News Flash

१३४. मोट.. नाडा

हृदयेंद्रही म्हणाला होताच की मोट, नाडा, विहीर, दोरी हे शब्द दिसायला सहजसाधे आहेत, पण त्यांचा या अभंगातला अर्थ अधिक सखोल असावा..

| July 9, 2015 01:01 am

हृदयेंद्रही म्हणाला होताच की मोट, नाडा, विहीर, दोरी हे शब्द दिसायला सहजसाधे आहेत, पण त्यांचा या अभंगातला अर्थ अधिक सखोल असावा.. बुवाही जेव्हा म्हणाले की, ‘या विहीरीत जरा खोल उतरा, मग याच शब्दांचे गूढ अर्थ प्रकाशित होतील!’ तेव्हा हृदयेंद्रची उत्सुकता अधिकच वाढली.
हृदयेंद्र – खरंच काय अर्थ असेल?
बुवा – आधी या शब्दांचे प्रचलित अर्थ पाहू..
कर्मेद्र – प्रचलित अर्थ काय पाहायचे? सरळ तर अर्थ आहेत विहीर म्हणजे पाण्यानं भरलेली बावडी, मोट म्हणजे विहीरीतून पाणी काढण्याचे साधन..
बुवा – मोठे पात्र..
कर्मेद्र – हं तेच ते.. नाडा म्हणजे..
बुवा – म्हणजे जाड दोरखंड.. आता हे झाले साधे अर्थ. आता यांचेच दुसरे अर्थही पाहू.. दुसरे म्हणजे याच शब्दांच्याच काही वेगळ्या अर्थछटा ज्या आपल्याला या अभंगाचा अर्थ जाणवून द्यायला अधिक साह्य़ करतील..
हृदयेंद्र – म्हणजे?
बुवा – विहीरीत पाण्याचा झरा असतोच ना? विहरा म्हणजे मोठा झरा या झऱ्याच्या आधारानेच विहीर झाली असावी.. मोट म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचं मोठं पात्र हा जसा अर्थ आहे, तसाच मोट म्हणजे मोटकुळं, गाठोडं हाही अर्थ आहे.. नाडा म्हणजे जाड दोरखंड, हा जसा अर्थ आहे तसाच नाडा म्हणजे मंतरलेला दोरा हाही अर्थ आहे आणि नाडा म्हणजे पसारा हादेखील अर्थ आहे! दोरा किंवा दोरी म्हणजे धागा हा जसा अर्थ आहे तसाच दोरा म्हणजे संबंध आणि छोटा झरा हाही अर्थ आहे.. काय हृदयेंद्र काही उकल होत्ये का?
हृदयेंद्र – काहीतरी जाणवतंय खरं.. पण तरी नेमकेपणानं स्पष्ट होत नाहीये..
बुवा – (हसतात) अहो माणसाचा जन्म कसा असतो? प्रारब्ध आणि प्रयत्न.. प्रारब्ध हे भूतकाळातून आलं असतं तर प्रयत्न हा वर्तमानातला असतो.. या प्रयत्नांतूनच म्हणजेच वर्तमानातील माझ्या भल्या-बुऱ्या वर्तनातूनच उद्याचं प्रारब्धही तयार होत असतं.. मी जन्माला आलो तेव्हा जीवनाचं जे शेत आहे त्यात जे काही उगवतं आहे त्यामागे कर्मसिद्धान्त आहेच ना? जे पेरलं तेच उगवतं.. तर प्रारब्धाच्या विहीतून या शेताला पाणी मिळत आहे.. प्रारब्ध तर फार मोठं आहे.. या एका जन्मात ते भोगून संपतच नाही.. जसं विहिरीतलं पाणी.. अख्खी विहीर काही शेतात उपडी करता येत नाही.. त्यासाठी मोट आहे ना? तसं प्रारब्ध फार विराट असलं तरी या जन्मापुरतं प्रारब्धाचं गाठोडं, प्रारब्धाचं ओझं मी वाहून आणलं आहे.. ते प्रारब्ध भोगतानाच नाडा म्हणजे पसारा.. या जीवनातला वर्तमानातला पसारा मी घालत आहे.. हा इच्छांचा पसारा आहे, भल्या आणि बुऱ्या प्रयत्नांचा पसारा आहे.. आणि या पसाऱ्याचा दोरा पुढच्या जन्मांपर्यंतही पोहोचत आहे.. आज मी जे काही करत आहे, घडवत आहे त्याचा संबंध पुढच्या जन्मांशीही आहे..
हृदयेंद्र – बराचसा अर्थ जाणवतोय खरा.. पण बुवा प्रत्येक अभंग हा साधकासाठी, त्याच्या साधनेसाठी प्रेरणा देणाराही असतोच ना? त्या दृष्टीनं काही हा अर्थ स्पष्ट होत नाही..
बुवा – अहो का नाही? नीट पहा.. प्रत्येकाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती, राहणीमान हे त्याच्या जन्मानुसारही अवलंबून असतं ना? तर शेत म्हणजे ज्याच्या त्याच्या वाटय़ाला आलेलं वेगवेगळ्या प्रतीचं जीवन आहे.. जी परिस्थिती आहे ती स्वीकारूनच मला प्रयत्न करावे लागतात ना? मग भले ते ती परिस्थिती पालटण्याचेही का असेनात! तर माझ्या वाटय़ाला ज्या प्रतीची जमीन आली आहे, ती सुपीक असो की नसो, तिथे पाण्याचं प्रमाण चांगलं असो की नसो.. मला त्यातच राबून उत्तम पीक घेण्याचे प्रयत्न करावे लागतात.. ते करीत असताना मोटेतून म्हणजे प्रारब्धाच्या गाठोडय़ातूनही बरंच काही मिळत असतं.. मग ते भलं असेल तर संधी अनपेक्षितपणे वाटय़ाला येते, माणसं अचानक मदतीला उभी राहातात.. ते बुरं असेल तर संधी येऊनही अपयश येतं.. अपेक्षित मदतही मिळत नाही.. तर प्रारब्धाचं हे ओझं शिरावर घेऊन वावरताना खरं पीक कोणतं, खरी मशागत कोणती, खरं कसायचं कुणासाठी, हे उमगलं तर? मग पसारा आपोआप मनातून आवरला जाईल नव्हे, त्या भक्तीनंच तो पूर्ण व्यापला जाईल!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2015 1:01 am

Web Title: wishes volume
टॅग : Life
Next Stories
1 १३३. अवघा
2 १३२. मुळा ते कोथिंबिरी..
3 १३१. कांदा
Just Now!
X