प्रा. मंजिरी घरत

Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

मानसिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत; पण आधी आजार ओळखून ते मान्य करण्याची गरज आहे..

मनाची चंचलता, चपळता हे मानवी वैशिष्टय़. पण जेव्हा मनाचे भान विस्कटते, मन भरकटते, तेव्हा मानसिक आजारांची सुरुवात होते. जागतिक आरोग्य संघटनेने २१वे शतक प्रामुख्याने मानसिक अनारोग्याचे असणार हे २००१ चा वार्षिक अहवाल मनोविकारांवर केंद्रित करून सूचित केले होते. आधुनिक जगात मानसिक अनारोग्य हा एक ज्वलंत प्रश्न ठरला आहे. स्किझोफ्रेनिया, नैराश्य (डिप्रेशन), चिंता (अँग्झायटी डिसॉर्डर्स) वा तत्सम मनोविकारांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. मानसिक असंतुलनामुळे होणाऱ्या दुर्घटना आपण रोज वाचतोच. (सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या अगदी अलीकडील उदाहरण)

सर्व वयोगटांत हे आजार दिसतात ; पण तरुण रुग्णांचे प्रमाण अधिक दिसते. अमेरिकेतील एका राष्ट्रीय पाहणीत २००७ पेक्षा २०१८ मध्ये विद्यार्थ्यांमधील तीव्र नैराश्य, स्वत:ला इजा करण्याची वृत्ती व आत्महत्यांचे विचार यात दुपटीने वाढ झाल्याचे आढळले होते. १९९० शी तुलना करता भारतातील मनोविकारांचे प्रमाणही बरोबर दुप्पट झाले आहे. म्हणजे जसे मधुमेह, उच्चरक्तदाब यांचे प्रमाण दुप्पट झाले तसेच मनोविकारांबाबबतही झाले. ‘आहार विहार विचार’सारेच आधुनिक जीवनशैलीने व्यापल्याने शारीरिक आणि मानसिक आजार झपाटय़ाने वाढले.  ‘निमहान्स’ (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस) या बेंगळूरुच्या संस्थेने भारतातील मनोविकारांचे प्रमाण, प्रकार याबाबत पाहणी केली. २०१७ मध्ये आपल्या लोकसंख्येच्या १४ टक्के लोकांना मनोविकार होते, त्यापैकी साडेचार कोटींना नैराश्य तर दोन कोटींना चिंतेने, एक कोटी लोकांना स्किझोफ्रेनियाने ग्रासले होते. शिक्षणक्षेत्रात असणारे सर्वच सहमत होतील की, विद्यार्थ्यांतील मानसिक समस्यांचे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढत आहे. आनुवंशिकता, भोवतालचे वातावरण, तणाव, व्यसनाधीनता, मानसिक आघात अशी कारणे यामागे असू शकतात.

मनोविकारांचा उगम नेमका कोणकोणत्या कारणांनी झाला हे नेमके लक्षात येतेच असेही नाही. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट आठवतो ना? त्यात मुन्नाभाई सांगतो, अरे मानसिक रुग्ण म्हणजे वेडा  नव्हे, तर त्याच्या मेंदूत ‘केमिकल लोचा’ असतो. काही प्रमाणात हे सत्य आहे. म्हणजे असे की, आपल्या शरीरात, मेंदूत काही विशिष्ट रसायने (न्यूरोट्रान्स्मिटर्स) असतात. ती संदेशवहनाचे काम करतात; पण मनोविकारांत त्यांचे संतुलन बिघडलेले दिसते. स्किझोफ्रेनियात डोपामाइनचे प्रमाण वाढते तर डिप्रेशनमध्ये सिरोटोनिन व नॉर-अ‍ॅड्रिनालिन कमी होते. ते नेमके असे का होते, यावर संशोधन चालू आहे. शारीरिक व्याधींसाठी जशा रोगनिदान चाचण्या असतात तशी सरळसोपी समीकरणे इथे नसतात. तज्ज्ञ डॉक्टर लक्षणांवरून आजाराचे निदान करतात. मनोरुग्णांना सांभाळणे हे कुटुंबीयांसाठी एक आव्हान असते. पण योग्य औषधोपचार, समुपदेशन, पेशंट सपोर्ट ग्रूप्स (रुग्णसहायता गट) अशा उपचारपद्धतीमुळे रुग्ण पूर्ण बरा होतो किंवा आजार नियंत्रणात तरी राहतो.आत्महत्यांच्या कृतीपर्यंत मनाने अनेकदा पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना मानसोपचार-तज्ज्ञांकडे पाठवल्यावर आजारातून ते बरे तर झालेच; पण आज उत्तम यशस्वी आयुष्य जगत आहेत हा स्वानुभव आहे.

