आता पाऊस कधी येणार आणि पेरणार कधी, असा प्रश्न लोकांपुढे आहे. कोणत्याही गावात गेल्यानंतर सन्नाटा दिसेल अशी परिस्थिती आहे. आजच्या कोरडय़ा नक्षत्रांच्या झळा उद्याच्या भीषण परिस्थितीची चाहूल देऊ लागल्या आहेत. एक असह्य़ असा ताण सर्वाच्याच मनावर जाणवू लागला आहे. वर्षांची सुरुवात जर एवढी खडतर असेल तर संपूर्ण वर्ष कसे तडीस जाणार या धास्तीनेच सध्या अनेकांची झोप उडाली आहे.
अवेळी दिसणारी निसर्गाची रूपे कधी कधी अंगावर येतात. जे लोभस, रमणीय दिसते तेच नको त्या दिवसात समोर आले तर पोटात खड्डा पडतो. स्वच्छ मोकळी हवा, निरभ्र आकाश आणि रात्री चमचमणाऱ्या चांदण्यांचा चांदवा धरलेला. एरवी हे चित्र कधीही बरे वाटेल पण आता या दिवसांत धास्ती वाटते. हे चांदण्यांनी चमचमणारे आकाश आणखी किती दिवस पाहायला मिळणार? इतके फटफटीत आभाळ जेव्हा रात्री चांदण्यांनी लदडून जाते तेव्हा त्याच्याकडे पाहण्याचेही धाडस होत नाही. या आभाळाकडे डोळा वर करून पाहवतही नाही. रात्रीच्या या चांदण्यांची शीतलता जाणवत नाही. उलट त्याचा दाहच उतरत जातो मनामनात. कधी तरी हे आभाळ गच्च भरून येईल आणि धो धो पाऊस कोसळून रात्रीच्या मिट्ट काळोखात ते एकजीव होऊन कधी बरसेल या चिंतेने आता सर्वत्र चेहरे काळवंडलेले आहेत. मृग बरसलाच नाही, आद्र्राही रुसल्या. आषाढात सृष्टीचे जे नवे रूप दिसते ते तर जवळपास नष्टच झाले आहे. या दिवसांत गळणारे आभाळ हरवले आहे. आषाढातला पाऊस झड लावतो, सारखा कोसळत राहतो, जराही उसंत घेत नाही. या दिवसांतल्या पावसाला मुळुमुळु येणे माहीत नाही. तो येतो सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आणि अवघ्या काही क्षणांत सर्व काही भिजवून टाकतो, तावातावाने बरसतो. आत्ता सर आली आणि हलकेच बरसून गेली असा हा आषाढातला पाऊस सरभरही नसतो. एखाद्या अवचित आलेल्या पाहुण्याने मुक्काम ठोकावा तसा हा पाऊस सहजासहजी हलत नाही. कधी कधी ध्यानीमनी नसताना अचानक िखडीत गाठतो आणि सगळ्यांचीच फजिती करतो. शेतात चाललेली कामेही या पावसाने खोळंबतात. आता मात्र त्याने गुंगारा दिला आहे. त्याच्या हुलकावणीने सर्वाच्याच तोंडचे पाणी पळाले आहे.
ज्या नक्षत्रांवर भरवसा आहे ती सगळी नक्षत्रे दगा देत आहेत. एखाद्या जवळच्या माणसाने घात करावा तसे त्यांचे चालले आहे. मातीतली धग अजूनही कमी झालेली नाही. ओल हरवलेल्या मातीत आता काय रुजून येणार ही काळजी प्रत्येकालाच लागली आहे. बऱ्याच ठिकाणी पेरणीच झालेली नाही. जमीन अजूनही उन्हाळ्यातल्यासारखीच काळीभोर आहे. रस्त्याने कुठेही नजर टाकली तरीही हे असे सुनसान शिवार दिसून येत आहे. ज्या तुरळक ठिकाणी पेरणी झाली तिथे एक तर मातीत रुजण्याआधीच बियाणे खाक झाले किंवा उगवणाऱ्या अंकुराच्या नशिबी करपलेपण आले. ज्यांनी आटापिटा करीत पेरणीची घडी साधली त्यांना आता पुन्हा नव्याने जमवाजमव करावी लागणार. कारण आधी पेरलेले बियाणे मातीतच मिसळून गेले आहे. वाट पाहून पाहून थकल्यानंतर एक निराशा दाटून येते. तसे आता सर्वाचेच या पावसाच्या बाबतीत झाले आहे. खरे तर या दिवसात शेतात कामांची धांदल चाललेली असते. बोलायलाही उसंत नाही अशा नादात माणसे कामाला जुंपलेली असतात. गावात एकही माणूस दिसत नाही. सगळी माणसे कामधंद्यासाठी शेतात असतात पण अशी लगबग आता कुठेच दिसेना. सगळीकडे एक उदासी जाणवत आहे.
