जगण्यातली आसक्ती काढून टाकणं, हे काही सोपं नाही. ते श्रीमहाराजच करवून घेतील. त्यासाठीच्या प्रयत्नांना मी सुरुवात मात्र केली पाहिजे. ही सुरुवात म्हणजे माझ्या प्रपंचाचं जे मिथ्या रूप आहे, ते जाणून घेत सद्गुरू जी साधना सांगतील ती मी सुरू केली पाहिजे. प्रपंचाचं खरं रूप कसं आहे?  श्रीमहाराज सांगतात, ‘‘द्वैताचा प्रपंच खोटा म्हटला तर आपल्याला समजतच नाही. पण तो निदान आहे तसा तरी मानावा. तो जसा प्रत्यक्ष आहे तसे त्याचे स्वरूप ओळखावे. प्रपंचाचे स्वरूप म्हणजे आज आहे ते उद्या दिसत नाही. आज जसे दिसते तसे उद्या दिसेलच असे नाही. कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही. सर्व वस्तु अनित्य आहेत. म्हणूनच त्यांना सत्यत्व नाही. कारण सत्य वस्तु शाश्वत असते. मग एवढे तरी कबूल केले पाहिजे की प्रपंच दिसतो त्या रूपाने तरी सत्य नाही, लटका आहे. त्याचप्रमाणे देहासकट बाह्य़वस्तूंमध्ये मी ठेवलेले  माझेपण हेही खरे नाही. माझे म्हणावे तर ताबा चालवता आला पाहिजे. पण खुद्द देहावरही सत्ता चालवता येत नाही. त्या देहाकरता ज्या गोष्टी हव्या अगर नको वाटतात ते वाटणेही खरे नाही. कारण हवे ते मिळतेच असे नाही व नको ते टळतेच असे नाही. म्हणून जे दिसते किंवा भासते ते सर्व अनित्य म्हणूनच असत्य आहे हे प्रामाणिक विचाराला पटते. आपण ज्यात रमतो तो प्रपंच सत्यस्वरूपाने असा आहे. पण इतका अनुभव प्रत्येकाला क्षणोक्षणी येत असूनदेखील त्याला ती वस्तू सत्य वाटते हीच खरी भगवंताची माया आहे.. जे नसून भासते ती माया. याला मूळ कारण असेल तर देहबुद्धी किंवा मीपणा.’’ (बोधवचने क्र. ९६९). प्रपंचातल्या वस्तू आणि व्यक्तींचे स्वरूप आहे तसे राहात नाही, हा आपला नित्यानुभव आहे. मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यावर तर माझी सत्ता नाहीच पण ज्या शरीराला मी माझे मानतो त्या शरीरावरही माझा ताबा नाही. ताबा असता तर मला न विचारता केस पांढरे झाले नसते, दात पडले नसते, शक्ती क्षीण झाली नसती! तेव्हा जे दिसते ते या अर्थाने अशाश्वत व असत्य म्हणजे आत्ताच्या रूपात न टिकणारे, असे असूनही ते सत्यत्वाने भासते आणि त्यात आपण गुंततो. हीच माया आहे. तेव्हा परमार्थाची सुरुवात ही या मायेचा निरास आणि भगवंताची आस करून देणारी असली पाहिजे. त्यासाठीचे साधन मायेतीलच पण मायेपलीकडे नेणारे हवे! श्रीमहाराज सांगतात, ‘‘मीपणा घालवण्याकरता काहीतरी मायेतीलच साधन पाहिजे. कारण आपण मायेच्या परिसरातीलच आहोत. पण ते साधन असे पाहिजे की ज्याची सुरुवात मायेत असेल पण शेवट मायेच्या बाहेर असेल. म्हणजे मायात्मक प्रपंच आणि मायातीत परमात्मा यांना जोडणारे साधन पाहिजे. ते साधन म्हणजे नाम हेच होय. एखाद्याला गावाबाहेर जायचे असेल तर रस्ता गावातूनच असणार. पण तो गावाबाहेर पोचवणारा असला पाहिजे. नाम हे सगुण व निर्गुण यांना जोडणारे साधन आहे’’ (बोधवचने, क्र. ९७०). इथे श्रीमहाराज सगुण आणि निर्गुण अशा दोन गोष्टींकडेही संकेत करतात.