अमेरिका व इराण यांच्यात अण्वस्त्र नियंत्रण समझोता होईल, असे कुणालाही वाटले नव्हते; पण तो झाला. र्निबधांनी घायकुतीला आलेल्या इराणला आता मोकळा श्वास घेता येईल. अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याइतकेच या कराराचे श्रेय इराणचे परराष्ट्रमंत्री महंमद जावद झरीफ यांना जाते.
ते मूळ पर्शियन आहेत. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९६० रोजी तेहरान येथे झाला. आता त्यांचे नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठीही चर्चिले जात आहे. सतराव्या वर्षी ते अमेरिकेला गेले. नंतर त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथे ड्रय़ू कॉलेज प्रीपरेटरी स्कूल येथे शिक्षण घेतले. सॅनफ्रान्सिस्को स्टेट विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात बीए केले व नंतर १९८२ मध्ये ते एमए झाले. डेनव्हर विद्यापीठात त्यांनी जेसेफ कोरबेल स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज केंद्रात शिक्षण घेतले व त्याच संस्थेतून आंतरराष्ट्रीय कायदा व धोरण या विषयात विद्यावाचस्पती पदवी घेतली. राजनैतिक पातळीवर त्यांनी अनेक पदे १९९० नंतर भूषवली. ते तेहरान विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यागत प्राध्यापकही आहेत. कट्टर धार्मिकतावादी असलेले झरीफ यांचे इंग्लिश अस्खलित आहे. त्यांचे शिक्षण अलावी स्कूल येथे झाले, ती धार्मिक संस्था होती. त्यांनी लहानपणीच अलि शारियती व समाद बेहरंगी यांची पुस्तके वाचून क्रांतिकारी विचार आत्मसात केले होते. संयुक्त राष्ट्रातही त्यांनी इराणी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. अमेरिकेची सदिच्छा नसतानाही त्यांना संबंध सुधारण्याची आशा होती. नंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या नि:शस्त्रीकरण आयोगाचे अध्यक्ष झाले. ‘इराणिनियन जर्नल ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ व ‘इराणियन फॉरेन पॉलिसी’ या नियतकालिकांचे संपादक होते. २००२ ते २००७ ते संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधी होते.
अध्यक्ष रोहानी यांच्या विश्वासातले म्हणून २०१३ मध्ये ते परराष्ट्रमंत्री झाले. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याशी भेट झाली. झरीफ यांना हा करार करणे शक्य होण्याचे कारण म्हणजे त्यांना अमेरिकी संस्कृती माहिती होती. त्यांचे अमेरिकी नेत्यांशी थेट संबंध होते कारण ते काही काळ राजदूत होते. इराणचे नेते खामेनी यांचा या वाटाघाटीत त्यांना पूर्ण पाठिंबा होता. त्यांनी व्हिएन्नात जी राजनीती वापरली, ती ‘स्माइल डिप्लोमसी व झीरो टेन्शन डिप्लोमसी’ होती. फेसबुकवर त्यांना ७० हजार तर ट्विटरवर ८७ हजार लाइक्स आले आहेत. राजनीतिज्ञाचे मर्म सांगताना त्यांनी म्हटले आहे, की जो वातावरणातील अस्वस्थता आपल्या हास्याआड दडवून वाटाघाटी करू शकतो, तो खरा राजनीतिज्ञ. त्यांच्या या व्याख्येस ते जागले.