वारंवार भेटून अभंगच आपल्याशी आत्मिक संवाद साधू लागतो. गूढ अर्थाची उकल सहज करू लागतो, हे अचलानंद दादांचे उद्गार हृदयेंद्रच्या मनाला भिडले. त्याला आठवलं, खरंच शब्द तेच असतात, पण त्यांचं सखोल अर्थरूप सद्गुरुकृपेशिवाय उघड होतंच असं नाही! भारावून तो म्हणाला..

हृदयेंद्र- दादा, ‘मनाचे श्लोक’ तर लहानपणापासून वाचत असे. पाठांतर पक्कं, पण अर्थ आणि भाव यांची जाण पक्की नाही, हे श्रीसद्गुरूंच्या सहवासातच समजलं. एकदा त्यांनी विचारलं, ‘जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे। जनी वंद्य ते सर्व भावे करावे। म्हणजे काय?’ ‘‘मी म्हणालो, लोकांना जे आवडत नाही ते सोडावं आणि लोकांना जे आवडतं ते करावं!’’ हसून म्हणाले, ‘‘लोक तर काय अध्यात्म मार्गाचीच निंदा करतात! मग तो सोडून द्यायचा काय?’’ मी संभ्रमात पडलो. तर म्हणाले, ‘‘जन म्हणजे लोक नव्हेत! जन म्हणजे निजजन, संत सज्जन!’’ मग म्हणाले, ‘‘आणखी एका ओवीत आहे ना? जनी तोचि तो मानवी धन्य होतो। म्हणजे खरा भक्त सज्जनांमध्ये आणि लोकांमध्येही धन्य होतो!’’ तेव्हा तुमचं म्हणणं खरंच आहे. अभंगाचं चिंतन वाढलं, सहवास वाढला, संग वाढला की तोच बोलू लागेल! विठा महाराजांच्या या अभंगात आता खोल बुडावंसं वाटतंय. काय सुंदर शब्द आहेत.. मरण हे पेरणे जन्म हे उगवणे!
अचलदादा- पण ही अर्धीच ओळ झाली, ‘हे मायेची खूण जाणीतली’ इथं या मुद्दय़ाला पूर्णत्व येतं..
हृदयेंद्र- अर्थ कळल्यासारखा वाटतोय.. पण तुम्ही तो अधिक समर्पक सांगाल म्हणून उत्सुकता वाढली आहे..
अचलदादा- (हसतात.. मग काही क्षण अंतर्मुख होऊन डोळे मिटतात, जणू अभंगाशी आत्मिक संवाद साधत आहेत! मग गंभीरपणे बोलू लागतात..) मृत्यू म्हणजे आपण जणू जीवनाचा शेवट मानतो, नाही का? (हृदयेंद्र होकारार्थी मान हलवतो) मरणाला आपण ‘अंत’ हाच पर्यायी शब्द वापरतो! इथं मरणाला पेरणं म्हटलं आहे! बी मातीत मिसळते हा बीचा अंत आहे का? वरकरणी म्हणाल, हो, बीचं रूप तर काही उरत नाही! पण त्या एका बीच्या या तथाकथित ‘अंता’तच एका वृक्षाचा जन्म होतो ना?
हृदयेंद्र- वा! ‘बीज नुरे डौलात तरू झुले’.. ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या गीतातले हे शब्द तेच तर सांगतात!
अचलदादा- तेव्हा मरण शेवट नव्हे! अंत नव्हे! मरण ही सुरुवात आहे!! जे पेराल ते उगवतं म्हणतात ना? मग इथे मरण पेरलंय आणि जन्म उगवलाय, याचा अर्थ लावा पाहू!
हृदयेंद्र- (उजळत्या चेहऱ्यानं) मरण हा अंत नसेलही, पण एका जीवनाच्या संधीची ती अखेरही आहे..
अचलदादा- पण जीवनाचा प्रवाह तर अखंड आहेच! माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू होणार, ही जाणिवेची मर्यादा त्या अखंड जीवनप्रवाहाविषयीच्या जाणिवेच्या अज्ञानातून आली आहे.. ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू होणारच.. पण तो ज्या चैतन्यशक्तीचा अंश आहे, जिच्या आधारावर या चराचरात त्याचंही अस्तित्व आहे ती अखंड आहेच! तिला नाश नाही, अंत नाही! ही जाणीव नसल्याने प्रत्येक जन्मात स्वतंत्र ‘मी’ जन्मत आहे नि मरत आहे!
हृदयेंद्र- हो ना! मीसुद्धा त्याच अर्थानं म्हणत आहे की, या जन्मात माझी जी ओळख आहे, माझी जी परिस्थिती आहे, माझी जी जडणघडण आहे त्यानुसार ‘मी’ कर्म करीत आहे.. त्या कर्माची फळं भोगत आहे..
अचलदादा- (हसतात) सगळं गुरुजींकडून आलेलं आहे.. पण तुम्हीच सांगा.. कधी कधी काही वेगळी छटा त्यात येते.. जी मलाही नव्यानं जाणवते.. बोला..
हृदयेंद्र काही बोलला नाही. अचलदादा घसा खाकरून म्हणाले) वासना म्हणा, कामना म्हणा, विचार म्हणा, कल्पना म्हणा सर्व ‘मी’ला चिकटून आहेत.. हवं- नकोपणा हा या वासनापुंजाचा प्राणवायू आहे.. त्याचा निरास होऊ लागला तर वासनेचं अस्तित्व बाधक होणार नाही.. तर मुद्दा असा की, वासनेच्या बीजातून माझा ‘जन्म’ होतो आणि नव्या ‘जन्मा’त माझ्या अतृप्त वासना पूर्ण होणं तर दूरच, आणखी नवनव्या वासना उत्पन्न होऊ लागतात.. त्या वासनांच्या पूर्तीचा अवधी हा ‘जन्म’ संपण्यानं सरतो, पण वासना ओसरल्या नसतात! म्हणूनच हे मरण म्हणजे नव्या जन्माचं पेरणंच ठरतं!! हा जन्म आणि मृत्यू आणि जन्म-मृत्यूच्या या चक्रामागं असलेली वासना हे सर्व मायेच्या प्रांतातलं आहे.. मायेच्या आधीन आहे.. म्हणून विठा महाराज म्हणतात, ‘मरण हे पेरणे जन्म हे उगवणे! हे मायेची खूण जाणीतली।।’ आता आणखी मोठा चकवा पुढच्या चरणात आहे.. ‘संग तुझा पुरे संग तुझा पुरे। संग तुझा पुरे नारायणा।।’