आपलं खरं प्रेम केवळ स्वतवरच आहे. पण हा ‘मी’ जो कोणी आहे, स्वतला मी जे काही मानतो तीच माझी खरी ओळख आहे का? तेच माझं खरं स्वरूप आहे का? आपल्या मनाला असा प्रश्न शिवतदेखील नाही. कारण ‘जी गोष्ट अत्यंत प्रेमाची असते तिची शंका नसते!’ जन्मतच मला माझे नातेवाईक मिळाले, जन्मतच मला एक नाव मिळालं. शिक्षण, संस्कार, चरितार्थाचं साधन, पैसा आणि माणसं यांच्या असण्या अथवा नसण्यातूनही माझं एक व्यक्तित्व घडलं. पण हे या जन्मापुरतंच आहे. गेल्या जन्मी मी कोण होतो, माझी सुख-दुखं काय होती, माझी आर्थिक-सामाजिक स्थिती आणि त्यानुरूपच्या चिंता मला काय होत्या; यातलं मला काहीही आठवत नाही. पण श्रीसद्गुरूंना ते पूर्ण माहीत असतं. आपल्याला आपल्या आजवरच्या अनंत जन्मांची ओळख आठवत नसते त्यामुळे त्या-त्या जन्मांतल्या कोणत्या अपूर्त वासना, कोणते संस्कार घेऊन आपण जन्माला आलो आहोत आणि त्या संस्कारांमुळे आपण या जन्मी कसे वावरत आहोत, याची आपल्याला जाणीवही नसते. पण श्रीमहाराज मात्र ते जाणतात. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे- ‘‘तुम्ही स्वतला ओळखत नाही इतकं मी तुम्हाला ओळखतो!’’ हा प्रसंग ‘हृद्य आठवणी’त असा आहे : एकजण श्रीमहाराजांना म्हणाला, ‘महाराज आपण अंतज्र्ञानी आहात. तरी आपण आम्हाला किती ओळखता ते सांगा.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘मी सांगतो त्यावर विश्वास बसेल का?’ तो होय म्हणाला. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘स्वत: तुम्ही तुम्हाला जेवढे ओळखत नाही तेवढेच नव्हे तर त्याहून जास्त मी तुम्हास ओळखतो. जगाचा नियम असा की जेवढा ज्याच्याशी सहवास तेवढी त्याची ओळख जास्त. तुम्हाला सर्वात जास्त सहवास देहाचा आहे. हा देह याच जन्मातील आहे. तेवढाच तुम्ही ओळखू शकता. तुम्हाला जीवदशा प्राप्त झाली तेव्हापासून जे जे देह तुम्ही धारण केले ते सर्व रामकृपेने मला कळतात. यावरून मला तुमची किती ओळख आहे हे ध्यानात येईल.’ तेव्हा आपण स्वतवर जे प्रेम करतो, जो ‘मी’ जपण्यासाठी, जोपासण्यासाठी क्षणोक्षणी जागरूक असतो तो खरा ‘मी’ आपण जाणतच नाही. या जन्मातलं आपलं जे प्रतिबिंब आहे त्यावरच आपण प्रेम करीत असतो. पाण्यातलं ते प्रतिबिंब स्थिर राहावं, यासाठीच सारी धडपड करीत असतो. गेल्या जन्मी मी कोण होतो, मला आठवत नाही. पुढील जन्मी मी कोण असेन, मला सांगता येत नाही. मग या जन्मी मी स्वतला जे काही मानतो त्या मान्यतेला, त्या ओळखीला मी किती घट्टपणे चिकटून आहे! हा या जन्मीपुरताच असलेला ‘मी’ लक्षात ठेवण्यासाठी मला ना जप करावा लागतो, ना ध्यानाला बसावं लागतं, ना कुठली स्तोत्रं वाचावी लागतात. कारण या ‘मी’वर माझं खरं, पूर्ण प्रेम आहे आणि ज्याचं खरं प्रेम असतं त्याची शंका नसतेच!
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2013 रोजी प्रकाशित
१५. प्रतिबिंब
आपलं खरं प्रेम केवळ स्वतवरच आहे. पण हा ‘मी’ जो कोणी आहे, स्वतला मी जे काही मानतो तीच माझी खरी ओळख आहे का? तेच माझं खरं स्वरूप आहे का? आपल्या मनाला असा प्रश्न शिवतदेखील नाही.
First published on: 21-01-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 reflection