दिल्लीसारख्या एकाच परंतु महत्त्वाच्या राज्याची सत्ता मिळालेल्या आम आदमी पक्षाला व्यक्तिमत्त्वांच्या अहंगंडाने पछाडले आहे. पक्षांतर्गत बाबींचा उल्लेख असणारी पत्रे माध्यमांपर्यंत पोहोचवून गटबाजीचे जाहीर प्रदर्शन घडवणारा हा पक्ष अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा तसूभरही वेगळा नाही, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. पक्षाचा चेहरा असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध पक्षात मोहीम सुरू असून, त्यांचे पक्षातील नेमके स्थान कोणते, असा कुजबुजीच्या रूपात विचारलेला प्रश्न जाहीर करण्याची नवी संस्कृती या पक्षात निर्माण होऊ लागली आहे. याला विचारस्वातंत्र्य असे म्हटले जात असले, तरी कुणापेक्षा कोण मोठे हे ठरवण्याचा हा सारा खटाटोप आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षाला जे यश मिळाले, त्यास भाजपच्या केंद्रातील सत्तेने केलेल्या नाराजीचे कारण होते. ‘आप’चा दिल्ली-विजय अभूतपूर्व आणि ऐतिहासिक होता; परंतु दिल्लीत सत्ता स्थापून महिना पुरा व्हायच्या आतच या यशाकडे तटस्थपणे पाहण्याएवढा समंजसपणा या पक्षातील नेत्यांनी गमावला आहे. बुद्धिमान आणि विचार करणाऱ्या नेत्यांची संख्या आपल्या पक्षात जास्त आहे, असा तोरा बाळगणाऱ्या ‘आप’ला हे लक्षात आले नाही की, बुद्धिमंतांच्या दुनियेत वादविवादांतून मिळणारा आनंद आणि त्यातील युद्धात मिळणारा विजय, याचा प्रत्यक्षातील जीवनावर विपरीत परिणाम घडत असतो. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना राजकीय निर्णयप्रक्रियेत स्थान असू नये, असा हट्ट धरणाऱ्या पक्षातील काही जणांनी डावपेचही सुरू केले. हे भांडण अहंगंडाचे नसून कल्पनांच्या विरोधाचे आहे, असे शाब्दिक मुलामे देणाऱ्या आशुतोष आणि अभय खेतान यांच्यासारख्या माजी पत्रकारांनाही त्यातील फोलपणा समजू नये, हे आश्चर्यकारक वाटणारे आहे. सत्तेत कशासाठी जायचे, याचे जे दाखले निवडणुकीपूर्वी दिले जात होते, ते सत्ता मिळाल्यानंतर कसे विसरले गेले याचे हे उदाहरण आहे. केवळ भावनेच्या तरंगावर विराजमान होऊन, एक चेहरा- मुख्यमंत्रिपदाचा एकच उमेदवार पुढे करून सत्तेचा सोपान चढणे एक वेळ शक्य असते. मात्र तेथे बसल्यावर सामान्यांच्या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी आपली सारी ताकद एकत्रितपणे पणाला लावावी लागते. तसे होण्याऐवजी आधी दिल्लीतील सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात की आधी देशभर प्रचाराचे रान उठवावे, हा ‘आप’मध्ये वादाचा मुद्दा झाला आहे! बाजारात तुरी.. पद्धतीच्या या वादातून एकच गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे, ती म्हणजे स्वत:ला ‘आप’चे धुरीण म्हणवणाऱ्यांचे अहंकार. आम आदमी पक्षाला व्यक्तिस्तोम नवे नाही. अरविंद केजरीवाल यांची एक तऱ्हा, तर प्रशांत भूषण यांची आणखी एक. प्रत्येकाला स्वत:चे अस्तित्व टिकवण्याची, शक्य झाले तर ते उजळवण्याचीच घाई. मुख्यमंत्रिपदी बसलेल्या केजरीवाल यांना सत्तेची शिडी चढता आली, पण पक्ष चालवण्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक मुक्तता त्यांच्यापाशी नाही. जरासा विरोध होताच उसळून उठण्याचा त्यांचा स्वभाव आहे. बौद्धिक पातळीवरील वादांमध्ये हरणे किंवाजिंकणे याला फारसे महत्त्व नसते; परंतु सत्ताकेंद्रातील वादांना सत्तेबरोबर येणाऱ्या विविध प्रकारांच्या गंडांचे पदर असतात. ‘आप’ला लागलेले हे बौद्धिक ग्रहण लवकरात लवकर दूर होण्यासाठी पक्षातील सगळ्याच नेत्यांनी बौद्धिक अहंकारावर विजय मिळवणे चांगले, पण ते जमत नसेल तर किमान समंजस होणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap suffers from internal dispute
First published on: 03-03-2015 at 01:16 IST