मनमोहन सिंग यांच्या आग्रहाखातर  अमेरिकेतील संत चटवाल यांना भारत सरकारनं पद्मभूषण या किताबानं सन्मानित केलं. कशामुळे, तर अणुकरारात त्यांनी मनमोहन सिंगांना मोठी मदत केली होती म्हणून.  आज तो अणुकरार लटकलेला आहे, मनमोहन सिंग यांच्या पराभवाची शक्यता आहे आणि या दोघांना मदत करणारे संत लबाडीच्या आरोपावरून तुरुंगवासाच्या प्रतीक्षेत आहेत.
कुठून कुठे आयुष्य गेलं त्यांचं. जन्म भारतात. पंजाबमधल्या गरीब घरातला. आठ भाऊ. हा तिसरा. जगण्यासाठी संघर्ष पाचवीलाच पुजलेला. त्या काळात पंजाबी माणसं मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर करायची. बरेचसे जायचे अफ्रिकेत. हा ही गेला. इथिओपियात. विचार होता शिक्षक व्हायचं. तिथे त्यावेळी भारतीय शिक्षकांना चांगलीच मागणी होती. स्थलांतर माणसाला धडपडायला शिकवतं. कोणत्याच कामाची लाज वाटत नाही. माणसं आपसूकच हात पाय मारायला लागतात. आणि हा तर काय उद्यमशीलांच्या कुळातला. त्यामुळे हा आणखीनच कामं करायचा. घरी आल्यावर की संध्याकाळी पंजाबी पध्दतीचं जेवण बनवून विकू लागला. तेवढेचा चार पैसे जास्त मिळाले तर बरं, हा विचार.
पण झालं असं की त्याच्या कामापेक्षा त्याच्या हाताचं जेवण हेच जास्त लोकप्रिय झालं. इथियोपियात जिथे हा रहायचा आसपास तिथे आसपास असेच स्थलांतरीत होते. त्यांना याच्या हातच्या जेवणात गोडी वाटणं साहजिकचं.  त्याच्या हातचं करणं इतकं लोकप्रिय व्हायला लागलं की त्याला वाटलं आपण साध्या आचार्यापेक्षा अधिक चांगले बल्लवाचार्य होउ शकतो. आपण हॉटेल वगैरे काढणं हेच जास्त सोयीचं. त्याने निर्णय घेतला. नोकरी सोडली. आणि चक्क एक टपरी टाकली. बघता बघता त्याचं नाव पंचक्रोशीत झालं. हॉटेल धो धो चालायला लागलं. पण नशीबानं माशी शिंकली.
इथियोपियात उठाव झाला. सर्व स्थलांतरितांच्या मुळावरच तो आला. पैसे कमावण्यासाठी गेलेल्या भारतीयांवर जीव वाचवण्याची वेळ आली. त्यांना पुन्हा परागंदा व्हावं लागलं. तिथे राहिले असते तर मारलेच गेले असते. त्यामुळे जीव वाचवायला सगळेच निघाले. हा ही त्यांच्यातला. तिथून उठला आणि थेट अमेरिकेत येउन पडला. ही १९७४ सालातली घटना. आगापिछा काहीही नाही. कोणी विचारायला नाही. तसाच धडकला. हाती कौशल्य एकच. ते म्हणजे खाद्यपदार्थ बनवण्याचं. तेच त्यानं पणाला लावायचं ठरवलं. समदेशीयांना गाठलं, हजार उचापती केल्या आणि थेट न्यूयॉर्कमधेच आपलं पहिलं हॉटेल त्यानं काढलं. नाव बाँबे पॅलेस.
भारतीय खाणं फॅशनेबल बनायच्या आधीचा तो काळ. इथियोपियात जे घडलं तेच न्यूयॉर्कमधेही. भारतीय चिकन, कबाब, बिर्यानी हे पदार्थ प्रयोगशील अमेरिकींना आणि अमेरिकेतील घरप्रेमी भारतीयांना मोहवू लागले. हॉटेल बक्कळ चालू लागलं. पुढे जवळपास दझनभर हॉटेलं त्यांनी एकटय़ा न्यूयॉर्कमधेच काढली.    
