माहिती अधिकार हे लोकशाहीतील एक मोठे हत्यार आहे; त्याचा दुरुपयोग काही जण करतात हे खरे असले तरी त्यामुळे आतापर्यंत अनेक घोटाळे उघड झाले आहेत. केदारनाथच्या पुरानंतर मदतकार्य करताना अधिकाऱ्यांनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खात रोज प्रत्येकी ७ ते ८ हजार खर्च दाखवला. कोंबडी, मटण, गुलाबजाम झोडले, हा निर्लज्जपणा माहिती अधिकारातच उघड झाला. त्यामुळे माहिती अधिकार फार महत्त्वाचा आहे. गेले अनेक दिवस रिकामे असलेले मुख्य माहिती आयुक्तांचे पद आता सरकारने विजय शर्मा यांना दिले आहे. सध्याच्या सात माहिती आयुक्तांपैकी ते एकहोते. शर्मा हे उत्तर प्रदेश केडरचे १९७४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. आता त्यांचे वय ६४ आहे, म्हणजे त्यांना एकच वर्ष मिळणार आहे, कारण ६५ हे निवृत्तीचे वय आहे.
ते दोनदा म्हणजे १९९५ ते २००३ व २००८ ते २०१० या कालावधीत पर्यावरण खात्यात सहसचिव होते. क्योटो येथील हवामान वाटाघाटींत ते भारताकडून सहभागी होते. क्योटो कराराचा मसुदा तयार करणाऱ्या शिल्पकारांत ते एक होते व त्यात त्यांनी विकसनशील देशांची भूमिका ठाशीवपणे मांडली होती. २०१० मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक संस्थेच्या प्रमुखपदासाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. पर्यावरण खात्यात असताना त्यांनी काही प्रकल्पांना परवाने नाकारले व त्यामुळे विकास खुंटला असे आरोप करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात त्यांनी सरकारी धोरणाचीच अंमलबजावणी केली होती. पॉश्को, वेदांता, लवासा व इतर अनेक प्रकरणांत त्यांनी घेतलेले निर्णय न्यायालयात योग्य ठरले. २०१० मध्ये शर्मा निवृत्त झाले. लंडन व हार्वर्ड येथून कायद्याची पदवी घेतलेले शर्मा काही काळ राष्ट्रीय हरित लवादावर सदस्य होते. त्यानंतर ते माहिती आयुक्तझाले.
शर्मा अतिशय मृदुभाषी आहेत, ज्ञानी आहेत; शिवाय विद्वत्तेचा दर्प नाही. समर्पण वृत्तीने काम करणे हे त्यांचे वैशिष्टय़. त्यांच्या पत्नी रिटा शर्मा या आयएएस अधिकारी आहेत. विजय शर्माचे ‘फोर्टस ऑफ बुंदेलखंड’ नावाचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. मुख्य माहिती आयुक्तम्हणून काम करताना त्यांना १५७९४ हजार प्रकरणांचा निपटारा करावा लागणार आहे. शर्मा यांनी महिन्याला २७९ प्रकरणे हाताळली आहेत, त्या वेगाने त्यांना आताची प्रकरणे हाताळण्यास ५६ महिने लागणार आहेत. कमी काळात ते किती छाप पाडतात हे बघायचे.