श्रीतुकाराम महाराज यांचा ‘आनंदाचे डोही’ हा विख्यात अभंग हृदयेंद्र गायला तेव्हा योगेंद्र हसून म्हणाला..
योगेंद्र – आपलं काय ठरलं होतं? मूळ अभंग शोधून वाचायचा.. बरेचदा आपल्याला गाण्याच्या रूपात ऐकलेला अभंग पाठ असतो आणि त्यातही एखाद शब्दाची मोडतोड आपल्याकडूनही होते..
हृदयेंद्र – ठीक आहे, पण कर्मूकडे गाथा असेलसं मला वाटत नाही..
कर्मेद्र – मलाही वाटत नाही..
हृदयेंद्र – पण तरीही प्रयत्न करून पाहू.. तुझ्या आजीच्या कृपेनं काहीतरी मिळेल! (हृदयेंद्र पुन्हा कपाटाशी जाऊन शोध घेतो.. अनेक पुस्तकांच्या मागे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची गाथा दिसताच तो आनंदतो.. ते ग्रंथ बाहेर काढून अलगद टेबलावर ठेवतो.. मग गाथेच्या शेवटी असलेल्या परिशिष्टावर नजर टाकत ‘आ’पासून सुरू होणाऱ्या अभंगांचा क्रम वाचू लागतो..) आनंद अद्वय.. आनंदाच्या कोटी.. हं मिळाला.. (मग सगळ्यांकडे नजर टाकत मूळ अभंग काढतो आणि म्हणतो..) मिळाला, ऐका आता छापील मूळ अभंग.. तुकाराम महाराज सांगताहेत..
आनंदाचे डोहीं आनंद तरंग।
आनंदचि अंग आनंदाचें।।
काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं।
पुढें चाली नाहीं आवडीनें।।
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।।
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा।
अनुभव सरिसा मुखा आला।।
अभंग वाचून झाल्यावर हृदयेंद्रनं सर्वाकडे नजर टाकली. मग त्यानं विचारलं, ‘‘काय समजला ना अभंग?’’ अभंग तर अनेकदा ऐकला आहे, सोपा आहे, असा भाव बहुतेक सर्वाच्याच चेहऱ्यावर होता.. प्रज्ञासमोर एकदा या अभंगाची चर्चा व्हावी, ही आपली इच्छा आज फलद्रुप होते आहे, या जाणिवेनं हृदयेंद्रला समाधान वाटलं.. तोच कर्मू म्हणाला..
कर्मेद्र – पुस्तकात अर्थ काय दिलाय तो वाच.. मग दुसरा अभंग घेऊ..
हृदयेंद्र – (हसत) तुझ्या महत्त्वाकांक्षेचं मला कौतुक वाटतं, पण अभंगाची चर्चा कुठे संपेल, हे आपल्याला कुठे माहीत असतं? बरं, पण अर्थ तर वाचतो.. ऐका.. आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।। म्हणजे मी आनंदाचा, ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे, म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे.. काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। म्हणजे मला जे काही सुख झाले ते काहीच्या बाहीच आहे. त्याचे मी काय वर्णन करू शकतो? कारण त्याच्या प्रीतीने प्रपंचाची पुढील हाव संपली आहे. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। म्हणजे पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. कारण त्या ठिकाणचा म्हणजे गर्भाचा स्वभाव तेथेच म्हणजे आईमध्येच प्रकट होतो.. तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला।। म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की त्याचप्रमाणे जो अनुभवाचा ठसा माझ्या अंत:करणात उमटला तो माझ्या वाणीद्वारे प्रकट झाला..
कर्मेद्र – वा वा.. छान.. समजला अर्थ आणि हे गाणंसुद्धा कितीवेळा ऐकलंय..
हृदयेंद्र – अभंगाखालच्या अर्थाचीही कृपा असतेच.. पण तरीही त्या अर्थापलीकडेही शोध घ्यावासा मला नेहमीच वाटतो.. किंबहुना या अर्थामुळे तो शोध सोपा होतो, असं मला वाटतं.. अभंगातले काही शब्द आणि त्यांचा अर्थ माझ्या मनात शंका उत्पन्न करतात आणि त्यायोगे अभंगाचं चिंतनच अधिक सखोल होतं..
योगेंद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – काय सांगो झाले काहीचिया बाही.. यात सुखाचा उल्लेखही नाही. अर्थात मात्र दिलंय की मला जे सुख झालं ते काहीच्या बाहीच आहे.. आता काहीच्या बाही हा शब्द आपण अतिरेकी गोष्टीबाबत वापरतो.. उदाहरणार्थ काहीच्या बाही बोलू नकोस.. काहीच्या बाही वागू नकोस.. सुख काहीच्या बाही असेल? गर्भाचे आवडी या चरणात ‘जिव्हाळा’ शब्दाचा अर्थ ‘स्वभाव’ कसा होईल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara
First published on: 07-10-2015 at 01:25 IST