‘टू बी. ई. ऑर नॉट टू बी. ई.?’ हे पुस्तक हलक्याफुलक्या स्वरूपाचे असणार याची कल्पना  मुखपृष्ठावरूनच येते. प्रत्यक्षात ही एक फँटसी आहे, बॅचलर ऑफ इंजिनीअर होणाऱ्यांची.
या पुस्तकाचा नायक पार्टीत व्होडका पिऊन नंतर वेगाने गाडी चालवत घरी जायला निघतो. वाटेत तो एका ट्रकला धडकून थेट नरकात जातो. त्याच वेळी विजेचा एक किरकोळ प्रश्न सोडवण्यासाठी गेलेल्या आदित्यचीही नरकात रवानगी होते. दोघांची भेट झाल्यावर आपण स्वर्गाऐवजी नरकात कसे, असा त्यांना प्रश्न पडतो. तिथे त्यांची चित्रगुप्ताशी भेट होते. इंजिनीअरिंग केलेल्या मुलावर शोधप्रबंध लिहायला जर दोघांनी मदत केली तर इच्छेप्रमाणे त्यांना स्वर्गात राहता येईल, असं आश्वासन मिळतं. ते तयार होतात.
त्यांचं मन रिझवायला आणि त्यांना कामात मदत करायला विद्या व वीणा या स्वर्गातल्या अप्सरा नेमल्या जातात. पुढे सुरू होतो, तो प्रबंध तयार करण्याचा प्रवास.
परखडपणे मतं मांडण्याचा प्रामाणिकपणा दीपेनने पुस्तकाच्या आरंभापासून अंगीकारल्याने त्यांचा सच्चेपणा मनाला भिडतो. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची टिपिकल भाषा, दिनचर्या, सामूहिक दांडय़ा, होस्टेल लाइफ, कॉलेजचं कँटीन, व्हायवा (मौखिक परीक्षा), रॅगिंग, शाहरूख खान-काजोल धर्तीवर कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ‘राहुल आणि वैशाली’ प्रकार, हुशार पण बावळट विद्यार्थी, स्कॉलर्स, बीएमडब्ल्यूतून टेचात येणारे, बसने काही मैलांचा प्रवास करणारे, असे दोन टोकांचे विद्यार्थी, मौखिक परीक्षेच्या वेळी कसं वागावं याच्या टिप्स, प्रॅक्टिकलच्या वेळेला लॅब असिस्टंटला मारलेला मस्का आणि मग काही रक्कम घासाघीस करून ठरवल्यावर त्याने केलेली मदत, कॅम्पस इंटरव्ह्य़ूची गंमत, सबमिशन्स आणि त्यासाठी लागणारा प्रचंड प्रमाणातला कागद इत्यादी घटना मासलेवाईक उदाहरणं देऊन मजेशीरपणे हाताळल्या आहेत.
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या चार वर्षांच्या खडतर आयुष्याचं मार्मिक वर्णन करताना दीपेननी त्यांची तुलना अगदी कुत्र्यांपासून ते सुनांपर्यंत अनेकांशी केली आहे. त्यात गायी, टी-ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेट, अँटी-सिन्ड्रोम यांचाही समावेश आहे.
एटीकेटी या जिव्हाळ्याच्या आणि संवेदनशील विषयावर लिहिताना नायक आदित्यच्या पाठीवर थोपटत म्हणतो, ‘‘डय़ूड, कम ऑन! इंजिनीअरिंगमध्ये एटीकेटी मिळणं यात लज्जास्पद काहीच नाही. वाईट वाटून घेऊ नकोस..’’