लवकरच संत सिंग चटवाल हे नाव अमेरिकेतल्या आघाडीतल्या उद्योगपतीेच्या पंगतीत जाउन बसलं. न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटन या अतिo्रीमंत भागात त्यांच्या हॉटेलात एक रात्र काढायची तर साधारण पाच हजार डॉलर्स..म्हणजे किमान तीन लाख रुपये..मोजावे लागतात. लिंडसे लोहान सारख्या हॉलिवूडमधल्या तारेतारका, लक्ष्मी मित्तल, वॉरेन बफे यांच्यासारखे बडे बडे उद्योगपती असे अनेक त्यांच्या हॉटेलचे नेहमीचे पाहुणे. अर्थात ते दर अन्य कोणाला परवडणार म्हणा. आम्ही चटवालांच्या हॉटेलात जाउन आलो हे सांगणं म्हणजे o्रीमंती मिरवण्यासारखं मानलं जाउ लागलं.इतकं ते हॉटेल मोठं मानलं जातं. म्हणजे आपल्याकडे कसं ताज किंवा हिल्टनमधे जाउन आली की माणसं कशी मिरवतात, तसं. त्यांच्या मग बँकाक, मियामी वगैरेही ठिकाणी शाखा निघाल्या. चटवाल हे अमेरिकेतलं बडं प्रस्थ बनलं. न्यूयॉर्कमधल्या अलिशानतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत ४५ व्या मजल्यावर पेंटहाऊस आहे त्यांचं.
हॉटेल्स चालवताना त्यांना अधिक मोठेपणाची भूक लागली. त्यांना वाटलं त्यासाठी राजकारण्यांची मदत हवी. पैसे दिले की ती मिळते, हा भारतीय रक्तातला अनुभव. त्यामुळे त्यांनी तो मार्ग पत्करला. चटवाल डेमॉक्रॅटिक पक्षाभोवती घुटमळू लागले. आता डेमॉक्रॅटिक पक्षातले त्यांच्या काळचे मोठे नेते म्हणजे अर्थातच o्री आणि सौ. क्लिंटन.  मग चटवाल यांनी क्लिंटन यांच्यासाठी निवडणूक निधी जमा करायला सुरूवात केली. अमेरिकेत हे एक बरं असतं. कोण कोणत्या राजकीय पक्षासाठी काय आणि किती करतोय ते सर्व असं चव्हाटय़ावर असतं. राजकारण्यांसाठी तिकिट लावून जेवणावळी असतात, तिकीट लावून भेटीगाठी असतात आणि या निधी उघडपणे गोळा करता येतो. क्लिंटन यांच्यासाठी चटवाल मोठय़ा जोमानं कामाला लागले. जॉर्ज बुश यांच्या नंतरच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटीक पक्षाची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, यावरून मोठं घमासान युध्द सुरू होतं. एका बाजुला होत्या सौ. हिलरी क्लिंटन आणि त्यांना आव्हान दिलं होतं बराक ओबामा यांनी. या संघर्षांत चटवाल यांनी क्लिंटन दांपत्याच्या पदरात आपलं माप टाकलं. त्यांनी हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारनिधीला घसघशीत आर्थिक मदत केली. किती? तब्बल १ लाख ८० हजार डॉलर्स, इतकी.
..आजच्या घडीला संत सिंगांच्या डोक्यावर २५ वर्षांच्या तुरुंगवासाची तलवार लटकतीये.०    
याचं कारण त्यांनी केलेली लबाडी. अमेरिकेत कोणालाही कोणत्याही पक्षाला अधिकृत देणग्या देता येतात. पण अट एकच. ती म्हणजे कोणी किती देणग्या द्यायच्या याचं नक्की करण्यात आलेलं प्रमाण. त्यामुळे एखाद्यानं प्रमाणाबाहेर देणग्या देण्याचा प्रयत्न केला तर तो अंगाशी येतो. दोघांच्याही. देणग्या देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्याही. या बरोबर आणखी एक नियम आहे. तो म्हणजे दुसऱ्याच्या पैशाने वा दुसऱ्याच्या नावावर देणग्या देता येत नाहीत. म्हणजे पैसा दुसऱ्याचा आणि नाव स्वत/चं किंवा पैसा स्वत/चा आणि नाव दुसऱ्याचं असं अजिबात चालत नाही. अमेरिकी परिभाषेत अशा प्रकारांना स्ट्रॉ डोनर म्हणतात. स्ट्रॉ म्हणजे गवताची काडी या अर्थानं. आपण त्याला काडीमोल देणगीदार म्हणूया.    