डिप्रेशन हा सर्वाधिक आढळणारा एक मानसिक आजार. सतत दु:खी, निराश, आपण निरुपयोगी आहोत असे आणि आत्महत्येकडे नेणारे विचार यात दिसतात. बायपोलर नैराश्यात ‘मूड स्विंग’ असतात. कधी खूप आनंदी, उत्साही; तर कधी अचानक दु:खी राहणे हे परिणाम दिसतात. साधारण ६० टक्के रुग्णांना, आपल्याला उपचारांनी बरा होणारा ‘नैराश्य’ हा आजार आहे, हेच लक्षात येत नाही. कुटुंबाचा सहभाग (फॅमिली सपोर्ट), संवाद अशा रुग्णांसाठी खूप गरजेचा असतो. अँटी-डिप्रेसंट औषधे सिरोटोनिन व नॉर-अ‍ॅड्रिनालिनचे प्रमाण वाढवतात. स्किझोफ्रेनियात रुग्ण स्वत:च्या विश्वात गुंग होतो. वास्तवापासून फारकत होते, काही रुग्ण एकदम गुपचूप (विद्ड्रॉन) राहातात; तर काही आक्रमक होतात, भावनिक उद्रेक होतो, भ्रम व भास होतात. स्किझोफ्रेनियासाठी मुख्यत: अँटी-सायकॉटिक औषधे वापरतात. औषधांचा सुपरिणाम दिसणे सुरू होण्यासाठी कमीत कमी दोन आठवडे तरी जावे लागतात. ‘घेतले पॅरासिटॅमॉल, उतरला ताप’- असा झटपट परिणाम इथे नसतो. रुग्ण व कुटुंबीयांनी पेशन्स ठेवणे महत्त्वाचे. साइड इफेक्ट्सची भीतीही खूप असते. पण उपचारांच्या सुरुवातीला हा त्रास अधिक जाणवतो. कालांतराने तो सुसह्य होता. बरीच वर्षे किंवा काही रुग्णांना कायम औषधे घ्यावी लागतात. अनेक रुग्ण हे फेरतपासणीसाठी सुरुवातीला जातात, नंतर औषधे बंद करतात. औषधांमध्ये धरसोड, बंद करणे घातक ठरते.

अनेक मानसोपचारतज्ज्ञ, संस्था सातत्याने जनजागरण करत असल्याने अलीकडे मानसिक आजाराविषयी जागरूकता थोडी वाढत आहे. तुलनेने पूर्वीपेक्षा समाज आणि रुग्णांकडून या आजाराविषयीची स्वीकार्यता (अ‍ॅक्सेप्टन्स) वाढत आहे. डिप्रेशनमधून बाहेर आलेले काही रुग्ण समाजमाध्यमांमध्येसुद्धा याविषयी मोकळेपणाने व्यक्त होत आहेत. पण तरीही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे.

वागणुकीत बदल, अभ्यासात अचानक पीछेहाट, मूड स्विंग ही मानसिक आजाराची सुरुवात असू शकते. फॅमिली हिस्ट्री असेल, तर अधिकच सावध राहावयास हवे. कधी कधी शारीरिक दोष काहीच सापडत नाही, पण डोकेदुखी वा इतर प्रदीर्घ वेदनांचे मूळ कारण मानसिक व्याधींत असते. मानसिक आजार वेळीच ओळखले तर बरे होऊ शकतात. रुग्ण नॉर्मल आयुष्य जगू शकतात. आपल्याला आजार आहे, हे काही रुग्ण मान्यच करत नसतात. ‘मी काय वेडा आहे का सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जायला’ असे काहींना वाटते.  औषधोपचारांना विलंब झाल्यास आजाराची तीव्रता वाढलेली असते. आजही या आजारांविषयीचे असलेले गैरसमज, शरम/ कलंक (स्टिग्मा) यांमुळे लपवाछपवी, विलंब असे प्रकार कुटुंबीयांकडूनही होतात. मनोविकार हे शारीरिक आजारांप्रमाणेच एक आजार म्हणून स्वीकारायला हवे. कुणी असे मुद्दाम वागत नसते, हे रुग्ण आहेत, हे स्वीकारायला हवे.

