महात्मा आणि हुकूमशहा हे असतात एकाच वर्णपटलावर, फक्त त्यांची दिशा एकमेकांविरुद्ध असते. एवढा भेद सोडला, तर बाकी मग त्यांच्यात साम्ये भरपूर. आर्थर कोस्लर यांनी त्यांच्या ‘योगी अ‍ॅण्ड कोमिसार’ या गाजलेल्या पुस्तकातून हे व्यवस्थित दाखवून दिले आहे. असे असल्यामुळेच लोकांना महात्म्याइतकेच हुकूमशहाचे आकर्षण असते. देशात अराजक माजले, महागाई वाढली, जीवनमान खालावले की लोकांना हुकूमशहाच्या आसूडाची आठवण येते. सुराज्यसंस्थापनार्थाय त्याने अवतारावे असे मनापासून वाटते. लोकशाहीला खरा धोका असतो तो अशा टोकाला गेलेल्या सदिच्छांचा. तिसऱ्या जगातील देशांत लष्करी, हुकूमशाही राजवटी प्रस्थापित होतात, त्याचे हे एक कारण. थायलंडमध्ये सध्या जे घडते आहे ते हेच. तेथील लष्कराने – खरे तर लष्करातील एका गटाने – देशाची सत्ता आपल्या हाती घेतली. रक्ताचा थेंबही न सांडता क्रांती केली. गेले सात-आठ महिने हा देश सरकार समर्थक लाल शर्टवाले आणि विरोधी पिवळे शर्टवाले यांच्या संघर्षांत भरडून निघाला होता. जुलै २०११ मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या पंतप्रधान यिंग्लक शिनावात्रा यांनी सत्ता सोडावी, म्हणून विरोधकांनी देश वेठीस धरला होता. शिनावात्रा यांचे बंधू थाकसिन शिनावात्रा यांनी त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या गैरकारभारामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले होते. त्यांच्या अनुपस्थित त्यांच्यावर खटला चालला. त्यात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. ती रद्द करण्याचा निर्णय गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये शिनावात्रा यांनी घेतला आणि रान पेटले. तेव्हापासून या देशात अराजकी वातावरण आहे. पीपल्स अलायन्स फॉर डेमॉक्रसी हा विरोधी पक्ष त्यात आघाडीवर आहे. हा राजेशाहीवर श्रद्धा असलेल्या, अतिरेकी राष्ट्रवादी अशा शहरी मध्यमवर्गीयांचा पक्ष. या पक्षाचे कार्यकर्ते पिवळे शर्ट घालतात. कारण तो राजाचा रंग आहे. या पिवळ्या शर्टवाल्यांच्या विरोधात थाकसिन समर्थक लाल शर्टवाले आहेत. रस्त्यांवर ते लढत असताना एक लढाई न्यायालयातही सुरू होती. त्यात यिंग्लक यांचा पराभव झाला. अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना पंतप्रधानपद सोडण्याचा आदेश दिला. मात्र सत्ता त्यांच्या पक्षाकडेच ठेवली. मात्र यिंग्लक यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला. येथे पांढऱ्या गणवेशातील लष्कराचा प्रवेश झाला. देशातील अराजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन लष्कराने सत्तेवर कब्जा केला. त्यानंतर आता अवघ्या आठ-दहा दिवसांत तेथील लष्करी राजवट स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहे. थायलंडचे लष्करप्रमुख जनरल प्रयूथ चान-ओछा यांनी परवा, बंडानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जे भाषण केले त्यातून लष्करशाहीची पुढची दिशा चांगलीच स्पष्ट झाली. थायलंडचे वृद्ध आणि हतबल राजे भूमिबोल अदुल्यादेज यांनी जनरल प्रयूथ यांच्या सरकारला आशीर्वाद दिल्यामुळे त्यांचा पांढरा गणवेश अधिकच कडक झाला आहे. त्यामुळेच त्यांनी लष्करशाहीच्या विरोधातील लाल शर्टवाल्यांना गप्प बसण्याचा इशारा देतानाच, नागरिकांनाही खबरदार केले. मला साह्य़ करा. टीका करू नका. नव्या समस्या निर्माण करू नका. त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे   त्यांनी स्पष्टच सांगितले. याचा अर्थ लष्करशाहीचे काम सुरू, स्वातंत्र्य बंद इतका सोपा आहे. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत केवळ दोनच प्रश्नांना उत्तरे देऊन जनरल प्रयूथ यांनी त्याचे     सूचन केले आहेच. यावर अमेरिकेने थायलंडला थोडीशी मदतकपात वगैरे करून हातावर चापटी मारली, इतकेच. एकंदर लाल आणि पिवळ्या शर्टाचा संघर्ष संपून थायलंडमध्ये पांढऱ्या शर्टाचे राज्य सुरू झाले आहे. तेथे आता कधी सूर्य उजाडेल याची खात्री नाही.