सुखी जीवनाची स्वप्ने आणि जगण्याचे वास्तव यांतील अंतर दिवसागणिक रुंदावत चाललेले आहे. अनेक समस्यांशी झुंजत असताना, नव्या समस्यांची त्यात भर पडत असल्याने सामान्य माणसाची संघर्षांचीच उमेद संपत चालली आहे. आपण ज्या समस्यांचा सामना करतो, त्या समस्या आपल्या भावी पिढीला भेडसावू नयेत, या रास्त अपेक्षेपोटी मुलांना सक्षम बनविणे आणि सक्षमतेचा मार्ग शिक्षणातूनच सापडतो म्हणून मुलांना चांगले शिक्षण देणे हेही प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. मात्र, मूल जन्माला येण्याआधीपासूनच या स्वप्नासमोरील अडथळे आ वासून उभे ठाकत पालकांना हैराण करत असतात. शाळाप्रवेशापासून सुरू होणारी ही अडथळ्यांची शर्यत मुलाचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पालकांचा पिच्छा सोडत नाही. शाळा आणि घर यांमधील अंतर, जीवनशैलीची गरज म्हणून नोकरीधंद्याच्या चक्रात अडकणारे आईवडील, शिक्षणाचा दर्जा अशा अनेक कारणांमुळे अलीकडे स्कूलबस हा शहरी पालकांचा अपरिहार्य पर्याय झाला आहे. एखाद्या दिवशी बस आली नाही, तर त्या दिवसाचे संपूर्ण कुटुंबाचे वेळापत्रक पुरते कोलमडून जाते. त्यामुळे स्कूलबस हा असंख्य कुटुंबांच्या सुरळीत दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनलेला असताना अचानक एखाद्या कारणाने स्कूलबसचा बंद पुकारला गेला, तर पालकांची परिस्थिती आणखीनच केविलवाणी होते. गेल्या वर्षी जानेवारीतच, नवी मुंबईत नेरुळ येथे स्कूलबसला अपघात झाला. त्या बसमध्ये लहानगी शाळकरी मुले अक्षरश: कोंबून भरली होती, असे निष्पन्न झाले. अशा घटनांमुळे धास्तावलेल्या पालकांच्या संतापाच्या उद्रेकातून स्कूलबससाठी नियमावली करण्याची पावले सरकारने उचलली, तेव्हापासून स्कूलबस मालकांच्या संघटना आणि सरकार यांच्यात लहानमोठय़ा मुद्दय़ांवरून वाद सुरू आहेत. या नियमावलीचे पालन खरे तर शाळकरी मुलांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असताना, केवळ व्यावहारिक विरोध करत मुले-पालकांना वेठीला धरणे अविचारीपणाचे लक्षण आहे. नाक दाबून तोंड उघडण्याचा व्यवहारवाद अनुसरत बंदच्या भयाची तलवार सतत पालकांच्या डोक्यावर टांगती ठेवून अगोदरच चिंतेच्या ओझ्याने वाकलेल्या पालकांची संघर्षांची शक्तीही क्षीण करून सोडणे हे माणुसकीलाही धरून नाही. आंदोलनाचा हक्क हे आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे हुकमी हत्यार असते. मात्र निरपराध्यावरच हत्यार उपसून व त्याला वेठीला धरून हक्क पदरात पाडून घेणे हा अविचार आहे. संघटित शक्तीच्या जोरावर, ऐन परीक्षांच्या काळात, जेव्हा एखाद्या सेवेची अत्यंत गरज असते, तेव्हाच अशी हत्यारे उपसून नाडय़ा आवळणे अयोग्यच आहे. भावी पिढय़ांच्या सुखासाठी वर्तमानातील समस्यांशी संघर्ष करणाऱ्या असंख्य पालकांची या लढय़ाची उमेद टिकून राहावी यासाठी तरी असे हक्काचे अविचारी लढे बाजूला ठेवले गेले पाहिजेत, कारण प्रश्न माणुसकीचा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2013 रोजी प्रकाशित
असहायांवरच हत्यार!
सुखी जीवनाची स्वप्ने आणि जगण्याचे वास्तव यांतील अंतर दिवसागणिक रुंदावत चाललेले आहे. अनेक समस्यांशी झुंजत असताना, नव्या समस्यांची त्यात भर पडत असल्याने सामान्य माणसाची संघर्षांचीच उमेद संपत चालली आहे.
First published on: 12-02-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on who are helpless