वासुदेव गायतोंडे यांच्या अमूर्त चित्राला तब्बल २३ कोटी रुपयांची बोली मिळाल्याने भारतीय चित्रांसाठी जागतिक चित्रलिलावांत लागलेल्या बोलीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला खरा; पण चित्रकलेचा इतिहास असा बाजाराच्या वाटेने मोजता येतो का?
होय आणि नाही. असेही किंवा तसेही. एकाच प्रश्नाची दोन परस्परविरोधी उत्तरे एखाद्या चित्राच्या बाबतीत देता येतात आणि ती दोन्ही खरी असतात किंवा खरे उत्तर दोन टोकांच्या मध्ये कुठे तरी असते. मानवी प्रयत्न एकाच गोष्टीला चहूबाजूंनी भिडत असतात, तेव्हा कुठली तरी एकच शक्यता कशी खरी असेल? वासुदेव गायतोंडे यांचे जे पिवळ्यातांबूस रंगछटांचे, मोठय़ा कॅनव्हासवरले चित्र गुरुवारी रात्री मुंबईत झालेल्या चित्रलिलावात २३ कोटी ७० लाख रुपयांची बोली मिळवून विक्रमी किमतीचे भारतीय चित्र ठरले, त्याबाबतही उत्तरांचे काही वि-जोड तयारच आहेत. उदाहरणार्थ, या चित्रामागे भारतीय रंगसंवेदना आहेत. गायतोंडे यांच्या अनेक चित्रांमध्ये जो मन:चक्षूंपुढे आल्यासारखा एक केवलाकार आणि मग त्याच आकाराचे अनेक तरंगते विभ्रम यांचा व्यूह असायचा, तोही या नव-विक्रमी चित्रात आहे. वेदकाळातल्या अनेक यज्ञवेदी, भिख्खूंसाठी खडकांत खोदलेले अनेक विहार, यांमधल्या सारखेपणाचे सौंदर्यशास्त्र केवळ भारतीय नव्हे तर पौर्वात्य म्हणता येईल, असे आहे. तरीही, हे चित्र निव्वळ भारतापुरते नाही. जुनेही नाही. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना गायतोंडे यांच्या अशाच चित्रांमधून, सहज म्हणून का होईना पण मोठय़ा लोखंडी जहाजांचे पत्रे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने गंजतात आणि त्यांवर आकार दिसतात, त्यांची आठवण झाली होती. त्या पत्र्यांचे तरंगणे नाडकर्णीसारख्या मान्यवर समीक्षकाला गायतोंडे यांच्या चित्रांतले, आध्यात्मिकच समजले जाणारे तरंगते आकार पाहून आठवले होते आणि नाडकर्णीचे हे नवेच, काहीसे खेळकर-खोडकर चित्रवाचन गायतोंडे यांच्या चित्रांमधील आध्यात्मिकतेचा बडिवार माजवणाऱ्यांचे दंभहरण करण्यासाठी पुरेसे होते! गायतोंडे यांची चित्रे आध्यात्मिक सौंदर्यच दाखवतात असे म्हणावे काय, या प्रश्नाच्या उत्तरातली ‘होय आणि नाही’ ही दोन टोके आधीच दिसलेली आहेत.
चित्रांच्या बाजारात गायतोंडे यांची चित्रे गेल्या दहाच वर्षांत- विशेषत: या दिल्लीकर मराठी चित्रकाराच्या मृत्यूनंतर- कशी तेजीत आली आणि गेल्या वर्षीपासून गायतोंडे यांच्या चित्रांमध्ये आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनाही स्वारस्य असण्यामागे न्यूयॉर्कच्या गुगेनहाइम संग्रहालयात २०१५ साली भरणाऱ्या त्यांच्या सिंहावलोकन-प्रदर्शनाचा वाटा कसा आहे, याची दखल ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी घेतली होती. तेजी अथवा मंदीची गणिते समभागांसाठी मांडली जातात, तेव्हा उत्पादन क्षेत्रांचा विचार केला जातो. सिमेंटचा काळ सरला, आता पोलाद उद्योगक्षेत्रात तेजी सुरू झाली आणि तेलखनन क्षेत्रातील तेजी तर सदाफुलीच, असे पक्के निष्कर्ष भांडवली बाजाराच्या अवलोकनातून काढता येतात. चित्रांचे थोडय़ाफार फरकाने असेच होते आणि आहे. भारतीय चित्ररूप शोधण्याची पहिलीवहिली धडपड ज्यांनी यशस्वी केली, ते बंगाल शैलीचे चित्रकार आणि आधुनिकतेची पाश्चात्त्य मळवाट भारतात रुजवताना स्वातंत्र्याच्या उष:काली ज्यांनी ताज्या भारतीय विषयांवर आणि पाश्चात्त्यांच्या तोडीस तोड रंगकौशल्यावर लक्ष केंद्रित केले, ते मुंबईचे चित्रकार यांना चित्रबाजारात नेहमीच मागणी असते. चित्रलिलाव हे या बाजाराचे सर्वाधिक अस्थिर रूप, पण तेथेही ही मागणी कायम राहाते. मुंबईकर आधुनिकतावादी चित्रकारांच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधील रझा, सूझा, हुसेन यांच्या; तर बॉम्बे ग्रुपमधील तय्यब