आज देशातील जवळपास प्रत्येक शहरांत धनाढय़ मंडळींची एक नवी जमात तयार झाली असून हा वर्ग गरिबांना जातबाह्य़च मानत असतो. डेबाई जेव्हा मुंबईसाठी वेगळे राज्य हवे अशी मागणी करतात तेव्हा त्यास या नव्या वर्ग विग्रहाची पाश्र्वभूमी असते.
शोभा डे यांना एक व्यक्ती म्हणून गांभीर्याने घ्यावे असे एकही कारण नाही. कोणताही विषय जमेल तितक्या उथळपणे पण चटपटीत इंग्रजीतून मांडणे हेच काय ते त्यांचे कसब आणि तेवढेच त्यांचे कर्तृत्व. इंग्रजी भाषेबाबत एक गुलामी आकर्षण आपल्याकडे अद्यापही असल्यामुळे केवळ त्या भाषेवरील प्रभुत्व हेच अनेकांच्या कथित कर्तृत्वाचे मापदंड ठरते. त्यामुळे शोभा डे आणि तत्सम मंडळींचे फावते. लेखक चेतन भगत, सुहेल सेठ ही अशा नवपोपटवर्गाची अन्य उदाहरणे. ज्या देशात ६५ टक्क्यांहून अधिक जनता ही गरीब वा कनिष्ठ मध्यमवर्गीयांत मोडते त्या देशात फॅशन, सिनेमा वगैरे वर्तुळांतील व्यक्तींकडे बुभुक्षितपणाने पाहिले जाते. त्यामुळे अशा उच्चभ्रू वर्तुळात मिरवत कशावरही भाष्य करणाऱ्या या टीव्ही स्टुडिओविलसित व्यक्तींविषयी एक सुप्त आकर्षण तयार होते. या आणि अशा मंडळींना बरे दिवस आले ते काही माध्यमगृहांनी (अर्थातच एक्स्प्रेस समूहाचा अपवाद) छचोर जगणे म्हणजेच यशस्वी होणे हा समज अर्धसंस्कृत समाजात रुजवायला सुरुवात केल्यापासून. कोणत्याही विषयावर काहीही आचरट वा वाह्य़ात मते व्यक्त करून त्या विषयाचे गांभीर्य काढून टाकण्याची नवी प्रथा आपल्याकडे तेव्हापासून रुजू झाली आणि o्रीमंतांचे अनुकरण गरिबांनी करणे ही परंपरा असल्याने अशा शोभा डे गावगन्ना तयार होऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय दहशतवाद ते देशाची आर्थिक स्थिती यांतील कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने भिकार काही लिहिणे वा बोलणे हे अशा बौद्धिकदृष्टय़ा उनाड वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण. एरवी अशा मंडळींची दखल घेण्यात वेळेचा अपव्यय करावा अशी आमची मुळीच इच्छा नाही.
परंतु या डेबाईंचे मुंबई आणि महाराष्ट्र या संदर्भात व्यक्त झालेले ताजे मत हे नव्या जातव्यवस्थेचे निदर्शक असल्याने त्याचा समाचार घेणे हे कर्तव्य ठरते. आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून तेलंगण या राज्याच्या निर्मितीस काँग्रेसने अनुकूलता दर्शविल्याने राज्याराज्यांतील अशा नवराज्यवाद्यांना कंठ फुटला असून अनेक नव्या राज्यांच्या निर्मितीची मागणी पुढे येऊ लागली आहे. त्यात गैर काही नाही. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक छोटी राज्ये असणे हे केव्हाही प्रशासकीयदृष्टय़ा सोयीचेच आणि त्यामुळे आवश्यकही आहे. विविधतेतून एकता वगैरे पोपटपंची ही घोषणांसाठी चांगली वाटत असली तरी प्रशासनाच्या दृष्टीने इतकी विविधता ही सांस्कृतिक अडसर ठरू शकते. किंबहुना तशी ती ठरतेही. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा सबळ असलेल्या वर्गाची संस्कृती तुलनेने दुर्बळ असलेल्या वर्गावर लादली जाण्याचा धोका संभवतो. आपल्याकडे तसे सर्रास होते. त्यामुळेच पुणे-मुंबईकर हे नागपूर, चंद्रपूर वा अन्य दूरच्या शहरांतील जनतेपेक्षा स्वत:स उजवे समजतात. भौगोलिकदृष्टय़ा व्यवस्थापनाच्या जवळ असतो त्यास प्रगतीचे फायदे लवकर आणि जास्त मिळतात आणि त्यामुळे दूरवरील रहिवाशांच्या मनात दुर्लक्षाची भावना तयार होते. महाराष्ट्रात हे घडताना दिसते. त्याचमुळे राज्याच्या म्हणून समग्र अशा सांस्कृतिक व्यवहारांवर पुणे-मुंबईकरांची पकड अधिक घट्ट असते. तेव्हा लहान राज्यांची निर्मिती ही लोकशाहीच्या प्रसारासाठी आवश्यकच आहे, असेच आमचे मत आहे. आज युरोपियन युनियन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रसमूहातील देशांचा आकारदेखील आपल्याकडील राज्यांपेक्षा लहान आहे. परंतु त्यामुळे त्या त्या राष्ट्रातील जनतेस आपापली संस्कृती जतन करण्याची, जोपासण्याची संधी मिळाली. तेव्हा लहान राज्यांमुळे संधींचे लोकशाहीकरण होते यात शंका नाही. यातील लक्षात घेण्याचा मुद्दा हा की हे संधीचे लोकशाहीकरण समानतेच्या तत्त्वांवर होणे गरजेचे असते. तरच विभाजनास वा छोटय़ा राज्यनिर्मितीस अर्थ प्राप्त होतो. अन्यथा ते सबळास दुर्बळाचे शोषण करण्याची संधी मिळण्याचा धोका असतो. शोभा डे यांच्या मताची दखल घेणे गरजेचे आहे ते या पाश्र्वभूमीवर. आंध्र प्रदेशातून तेलंगण वेगळे झाल्यामुळे मुंबईदेखील महाराष्ट्रापासून वेगळी काढावी अशी प्रतिक्रिया शोभा डे यांनी व्यक्त केली. वरवर पाहता या मागणीत आणि स्वतंत्र राज्याच्या अन्य मागण्यांत फरक तो काय असा प्रश्न काहींना पडू शकेल.
