श्रीमहाराजांनी आपल्यावर कृपा केली. ते सदोदित पाठीराखे आहेतच. मग आता सुखानं नुसता प्रपंचच करायला काय हरकत आहे? अडीअडचणीला ते धावून यायला आहेतच! मग प्रपंचात भक्तीबिक्तीचं ओझं कशाला, असा लबाड प्रश्न साधकाच्या म्हणजे आपल्याच मनात आलेला आहे आणि त्यावर महाराजही मोठय़ा खुबीने सांगतात की, ‘‘मलासुद्धा अलीकडे प्रपंचात ईश्वरभक्तीची लुडबुड असू नये असे फार वाटते!’’ आता हे ऐकताच प्रपंचाच्या मार्गातला साधनेचा ‘अडसर’ संपलाच, असं वाटून आपण कान टवकारतो. मग महाराज सांगतात की, ‘‘माझी एकच अट आहे, तुम्ही नुसता प्रपंच करायचा काळजी करायची नाही!’’ आता आपण गडबडतो. श्रीमहाराजांना सांगू लागतो, ‘महाराज, प्रपंचात चढउतार येणारच आणि परिस्थिती प्रतिकूल झाली की काळजी लागणारच!’ यावर श्रीमहाराज सांगतात, ‘‘याचा अर्थ असा की, तुम्ही सर्वस्वी परिस्थितीचे दास आहात. प्रतिकूल परिस्थिती येणारच नाही हे तुमच्या हातात नाही. अत्यंत तीव्र प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मरण होय. मरणाची भीती तुम्हाला सतत भेडसावीत असते. ‘काळा’पुढे तुम्ही सतत ‘जी, जी’ करीत असता, त्यामुळे ‘काळजी’ लागते. भगवंताच्या भक्तीला लागून मनापासून नाम घेत गेल्याने राम कृपा करतो. मग काळ आपल्यापुढे ‘जी, जी’ करू लागतो. हे ऐश्वर्य निराळेच आहे. ते प्रत्येकास प्राप्त व्हावे म्हणून मी हा सारा बाजार मांडलेला आहे.’’ या चराचरातील प्रत्येक गोष्ट काळाच्या अधीन आहे. या काळाने जन्मापासून आमच्या देहाला खायला सुरुवातही केली आहे. लहान-मोठे आजारपण, वयपरत्वे शक्ती क्षीण होत जाणे या मार्गाने काळ आमचा ग्रास घेतच आहे. समर्थ म्हणतात, ‘घडीने घडी काळ आयुष्य नेतो!’ आमची नामोनिशाणी पुसून टाकणारा मृत्यू ही तर त्या काळाची अखेरची मेजवानी आहे. मरणाचं वास्तव आपल्याला माहीत असलं तरी मरणाचं भय किंचितही कमी होत नाही. माणूसच कशाला, सृष्टीतील यच्चयावत प्राणी क्षणोक्षणी देहरक्षणाचाच प्रयत्न करीत असतात. समर्थ सांगतात, ‘देहे रक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटी काळमुखे निमाला।।’ हा देह सांभाळण्याची, अर्थात आपलं अस्तित्व टिकविण्याची कितीही धडपड करा. काळ तुमचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. आता आपण काळाच्या तसेच परिस्थितीच्याही अधीन आहोत. ही परिस्थितीही काळाच्या अधीन आहे. त्यामुळे तिच्यात घट आणि बदल अटळ असतो. ती प्रतिकूल झाली की आपण भांबावतो. पुढे काय होईल, या भीतीने अधिकच काळजी करू लागतो. ‘परिस्थिती सदोदित चांगलीच राहावी,’ अर्थात परिस्थितीवर काळाने परिणाम होऊ नये यासाठी आपण काळापुढे सतत ‘जी, जी’ करतो म्हणून आपल्याला काळजी लागते. मग त्यापेक्षा भगवंताचं होऊन गेलं तर? मग काळच आपला दास बनेल. काळाला गुलाम करण्याचं ऐश्वर्य काही निराळंच आहे आणि ते प्रत्येकास मिळावं म्हणून माझा खटाटोप आहे, असं महाराज सांगतात. पण काळ आपला दास होईल, यावर आपला विश्वास आहे?
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2013 रोजी प्रकाशित
१२३. काळजीचा प्रपंच चैतन्य प्रेम
श्रीमहाराजांनी आपल्यावर कृपा केली. ते सदोदित पाठीराखे आहेतच. मग आता सुखानं नुसता प्रपंचच करायला काय हरकत आहे? अडीअडचणीला ते धावून यायला आहेतच! मग प्रपंचात भक्तीबिक्तीचं ओझं कशाला, असा लबाड प्रश्न साधकाच्या म्हणजे आपल्याच मनात आलेला आहे आणि त्यावर महाराजही मोठय़ा खुबीने सांगतात की, ‘‘मलासुद्धा अलीकडे प्रपंचात ईश्वरभक्तीची लुडबुड असू नये असे फार वाटते!’’
First published on: 24-06-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 123 carefull wordly affairs