संतांच्या अवघ्या मांदियाळीनेच कृष्णद्वैपायन महर्षी व्यासांचे ऋण परोपरीने व्यक्त केलेले आहेत. ते आहे पुन्हा दुहेरी. प्रतिभाशाली महान कविवर हा त्यांचा त्रिखंडात गाजणारा लौकिक हे झाले पहिले अंग. आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीकी भार्गवी। जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे हे नाथरायांचे शब्द त्याच आदरगौरवाचे द्योतक होत. तर, द्वैतभावाला जिणून द्वंद्वातीत झालेले महान भगवद्भक्त या रूपातही महर्षी व्यास वंदनीय मानते संतपरंपरा. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी। नाचतातीं सोहंमेळी । द्वैतभावा विसरुनी बळीं । खेळतीं अंबे तुझें गोंधळी असा नाथराय महिमा गातात व्यासांच्या भक्तरूपाचा. भागवत धर्माची मूल्यपताका पेलणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विचारविश्वाचा महर्षी व्यासांशी जुळलेला अनुबंध बहुपदरी आहे. मुदलात, भागवत धर्मविचाराचा ऊहापोह व्यासांनीच प्रथम मांडलेला आहे तो महाभारताच्या ‘शांतिपर्वा’मध्ये. भागवत धर्मातील ज्ञानाधिष्ठित कर्मप्रधान भक्तितत्त्वाचा गाभा व्यासांनीच महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’मध्ये संकलित केलेल्या श्रीमद्भगवद्गीतेत आहे. श्रीमद्भगवद्गीतेद्वारे उमलणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या तत्त्वदर्शनाला व्यासच जोड पुरवितात ती श्रीमद्भागवताच्या अंतरंगात विकासलेल्या योगेश्वर श्रीकृष्णांच्या लीलादर्शनाची. श्रीमद्भागवतामध्ये व्यास विवरण करतात माहात्म्य भक्तीचे. तर, त्याच भक्तीविचाराला कर्मशीलतेचे आणि प्रगाढ नीतिमत्तेचे अस्तर जोडतात महाभारतातील तत्त्वचिंतनाद्वारे. महाभारतीय युद्धातील संहारापायी उद्विग्न आणि शोकखंतमग्न झालेल्या युधिष्ठिराला सावरण्यासाठी व्यासांनी महाभारताच्या ‘शांतिपर्वा’मध्ये केलेला राजधर्माचा उपदेश कमालीचा मार्मिक आणि उद्बोधक ठरतो या संदर्भात. समाजव्यवस्थेमध्ये किमान नीतिमत्तेचे जतन-संवर्धन घडत राहावे यासाठी राजाने  नैतिकतेचा आग्रह धरत नीतिमान जीवनरहाटीची पाठराखण करणे गरजेचे असते, यांकडे व्यासांचा निर्देश दिसतो. हे घडायचे तर, प्रथम राजाचेच वर्तन नीतिपूत असले पाहिजे, हा व्यासांनी ‘शांतिपर्वा’मध्ये धर्मराजाला केलेल्या उपदेशाचा मेरुदंड ठरतो. राष्ट्राचे संरक्षण बुद्धीपूर्वक, न्यायाने आणि नीतीने करत राहणे, हे राजाचे अगत्यकर्म ही बाब व्यास कटाक्षाने बिंबवतात युधिष्ठिराच्या मन:पटलावर. व्यक्तिगत जीवनातील अनैतिकतेचा उद्भव उगमा नजीकच शासित करण्यासंदर्भात नीतिमत्तेचा दंड सक्षमपणे धारण करणाऱ्या राजाने आणि पर्यायाने राजसंस्थेने सदैव सज्जअसावयास हवे, ही तुकोबांनी मुखर केलेली धारणा अधोरेखित करते व्यासांशी असलेले त्यांचे मूल्यात्मक नातेच. अन्यायासी राजा जरि न करी दंड। बहु च ते लंड पीडिती जना या तुकोक्तीमध्ये स्पष्ट पडसाद ऐकू येतात ते व्यासांच्या मनोविश्वाचेच. या संदर्भात, तुकोबांच्या प्रतिपादनानुसार, राजसंस्थेची भूमिका असावयास लागते दक्ष शेतकऱ्याची. पिकामध्ये माजलेले तण वेळेवर खुरपणी करून निगुतीने काढले नाही तर ते उभ्या पिकाचाच जसा घास घेते अगदी त्याच धर्तीवर, अन्याय-अनीतीची नांगी मुळातूनच ठेचली नाही तर बदमाष आणि पुंड-लंड प्रवृत्तीचे समाजकंटक लोकव्यवहाराचा पोतच पुरता नासवून टाकतात. न करी निगा कुणबी न काढिता तण । कैचें येती कण हातासी ते हा तुकोबांनी त्या काळी उपस्थित केलेला प्रश्न म्हणूनच ठरतो चिरप्रस्तुत. – अभय टिळक

agtilak@gmail.com