मेहता, रामकुमार यांच्या चित्रांना लिलावांत सहसा चढय़ाच बोली मिळतात. ही बोली किती चढी लागली हे त्या-त्या चित्राच्या अंदाजित किमान आणि कमाल किमतींचे आकडे लिलावदारांनीच छापलेले असतात, त्यावरून ताडून पाहण्याचा खेळच जणू या काही चित्रकारांचे इतिहासातील स्थान अधिकाधिक पक्के करतो आहे, असे गेल्या काही वर्षांत दिसू लागले. ख्रिस्टीज या आंतरराष्ट्रीय लिलावगृहाने मुंबईत पाय रोवण्याच्या उद्देशाने जो पहिला लिलाव गुरुवारी पुकारला, तोही याच चित्रकारांचे महत्त्व वाढवणारा होता. हुसेन यांची तब्बल १४ चित्रे येथे विकावयास होती. या चित्रकाराची रग्गड चित्रे एरवीच उपलब्ध असताना लिलावात कशाला कोण भाव देईल, असा प्रश्न साहजिक असूनही फक्त दोन चित्रे विक्रीविना राहिली. बाकी सारी इतक्या चढय़ा बोलीने विकली गेली की, एका फूटभर रुंदीच्या कागदावरील हुसेन-चित्राने तर, अंदाजित कमाल किमतीपेक्षा साडेचोवीस लाख रुपये अधिक पटकावले. ही तेजी कृत्रिम असू शकते. तय्यब मेहतांचे महिषासुर नावाचे एकच चित्र ख्रिस्टीजनेच यापूर्वी २००२ आणि २००९ साली अमेरिकेतील लिलावांत चढय़ा बोलींनी विकले होते, त्याला तेव्हा नऊ कोटींची बोली तर आता १९ कोटींची, ही वाढ चक्रावून टाकणारी असली तरी ती अशक्य कोटीतील ठरू नये, इतके स्वारस्य आंतरराष्ट्रीय बाजार मेहतांमध्ये दाखवितो आहे. चित्रकार दिवंगत झाल्यानंतरच बोली वाढतात, या कटू सत्याला अपवाद होते प्रभाकर बरवे. त्यांची चित्रे गेल्या काही लिलावांत विकलीच जात नसत. ख्रिस्टीजच्या मुंबई-पदार्पणात बरवे यांच्या अंदाजित किमान व कमाल किमती दीड ते दोन लाख असताना, आठ लाख १२ हजारांची बोली त्यांच्या पाच रंगीत रेखाचित्रांनी मिळवली. याउलट, यंदा बंगाल शैलीचा भाव मात्र फार हालचाल करीत नाही, असे दिसले. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या चित्राने २.५० कोटींच्या कमाल अंदाजाऐवजी २.९० कोटी मिळवून दाखवले; परंतु गगनेंद्रनाथ आणि अवनींद्रनाथ हे अन्य टागोर, तसेच नंदलाल बोस यांच्या चित्रांनी किमतींचे कमाल अंदाज ओलांडले नाहीत.
किमतींची आणि बोलींची ही चर्चा केवळ लिलावातील अहमहमिकेतून वाढलेला बाजार म्हणून होत राहिली, तर एक वेळ ठीक. पण या बाजारातून जणू इतिहास पक्का होतो आहे, अशी आजवर अलिखित असलेली एक समजूत भारतीय चित्रव्यवहारांत आज दिसते, ती गांभीर्याने घेऊ नये, हे या लिलावातून दिसले. कोणत्याही चित्रलिलावात इतिहासमूल्य असलेली चित्रेच चढी बोली मिळवणार, या गृहीतकाला छेद देण्यासाठी ‘मिळवली चढी बोली की इतिहासमूल्यही जास्त’ हा त्याचा विचित्र व्यत्यास पुरेसा असतो. हेच याही लिलावांत काही बोलींमधून दिसले. गायतोंडे, बरवे, मेहता यांची चित्रकलेतील कामगिरी अभिमानास्पद होती. परंतु तो अभिमान निव्वळ जादा दौलत यांच्या चित्रांवर उधळली जाते आहे, एवढय़ा कारणाने वाढण्यात काय हशील? कलेतिहास आपल्याच गोदामांत वा भिंतींवर ठेवू पाहणारी दिल्ली आर्ट गॅलरी मुंबईत बस्तान बसवू पाहाते आहे, ख्रिस्टीजला ताज्या लिलावातील यशाने जणू प्रभावळच मिळते आहे आणि मुंबईचीच काही जुनी कलादालने मात्र जाणतेपणा न दाखवता आहे ते विकून टाकू अशा बेतात आहेत. अशा वेळी बाजाराने कलेतिहासात लुडबुडीची आयती संधी साधली नाही, तरच नवल.
त्या बाजारात मराठी टक्का इतका नगण्य आहे की ख्रिस्टीज, लिलाव, गॅलरी, अंदाजित किमती हे सारे शब्दही मराठीत परकेच वाटतात. परंतु राजकीय इतिहासाशी असलेले नाते आधीच जातीपातींच्या राजकारणात हरवून बसलेल्या भाषक गटाला महाराष्ट्रात घडलेला कलेइतिहास जपण्याचे भान समजा कधीकाळी आलेच, तर तो इतिहास बाजारवाटेवर शोधावा लागू नये, यासाठी ही नोंद.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A painting by vasudeo s gaitonde set a record
First published on: 21-12-2013 at 04:38 IST