तर या संत सिंगांनी ही काडीमोल देणगीदारी केली म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. म्हणजे त्यांनी ज्या काही देणग्या हिलरी क्िंलटन यांना दिल्या त्या स्वत/च्या पैशातून नाही, असं निष्पन्न झालं आणि संत सिंग या पापात दोषी आढळले. अमेरिकी व्यवस्थेप्रमाणे मामला फारच गंभीर आहे. कारण असा प्रकार होत असेल तर त्यात दोन पक्ष असणार हे उघड आहे. तसे ते असल्याचा संशय अमेरिकी आर्थिक उलाढालींवर नजर ठेवून असणाऱ्या सरकारी खात्यांना आला आणि ते माग काढू लागले. त्यात लक्षात आलं चटवाल यांच्या नावानं इतक्या मोठय़ा देणग्या दिल्या गेल्या असल्या तरी त्यांच्या खात्यांतून हा पैसा गेल्याची नोंद नाही. मग तो आला कुठून/ या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट झालं. चटवाल यांनी लबाडी केलीये. खरं तर तो पर्यंत डेमॉक्रॅटीक पक्षाचं सरकार सत्तेवर आलं होतं. म्हणजे ज्या पक्षासाठी चटवाल निधी गोळा करत होते त्या पक्षाची सत्ता आलेली होती. अशा वेळी चटवाल यांना खरं तर अभय मिळायला हवं होतं. भारतात असच तर झालं असतं.     
पण तिकडे झालं नाही. चटवाल यांनी प्रयत्न करून पाहिला. पण क्लिंटन दाम्पत्यदेखील त्यांच्या मदतीला आलं नाही. सौ क्लिंटन यांनी आपल्याच पक्षाचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे शब्द टाकला नाही..जरा चटवाल यांना सांभाळून घ्या म्हणून. अखेर चटवाल यांची चौकशी झाली. एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात ब्रुकलीन कोर्टात त्यांच्याविरुद्धचा खटला उभा राहिला. चटवाल यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांना हा पैसा परत तर करावा लागणारच आहे. पण त्याच्या जोडीला तब्बल २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. आज चटवाल ७० वर्षांचे आहेत. पण ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून शिक्षा काही कमी होईलच याची खात्री नाही. तशी ती खरोखरच शिक्षा ठोठावली गेली तर आपला एक पद्मभूषणी हिरा अमेरिकेत गजाआड पाहण्याची वेळ आपल्यावर येईल.
कारण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आग्रहाखातर या संत सिंगांना २०१० साली भारत सरकारनं पद्मभूषण या किताबानं सन्मानित केलं. मनमोहन सिंग यांना त्यांचा पुळका का? तर ते केवळ शीख आहेत म्हणून नाही. तर भारत अमेरिका अणुकरारात त्यांनी मनमोहन सिंगांना मोठी मदत केली म्हणून.    
यातला काव्यात्म न्याय हा की आज तो अणुकरार लटकलेला आहे, मनमोहन सिंग यांच्या पराभवाची शक्यता आहे आणि या दोघांना मदत करणारे तुरुंगवासाच्या प्रतीक्षेत आहेत. या चटवाल यांचा मुलगा विक्रमही तुरुंगात जाऊन आलाय. अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली. ०    
हे सगळं आताच का सांगायचं? आपल्याकडे निवडणुकांचा हंगाम आहे आणि जवळपास ३०० कोटी रुपयांची बिनहिशेबी रोकड पकडली गेलीये. म्हणजे चटवाल यांच्या पापापेक्षा कितीतरी पट. पण सगळं कसं शांत आहे.
कारण आपण सगळेच संत.