यांतील फरक हा की डे यांचे हे मत हे नवी जातव्यवस्था दर्शवणारे आहे. देशातील जवळपास प्रत्येक शहरात धनाढय़, नवo्रीमंत अशा मंडळींची एक नवी जमात तयार झाली असून अन्य गरीब आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बळांना हा उच्चभ्रू वर्ग हा जातबाह्य़च मानत असतो. या उच्चभ्रूंच्या वस्त्यांमध्ये सेवासुविधा पुरवल्या गेल्या की संपूर्ण राज्यासमोरील समस्या मिटल्याचे त्यांना वाटत असते आणि त्यांच्या वस्त्यांत एक रात्र वीजपुरवठा खंडित झाला तर जणू संपूर्ण राज्य अंधारात बुडाल्यासारखा टाहो या वर्गाकडून फोडला जातो. अशा उच्चभ्रूंच्या वस्त्या आता शहरोशहरी वसू लागल्या आहेत. या वस्त्या ज्या शहरांत असतात तेथे पाण्याची टंचाई असते. पण यांच्या वस्त्यांमध्ये पोहण्याचे तलाव ओसंडून वाहत असतात. या वस्त्यांपलीकडे राहणाऱ्या नागरिकांना घर ते कार्यालय हा प्रवास हे रोजचे आव्हान असते. परंतु या नवo्रीमंतांना या असल्या कोणत्याही संघर्षांचा गंध नसतो. त्यामुळे या मंडळींच्या सेवा क्षेत्रासाठी जीवनावश्यक ठरलेले मनुष्यबळ त्या गरजांच्या पूर्ततेनंतर या वर्गासाठी भार ठरते. जगण्याच्या सर्वच क्षेत्रांत या मंडळींचा दुटप्पीपणा त्यामुळे दिसत असतो. मुंबईत २००८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात झालेले दहशतवादी हल्ले हे याचे एक उदाहरण. या हल्ल्यात मुंबईतील धनाढय़तेचे प्रतीक असलेली ताज आणि ओबेरॉय ही हॉटेले दहशतवाद्यांनी लक्ष्य केली. वास्तविक मुंबईतील तो काही पहिला दहशतवादी हल्ला नव्हे. त्याआधी किमान अर्धा डझन वेळा मुंबईत दहशतवाद्यांनी अनेक अo्रापांचे प्राण घेतले आहेत. कधी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलगाडय़ांत तर कधी बेस्ट बसेसमधून फुटलेल्या स्फोटकांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. त्या वेळी कधीही शोभा डे वा तत्सम वर्गास मेणबत्त्या लावून शोक व्यक्त करण्याची गरज वाटली नाही. परंतु या मंडळींच्या जगण्याचे आणि आनंदाचे निदान असलेले ताज वा ओबेरॉय ट्रायडेंट हेच जेव्हा दहशतवादाच्या भक्ष्यस्थानी पडले तेव्हा हा नवपोपटवर्ग जथ्याजथ्याने मेणबत्त्या घेऊन बाहेर पडला आणि त्याने दु:खवियोग साजरा केला. वास्तविक त्याच वेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकातही दहशतवादी हल्ल्यात निरपराधांचे रक्तशिंपण झाले होते. परंतु या वर्गाची लबाडी ही की यातील काही मेणबत्त्या हातावर पोट असलेला, घामाने निथळत प्रवास करणारा वर्ग जेथून ये-जा करतो त्या रेल्वे स्थानकात लावण्याची इच्छादेखील या वर्गास झाली नाही.
त्यामुळे डेबाई जेव्हा मुंबईसाठी वेगळे राज्य हवे अशी मागणी करतात तेव्हा त्यास या नव्या वर्ग विग्रहाची पाश्र्वभूमी असते आणि त्यांच्या विधानाचा खरा अर्थ ‘आम्हाला दक्षिण मुंबईचेच वेगळे राज्य हवे’ असा असतो. शक्य झाल्यास या वर्गास आपापल्या खासगी आनंदवनांचेच सार्वभौम राज्य झालेले हवे आहे आणि त्यांना इतर प्रदेशांचे आणि तेथील जनतेचे काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे शोभा डे यांचे मत दुर्लक्ष करण्यासारखे असले तरी त्या मतामागच्या मानसिकतेकडे लक्ष वेधणे आवश्यक ठरते. अन्यथा या वर्तमानपत्रीय तृतीयपानी अशोभनीयतेकडे दुर्लक्ष करणेच योग्य.