– अभय टिळक

गती आणि दृष्टी यांच्या समन्वयातूनच अंकुरत असते प्रगती. गतीविना दृष्टी पांगळी ठरते, तर दृष्टीहीन गतीला धोका संभवतो भरकटण्याचा. व्यक्तिजीवनाइतकाच हा न्याय लागू पडतो समाजजीवनालाही. समाजाची वाटचाल रास्त आणि इष्ट मार्गाने होत राहावी यासाठी- ‘‘मार्गी अंधासरिसा। पुढें देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा। आचरोनि।।’’ असे मार्गदर्शक तत्त्व समाजहितैषी साधुवृत्तीच्या विभूतींसाठी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात ज्ञानदेव विदित करून ठेवतात ते यासाठीच. भागवत धर्मविचाराला इथे अपेक्षित आहे ती लोकशिक्षणाची एक गतिमान व्यवस्था. ‘ऋजुमार्गाने गमन’ हा ‘संस्था’ या संज्ञेला लाभलेल्या अर्थाच्या अनेक पदरांपैकी एक अर्थ यासंदर्भात विलक्षण कळीचा शाबीत होतो. ‘गमन’ या पदात अनुस्यूत आहे गतिमानता, भ्रमणशीलता. ज्ञानव्यवहार आणि त्याचा वाहक असणारा आचार्य हे प्रवाही राहिले पाहिजेत, हे आहे यातील केंद्रवर्ती सूत्र. कोणतीही संस्था ही मूळात असते एक व्यवस्थाच. परंतु ‘संस्थे’चे रूपांतर एकदा का ‘संस्थाना’मध्ये झाले की सारेच सूत्र बदलते. बदलते व बिघडतेही! संस्थानात व्यवस्थेपेक्षाही मग बडिवार माजतो स्थानाचा. व्यवस्था व तिच्यामागील विचार हळूहळू मागे पडतो अन् वाढू लागते स्थानमाहात्म्य. तिथे मग फोफावते विधिनिषेधांचे जंजाळ आणि त्यांतून निर्माण होते एकप्रकारचे कोंदट साचलेपण. लोकव्यवहार शुद्ध बनवण्यासाठी समाजशिक्षणाचे कंकण बांधलेल्या लोकशिक्षक संतविभूतीने म्हणूनच सतत भ्रमणशील असले पाहिजे याबाबत भागवत धर्मविचाराने राखलेल्या कटाक्षाचे वैशिष्ट्य आता सहज उमजावे. ‘‘जे पुरुषार्थसिद्धि चौथी। घेऊ नि आपुलां हातीं। रिगाला भक्तिपंथी। जगा देतु।।’’ अशा विलक्षण प्रगल्भ शैलीत भागवत धर्माचा नेमका तोच कटाक्ष ज्ञानदेव अधोरेखित करतात बाराव्या अध्यायात. परंपरेने मोक्षाला चौथा पुरुषार्थ मानलेले आहे. लोकशिक्षक हा अंतर्बाह््य मुक्तच असावा, हे ज्ञानदेव ओवीच्या सुरुवातीलाच स्पष्ट करतात. ज्या ज्ञानसाधनेद्वारे तो सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त झालेला आहे, त्या ज्ञानाचे संस्कार समाजपुरुषाला मुक्तहस्ताने प्रदान करण्यासाठी भक्तिमार्गाची कास धरलेला ज्ञानव्रती लोकशिक्षक अखंड भ्रमण करत असतो, हा ज्ञानदेवांच्या कथनाचा इत्यर्थ.  पाठशाळा, शिक्षणसंकुले, मठ यांसारख्या स्थितीज व्यवस्था निर्माण करून त्यांची उस्तवार करण्यासारख्या उपाधींमध्ये तो अडकून पडत नसतो. ‘‘आणि वायुसि येके ठांइं। विढार जैसें नाहिं। तैसा न धरी चि केहीं। आश्रयो जो।।’’ अशी त्याच्या मुक्तपणाची परिसीमा ज्ञानदेव विशद करतात. लोकशिक्षणाचा अवघा व्यवहारच वाऱ्याप्रमाणे मुक्त संचारी असावा, ही ज्ञानदेवांची साधी अपेक्षा आहे. या अपेक्षेमागे असणारा निखळ भाव अचूक जाणला एकट्या तुकोबांनी. स्वत:च्या अंत:वृत्ती तुकोबांनी निर्मळपणे शब्दबद्ध केल्या आहेत एका अभंगात : ‘‘नव्हें मठपति। नाहीं चाहुरांची वृत्ति।’’ हा त्या अभंगातील एक चरण या संदर्भात कमालीचा मार्मिक होय. एक चाहूर म्हणजे १२० बिघे इतकी जमीन. समाजाला शिकविण्यासाठीच मी इहलोकामध्ये वर्तत असलो तरी त्यासाठी मठ वगैरे स्थापन करण्याचा पर्याय मी पत्करला नाही, हे तुकोबा इथे सांगतात. कारण एकदा का मठ स्थापन केला की त्याच्या निर्वाहासाठी जमीनजुमला बाळगणे अनिवार्य ठरते. त्यासाठी निकड भासते राजाश्रयाची. हे सगळे ओघानेच येत असल्याने ते काहीच लचांड नको, हा तुकोबांचा निर्धार आज अप्रस्तुत ठरतो का?

agtilak@gmail.com