आंतरिक पालट घडविणे, हाच साधनेचा मुख्य प्राथमिक हेतू असतो. त्यासाठी आपण साधना का करतो याची शुद्ध जाणीव साधकाला हवी. साधना करून भौतिक स्थितीत पालट काय झाला, हे पाहाणे व्यर्थ आहे. आंतरिक बदलांचीच तपासणी झाली पाहिजे. साधना सतत होऊ लागली तर साधनेत नाही, तर साधना करणाऱ्या ‘मी’मध्ये पालट होऊ लागतो. हा पालट पूर्णत: झाला तरच श्रीसद्गुरूंचा प्रेमतंतू अंत:करणात उत्पन्न होतो. मग ‘मी’ प्रेरित जगण्याची आवडच उरत नाही, इथवर चौघा मित्रांची चर्चा येऊन ठेपली. हृदयेंद्र त्यावर म्हणाला..
हृदयेंद्र:- साधनेनं अंतर्मुख होत जाणं आणि बहिर्मुखतेची सवय तोडत जाणं, ही प्रक्रिया सारखीच व्हायला हवी, कारण बाह्य़ परिस्थितीचा फार मोठा प्रभाव साधकावर पडत असतो. जोवर तो अंतर्मुख होत नाही तोवर हा प्रभाव खरवडला जात नाही.
योगेंद्र:- साधना कशी करावी यावरही अभंग असतील.
हृदयेंद्र:- हो तर.. तुकोबांचेही असे अभंग आहेत.. एकेक अभंग म्हणजे जणू एक एक अभ्यासक्रमच आहे! एक अभंग माझ्या टिपणवहीत आहे.. (वही काढून पानं चाळतो) हं. ऐका.. ‘‘साधकाची दशा उदास असावी। उपाधि नसावी अंतर्बाहीं।। लोलुप्यता काम निद्रेसी जिंकावें। भोजन करावें परिमित।। एकांती लोकांनी..’’ आता इथे मूळ शब्द ‘स्त्रियांशी’ आहे, पण अर्थ फार वेगळा आहे. तर.. ‘‘एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण। प्राण गेल्या जाण बोलो नये।। संग सज्जनांचा उच्चार नामाचा। घोष कीर्तनाचा अहर्निशीं।। तुका म्हणे ऐशा साधनीं जो राहे। तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा।।’’ तर साधकाची दशा उदास असावी!
कर्मेद्र :- उदास! जर साधक उदास, दुर्मुखलेला, रडका असेल तर मग पुढचा अभ्यास कशाला हवा?
हृदयेंद्र:- उदास म्हणजे निराश आणि हताश नव्हे बरं का! समर्थानी म्हटले आहे- ‘‘सावध दक्ष तो साधक। पाहे नित्यानित्यविवेक। संग त्यागूनि येक। सत्संग धरी।।’’ सावध असणं हे साधकाचं पहिलं कर्तव्य आहे. जो दक्ष आहे तोच अनित्याच्या मोहात अडकत नाही!
योगेंद्र:- ही जी सावधानता आहे, दक्षता आहे, ती भौतिकाच्या प्रभावासंबंधातलीच असावी..
हृदयेंद्र:- हो! भौतिकाचा प्रभाव जो अंत:करणावर पडू देत नाही तोच उदास असतो! मग तो श्रीमंतही का असेना!
योगेंद्र:- राजा जनकासारखा..
कर्मेद्र:- किंवा आपल्या ज्ञान्यासारखा.. (सारेच हसतात)
हृदयेंद्र:- आणि ज्याची दशा, ज्याची स्थिती अशी उदास असते त्याला अंतर्बाहय़ उपाधी चिकटत नाही..
कर्मेद्र:- उपाधी म्हणजे?
हृदयेंद्र:- म्हणजे एखादी ओळख.. त्या ओळखीचं ओझं.. म्हणजे मी म्हणजे श्रेष्ठ साधक, मी खरा भक्त तर अशा उपाधीची झूल बाहय़ जगातही नसावी, की माझ्या मनात सुप्त रूपानंही नसावी.. खऱ्या उदास दशेची हीच परीक्षा! यासाठी अंतरंगातील सूक्ष्मातिसूक्ष्म लोलुपतेला, कामनेला जिंकले पाहिजे.. निद्रेचा अतिरेकी त्याग नको, पण ती ताब्यात असली पाहिजे..
सिद्धी:- पण ‘सप्तशती’मध्ये ‘या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता’ असं म्हटलंय.. मग?
योगेंद्र:- (हसत) देवीरूप असलेली निद्रा ही योगनिद्रा!
हृदयेंद्र:- साधनेच्या ओढीबाबत जाग नसणं हीसुद्धा निद्रा आहे बरं! तर लोलुप्यता, काम आणि साधनेबाबतची निद्रा जिंकायची तर परिमित भोजन हवे!
कर्मेद्र:- खाण्यानं काय घोडं मारलंय?
हृदयेंद्र :- (हसत) हे भोजन, हा आहार म्हणजे दृश्याचा आहे! डोळे, कान, नाक या ज्ञानेंद्रियांद्वारे दृश्य भौतिकाचं सेवन सुरू आहे त्यावर मर्यादा हवी. आता ‘‘ स्त्रियांशी भाषण। ’’ इथे मी स्त्रणांशी भाषण असा अर्थ घेतो. स्त्रण म्हणजे वासनांध. पुन्हा लक्षात घ्या, वासनेत काही वाईट नाही. तिचं मिंधं होण्याइतकं वाईट काही नाही, तर लोकांतात सोडाच, एकांतातसुद्धा साधकात वासनालोलुपता नसावी! श्रीतुकाराम महाराज साधना जपून होण्यासाठी म्हणतात..
योगेंद्र:- (वहीत पहात) ‘‘संग सज्जनांचा उच्चार नामाचा। घोष कीर्तनाचा अहर्निशीं।। तुका म्हणे ऐशा साधनीं जो राहे। तोचि ज्ञान लाहि गुरुकृपा।।’’
हृदयेंद्र:- सज्जनांचा सततचा संग, ‘नामाचा उच्चार’ म्हणजे अंतरंगात साधनेची सतत जाण आणि कीर्तनाचा अहर्निश घोष या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत..
कर्मेद्र:- कीर्तनाचा घोष?
हृदयेंद्र :- कीर्तनात कीर्तीचं गायन, स्मरण अभिप्रेत आहे. माणसाचा अवघा जन्म स्वत:ची कीर्ति गाण्यातच सरत असतो. साधकानं मात्र भगवंताचं माहात्म्यच सांगावं. अशा साधनेत जो अखंड राहील त्याला ज्ञान लाभेल!
कर्मेद्र:- आता हे ज्ञान कोणतं?
हृदयेंद्र:- अद्वैताचं! ‘मी नव्हे, ‘तू’च हेच खरं अद्वैत’ अशी स्थिती होईल तेव्हाच ‘‘गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथीचा जिव्हाळा तेथें बिंबे.. ’’ ही स्थिती साध्य होत जाईल!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onदेवGod
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meditation and thoughts
First published on: 03-11-2015 at 01:02 IST