एखाद्या शब्दाला ‘प्र’ जोडला जातो तेव्हा तो त्या शब्दात अभिप्रेत स्थितीला अधिक पूर्णत्व आणतो, बळकटी आणतो, परिपूर्णतेकडचा प्रवास सूचित करतो, परिपोष सूचित करतो. ‘गती’ ही खाली घसरतानाही असू शकते, पण त्या शब्दाला ‘प्र’ आधी जोडल्यावर होणारा ‘प्रगती’ हा शब्द विकास आणि परिपूर्णतेकडचा प्रवासच सूचित करतो. तसेच ‘प्रपंच’ शब्दाचे आहे. ‘पंच’ म्हणजे पाच आणि त्या पाचांचा परिपोष ‘प्रपंच’मध्ये आहे. हे ‘पाच’ काय आहेत? अगदी प्रथम आहेत ती पंचमहाभूते. माणसाचं हे शरीर पंचमहाभूतांनीच बनले आहे. त्या पंचमहाभूतांशिवाय जिवाला अस्तित्वच नाही. पंचमहाभूतांनी बनलेला हा देह पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्या आधाराशिवाय या जगात सहज सक्षमतेनं वावरू शकत नाही. माणसाचा या जगातला वावर ‘घर-दार’ या चौकटीतला असतो. या घरा-दारातच त्याचा अख्खा प्रपंच सामावला आहे. हा प्रपंचही पाचांचा आहे. हे पाच म्हणजे- (१) आई-वडील, (२) बायको-मुलं, (३) बहीण-भाऊ अर्थात भावंडं, (४) सगे-सोयरे आणि (५) मित्र व इतर जन. [संदर्भ : श्रीगोंदवलेकर महाराज यांचे ११ मार्चचे प्रवचन] या सर्वाशीच आपला निरनिराळ्या स्वरूपात संबंध येत असतो. या दुनियेत, या प्रपंचात या पाच घटकांव्यतिरिक्त आपला कुणाशीही संबंध येत नाही. या पाच घटकांतच आपली आंतरिक ओढ, आपल्या विकार-वासना, आपल्या भावना-प्रेरणा, इच्छा-आकांक्षा, लोभ-द्वेष सारं काही असतं. आपल्या प्रपंचाचा परीघ हा असा आहे. या परिघाचा केंद्रबिंदू आहे तो ‘मी’! महाराजांनी एके ठिकाणी म्हंटलं होतं की, ‘प्रपंच पाचांचा असताना सुख एकटय़ालाच कसं मिळेल?’ अर्थात ते शक्य नाही. तरीही प्रपंचात जो-तो स्वतलाच सुख मिळावे, या धडपडीने वागत असतो. पूर्वी ही वृत्ती नव्हती त्यामुळे प्रपंचात सर्वजण एकमेकांना धरून होते, एकमेकांत निव्र्याज प्रेमही होते. आज काय स्थिती आहे? श्रीमहाराज म्हणतात, ‘‘सध्या जगातील प्रेम तेवढे गेले, संबंध फक्त राहिला’’ (बोधवचने, क्र. ३६८). घरात काय किंवा दारात अर्थात दुनियेत काय, हेच चित्र आहे. नाती आहेत, संबंध आहेत, त्यातलं प्रेम मात्र गेलं आहे. आहे तो स्वार्थपूर्तीसाठीचा व्यवहार. श्रीमहाराजच सांगतात, ‘‘ज्याच्याकडून स्वार्थ साधेल व जो सुख देईल तो आपला वाटतो’’ (बोधवचने, क्र. ४१२) तेव्हा या प्रपंचात जो माझा स्वार्थ पुरा करतो, जो मला सुख देतो तो मला आपला वाटतो. अशा ‘आपल्या’ माणसांवर मग मी प्रेम करतो, असं मानतो. प्रत्यक्षात आपण प्रेम करीत नाही. आपण भावनिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा ज्यांच्यावर अवलंबून असतो त्यांच्याशी आपण प्रेमानं राहण्याचा प्रयत्न करतो. हे प्रेम नव्हे. हे अवलंबणे आहे. तेव्हा जिथे स्वार्थपूर्तीची हमी आहे तिथेच मी आधार शोधतो, तो मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी धडपडतो. त्या धडपडीतूनच मी प्रपंचात मोह आणि भ्रमाने खोल खोल रूतत जातो. आपल्या प्रपंचाचं हे साधारण चित्र आहे.