पावसाळी हवा, वातावरणातला ओलसरपणा, भिजलेली माती आणि रानात जमिनीबाहेर हळूच तोंड काढणाऱ्या कोंबांची सळसळणारी लवलव असे चित्र या दिवसांत पाहायला मिळते. उघडे-बोडके डोंगरही हिरवेगार दिसू लागतात. जमिनीवर हिरव्यागार गवताची घट्ट साय येऊ लागते. गुराढोरांच्या जिभा या हिरव्यागार गवतावर फिरत राहतात. शेतातही कुठे कुठे पाणी साचलेले दिसते. जास्त पाऊस झाला तर जमिनीच्या बाहेर वाट मिळेल तिकडे हे पाणी वाहताना दिसते. या दिवसांतले हे चित्रच हरवले आहे. उन्हाळ्यात तळ गाठलेल्या विहिरी पुन्हा जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याने पाझरू लागतात. ओढे-नाले वाहू लागतात. आता असे काहीही दिसेनासे झाले आहे. भुईच्या भेगाच अजून बुजल्या नाहीत. मातीत जाणवणारे तप्त उसासे कमी झाले नाहीत. जमिनीत जराही ओल नाही. तिथे पेरण्या कशा होणार? आता पाऊस कधी येणार आणि पेरणार कधी, असा प्रश्न लोकांपुढे आहे. कोणत्याही गावात गेल्यानंतर हा सन्नाटा दिसेल अशी परिस्थिती आहे. सुरुवातीचे काही दिवस लोक पावसाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहतात. एक एक दिवस काढणे जिवावर येते. या नक्षत्रात पडला नाही तर त्या नक्षत्रात पडेल, नक्षत्र बदलताना ‘जोडावर’ पडेल, दिवसा नाही आला तर रात्री येईल अशी मनाची समजूत माणसे काढत राहतात. कुठल्या कुठल्या पंचांगाचा हवाला देत राहतात. वाट पाहण्यातली सगळी उत्कटता या पावसाने घालवून टाकली आहे. आताची जी स्थिती आहे ती एखादा घाव बसल्यानंतर काही सुचू नये आणि सावरण्यासाठी अवसान गोळा करावे तशी आहे. पावसाची वाट पाहून पाहून डोळ्यातली ओलही आटली. वारीच्या दिवसात जर पाऊस आला नाही तर तो िदडय़ा परतल्यानंतरच येतो अशी लोकांची धारणा असते. परवाला एक गृहस्थ म्हणाले, ‘जर आषाढी एकादशी बुधवारी आली तर पाऊस एक महिना लांबतो असे ‘सहदेव-भाडळी’तले भाकीत आहे,’ असे प्रत्येकाच्याच बोलण्यातून कुठले कुठले संदर्भ येत राहतात. कोणतीही पेरणी वेळेवर केली तरच ती साधते. वेळ निघून गेल्यानंतरची पेरणी जोमदार होत नाही आणि त्या हंगामाचेही काही खरे नाही असा पूर्वापार अनुभव आहे. त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर पाऊस आला तर त्याचे काही फारसे अप्रूपही वाटत नाही. फक्त पुढच्या काळात पिण्याच्या पाण्याचे हाल होत नाहीत, गुराढोरांच्याही पाण्याचा प्रश्न मिटतो. एवढाच त्यातला दिलासा. पाऊस आल्याचा आनंद हा असतोच पण वेळेवर येण्यात जे समाधान आहे ते उशिरा येण्यात नाही. पाऊस वेळेवर आला आणि बांधाबांधावर हिरवे गवत दिसू लागले तर गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो आणि तो आलाच नाही तर मात्र दावणीच्या जनावरांचाही भार वाटावा अशी परिस्थिती असते. यंदा ती परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या दिवसात पाऊस कधी कधी घराच्या बाहेरही पडू देत नाही त्या दिवसातले हे चित्र आहे. आजच्या कोरडय़ा नक्षत्रांच्या झळा उद्याच्या भीषण परिस्थितीची चाहूल देऊ लागल्या आहेत. एक असह्य़ असा ताण सर्वाच्याच मनावर जाणवू लागला आहे. वर्षांची सुरुवात जर एवढी खडतर असेल तर संपूर्ण वर्ष कसे तडीस जाणार या धास्तीनेच सध्या अनेकांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीने सगळे काही हिरावून नेले. सगळी गणिते बिघडून टाकली आणि आता या वर्षीच्या पावसाने हा असा जीवघेणा जुगार चालवला आहे.
जिथले सगळे जगणेच पावसावर अवलंबून आहे, त्याच्या वेळी-अवेळी येण्यावर अवलंबून आहे तिथे पावसाने अशी दडी मारल्यानंतर जगण्याचाच किती थरकाप उडू शकतो याची कल्पनाही करू शकत नाही आपण. माणसे एकमेकाशी घडाघडा बोलत नाहीत. सगळे व्यवहार जिथल्या तिथे ठप्प होतात. सगळेच आतल्या आत झुरत असतात. अशा वेळी येणाऱ्या दिवसात दुष्काळाच्याच सावल्या दिसू लागतात. सगळ्या जगण्यातलीच रया निघून गेली आहे असे वाटत असते. पाऊस सध्या तरी पत्ता हरवला आहे आणि त्याचे हे बेपत्ता होणे नांगरून टाकलेल्या जमिनीप्रमाणे काळीज फाडून टाकणारे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
अंगावर येणारा कोरडय़ा आभाळाचा चांदवा
आता पाऊस कधी येणार आणि पेरणार कधी, असा प्रश्न लोकांपुढे आहे. कोणत्याही गावात गेल्यानंतर सन्नाटा दिसेल अशी परिस्थिती आहे.

First published on: 07-07-2014 at 04:37 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will be rain start