अतीव उद्वेगाने ज्ञानदेवांनी दडपून घेतलेले कोपीचे दार,‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ असा आर्त धोशा लावत त्यांना उघडण्यास मुक्ताईंनी भाग पाडले, हा प्रसंग साधासुधा नाही. अतिशय मोलाच्या आणि संवेदनशील अशा आध्यात्मिक-सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतराचे सूचन त्या घटनेमध्ये आहे. ‘योगी’ अवस्थेमध्ये स्थित एका परमज्ञानी परंतु आत्ममग्न विभूतीस ‘संत’कोटीमध्ये रूपांतरित होत लोकाभिमुख बनण्यास भाग पाडणारा असा तो एक कमालीचा दिव्य आणि ऐतिहासिक कालबिंदू होय. ‘योगी’ या स्थितीची अवघी व्याख्याच मुक्ताई एका झटक्यात अंतर्बाह्य बदलून टाकतात, ताटीचे दार उघडण्यास ज्ञानदेवांना भाग पाडून. एकांतासाठी गिरीगव्हारे जवळ करून योगसाधनेमध्ये निमग्न असणारा संन्यस्त म्हणजे ‘योगी’ हे ‘योगी’ या उपाधीचे पारंपरिक आकलन आमूलाग्र पालटून टाकत, ‘योगी’ या संकल्पनेची समाजसापेक्ष नवप्रतिमा सिद्ध करतात मुक्ताबाई त्या ठिकाणी. तैसेंच योगियांचे कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म । कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ही योग्याची नाथरायकृत लक्षणे सिद्ध व्हावयाची तर योग्याला जनसंमर्दामध्ये उतरवण्याखेरीज अन्य पर्यायच नसतो. ताटीचे दार उघडण्यास ज्ञानदेवांना भाग पाडत मुक्ताबाई साधतात ते नेमके हेच. वस्तुत:, ‘योगी’ आणि ‘संत’ या दोन्ही स्थिती समतुल्यच. फरक असेल तर तो प्रयोगशाळेमध्ये  निव्वळ सैद्धान्तिक संशोधनात गढलेला शास्त्रज्ञ आणि प्रयोगसिद्ध प्रारूपे व्यवहारात अंमलात आणून पाहण्यासाठी क्षेत्रीय पाहणीत गुंतलेला उपयोजित संशोधनप्रेमी, या दोहोंत असतो तेवढाच! ‘चित्तवृत्तीनिरोध’ हा योगाचा गाभा आपल्याला हस्तगत झालेला आहे, याची खात्री भली पटलेली असेल योग्याला एकांतामध्ये. परंतु, निजबोधाने अशा योग्याचे अंत:करण खरोखरच धवळलेले आहे याची प्रचीती यावयास नको का जगाला? परिपूर्ण समाधियोग साधणे हे तर अष्टांगयोगाचे सर्वोच्च वैभवच. परंतु, योगाचे ‘भाग्य’ मात्र निराळेच गणतात आमचे तुकोबाराय. योगाचें तें भाग्य क्षमा। आधीं दमा इंद्रियें हे महाराजांचे वचन कमालीचे मार्मिक शाबीत होते या संदर्भात. योगाच्या या भाग्याची प्रचीती संभवते लोकव्यवहारातच. एकांतामध्ये वास करणाऱ्या योग्याच्या वाटेला जातो तरी कोण आणि कशाला? त्यांमुळे, गिरीकंदरामध्ये क्षमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही योग्याने कोणाला. नाना वृत्तिप्रवृत्तींच्या संपर्कामध्ये राहू-वावरू  लागल्यानंतरच मनाविरुद्ध काही घडण्याचा आणि संबंधिताच्या आगळिकीला क्षमा करण्याचा प्रसंग संभवतो लोकधर्मी योग्याच्यासंदर्भात. राजयोगाची यम, नियमादी अष्टांगे हस्तगत  होणे ही झाली ‘योग’ या संकल्पनेची सैद्धान्तिक व्याख्या. तर, योग तप या चि नांवें । गळित व्हावें अभिमानें ही तुकोक्ती ठरते त्याच योगाची उपयोजित व्याख्या. मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ। तैसीं नाना कर्मे करितां सकळ । सदा अविकळ योगिया अशा शब्दांत जनसंमर्दात अहोरात्र वावरणाऱ्या योग्याचे असाधारणत्व स्पष्ट करतात नाथराय. तर, अंत:करणात बोधाने अचळ ठाण मांडलेले असल्याने लोकव्यवहारात राहूनही अंतरंग अलिप्त राखणाऱ्या योग्याची अंतिम अवस्था तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें। शिवपद जीवें भोगिजेल अशा शब्दांत विदित करतात तुकोबाराय. ‘योगी’पदाच्या सैद्धान्तिक आणि उपयोजित व्याख्येची एकात्म प्रचीतीच ही जणू. – अभय टिळक

agtilak@gmail.com