३०-४० वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्य बऱ्यापैकी साधे सरळ  होते, म्हणतात ना ‘अ‍ॅपल तेव्हा फळच होते (अ‍ॅपल संगणक नव्हते) आणि माऊस तेव्हा प्राणीच होता (संगणकीय भाग नव्हता)’!  मानसिक आरोग्याचा विचार करताना सध्याच्या डिजिटल जीवनशैलीचाही विचार आवश्यक ठरतो. इंटरनेट, समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर याचाही  मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम निश्चित होत आहे. युवा पिढीतील काही जणांमध्ये ‘इंटरनेट अ‍ॅडिक्शन डिसॉर्डर’- म्हणजे इंटरनेटची अनियंत्रित आसक्ती, न मिळाल्यास दु:खी, आक्रमक होणे दिसते. आपल्या सर्वाचाच समाजमाध्यमांवरील सततचा वावर आधीच चंचल असणाऱ्या मनावर माहितीचा भडिमार करतोय, सतत कनेक्टेड आणि ऑनलाइन मनाची एकाग्रता, सजगता राहणे कसे शक्य आहे? आम्ही एक छोटेखानी सर्वेक्षण केले. त्यात दर किती मिनिटांनी फोनकडे बघता, अ‍ॅप्स बघता असा प्रश्न होता. दर पाच मिनिटांनी किंवा त्याही आधी फोन बघणाऱ्यांची संख्या सर्वाधिक हाती. आपण आपला मेंदू सहज स्मार्ट फोनला गहाण देऊन टाकलाय. व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेश ‘फॉरवर्ड’ करण्याच्या प्रमाणात भारत जगात टॉपला आहे. अ‍ॅप्सना इतके आपलेसे केल्याने स्मरणशक्ती, विचारक्षमता यांवर परिणाम होत असतोच. मर्यादित वापर, डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना अमलात आणणे  महत्त्वाचे आहे. आहार व मनोविकार यांचेही नाते स्पष्ट होत आहे. फॉलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी-१२ यांच्या कमतरतेचा मनोविकाराशी संबंध आहे. आहारातून कबरेदके खूप कमी केली तर मेंदूला आवश्यक असणाऱ्या रसायनांची निर्मिती (ट्रॅप्टोफन, सिरोटोनिन जे आपल्याला आनंदी करतात) कमी होते.

डिप्रेशन आणि आत्महत्या यांचे वाढते प्रमाण पाहता मानसिक आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी व्यापक विचार करण्याची वेळ आली आहे. सुजाण पालकत्व आणि शिक्षण यांची भूमिका महत्त्वाची आहेच. मनाच्या इमारतीचा पाया भक्कम करणे गरजेचे आहे. शारीरिक शिक्षण हा विषय असतोच, तसे मनाच्या मशागतीसाठी विशेष वेगळे प्रयत्न करावे लागतील. परदेशी विद्यापीठांत ‘लेट्स टॉक’  किंवा तत्सम नाव असलेले उपक्रम विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे यासाठी प्रयत्न करतात. अनेक शिक्षण संस्थांमध्ये, कार्यालयांत प्रोफेशनल समुपदेशक नेमण्याची पद्धत आपल्याकडे रूढ होत आहे. मानसिक प्रथमोपचार म्हणजे मानसिक असंतुलनाची लक्षणे वाटली तर लगेच करावयाचे उपाय याचाही विचार करावा लागेल. बँडेज, अँटिसेप्टिक असणारा ‘फर्स्ट-एड बॉक्स’ आपल्याला माहीत आहे; पण आता मनाची दुखणी वाढताहेत, म्हणून ‘मेंटल फर्स्ट-एड’ अशा शाखा विकसित होत आहेत. मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रथमोपचार ते औषधोपचार ही आधुनिक जीवनशैलीची देणगी आहे.

सकारात्मक विचार, कृतज्ञतेने उत्तम जीवनशैली ठेवून मनाचे भान जपत जगणे आपल्या हातात आहे, ते केले पाहिजे.

लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.

ईमेल : symghar@yahoo.com