील डॉ. रवी जहागीरदार यांच्या मते मूर्ती हे महाशल्यचिकित्सक झाल्यानंतर अमेरिकेतील लोकांमध्ये रोगप्रतिकार उपायांसाठी मोठी जागृती होईल अशी अपेक्षा आहे.