इथे दीपेनच्या केह. के. लूंगी हे पात्र आणतो. ही  महिला एटीकेटी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रबंध लिहिण्यासाठी भारतात येते. तिच्या संशोधनात्मक अहवालाप्रमाणे अशा विद्यार्थ्यांचे तीन गट पडतात. टॉप टेन, मधले २५ आणि बाकीचे. ते सहविद्यार्थ्यांचा कोणत्या प्रकारे विचार करतात, कोणाशी मैत्री करतात, त्यांची करमणुकीची साधनं काय असतात, त्यांचा ह्य़ूमॅनिटी कोशंट काय असतो इत्यादी बाबींवर लूंगी आपली निरीक्षणं नोंदवते. त्याचा संदर्भ देत दीपेन म्हणतो, ‘एटीकेटी म्हणजे भविष्यकाळात निर्माण होऊ शकणाऱ्या, तोंड द्यावं लागणाऱ्या प्रश्नांची पूर्वतयारी असते. किंवा एटीकेटीज द्याव्या लागतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्यांना कसं सामोरं जाता, हे अधिक महत्त्वाचं.’
होस्टेल लाइफचं वर्णन करताना दीपेन तिथल्या गाद्यांतले ढेकूण, संडासात जाण्यासाठी लागणारे क्यू, टेबलावर पसरलेली जर्नल्स, खोलीत कुठे तरी असणारी एखाद्या देवतेची, बव्हंशी गणपतीची मूर्ती, धुण्यासाठी कोपऱ्यात साठवून ठेवलेले कपडे, प्रत्येकाच्या बिछान्याखाली दडवलेली डेबोनेर, प्लेबॉय, नॉटीबॉयसारखी मासिकं, गिटार, सामायिक वापर होणारा संगणक, सुंदर नटय़ांची भिंतीवरील चित्रं, ग्लुकोज बिस्किटांच्या अर्धवट पुडय़ाला लागलेल्या मुंग्या.. असे तपशील वास्तव चित्र आपल्यासमोर उभे करतात.
इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांची डिक्शनरी या प्रकरणात विद्यार्थ्यांच्या वापरात वरचेवर येणारे, त्यांनीच कॉइन केलेले शब्द किंवा वाक्प्रचार यांची एक जंत्रीच दीपेनने सादर केली आहे. त्यातले बरेचसे शब्द शिवराळ किंवा अश्लीलतेकडे झुकणारे असले तरी वास्तवात मात्र कॉलेज किंवा हॉस्टेल जीवनात त्यांचा वापर होत असल्याने त्यांना बराचसा गुळगुळीतपणा आलेला असतो. त्यामुळे ही डिक्शनरी वाचताना ते न खटकता उलट गमतीशीरच वाटतात.
शेवटी त्यांचा हा प्रबंध पूर्ण झाल्यावर त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे दीपेन आणि आदित्यचं विद्या आणि वीणाबरोबर लग्न लावून त्यांना स्वर्गाच्या प्रवेशद्वारापाशीच टू बीएचके फ्लॅट देण्याचं बिग बॉस मान्य करते.
दीपेनने शेवटी प्रांजळपणाने मनोगत व्यक्त करताना म्हटलं आहे, की स्पेशलायझेशन कशातही करा, आयटी क्षेत्र जर तुम्हाला सामावून घेत असेल तर त्यात वाईट काय आहे? चांगली नोकरी मिळणं हे महत्त्वाचं आहे. एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करण्यासाठी परदेशी जायला मिळण्याच्या संधीचं आकर्षण पदवी मिळाल्यानंतर दीपेनना अधिक होतं, असं ते मान्यही करतात. नुसती घोकंपट्टी करणं हे तुमच्या चार वर्षांच्या इंजिनीअरिंगच्या आयुष्याचं सार नसावं तर ते एक विज्ञान आणि कौशल्य आहे, जे जाणीवपूर्वक आणि रस घेऊन शिकावं लागेल, असंही सुचवायला ते विसरत नाहीत.
आयुष्य तुमचं आहे आणि तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात, तेव्हा इंजिनीअर व्हायचं की नाही आणि त्या शिक्षणाचा आयुष्यात कोणत्या पद्धतीने उपयोग करायचा हे तुमचं तुम्हीच ठरवा, असं दीपेन म्हणतो.
विद्यार्थी, इंजिनीअर्स आणि पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावं.

टू  बी. ई. ऑर नॉट टू बी. ई.? :
दीपेन अंबालिया,
इंकपेन पब्लिकेशन्स,
पाने : २७७, किंमत : १९५ रुपये.