संविधान हे केवळ सत्तेचे कायदे ग्रथित केलेले पुस्तक नव्हे. त्यातून राष्ट्रीय क्रांतीप्रमाणेच सामाजिक क्रांतीही अपेक्षित आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासन हे त्यागी असते. त्यात सर्व प्रकारचे पावित्र्य एकवटलेले असते. ते सर्वज्ञानी असते. एवढेच नव्हे, तर त्यात सर्व विश्वे एकवटलेली असतात असे ‘महाभारता’ने ज्याबद्दल म्हटले आहे ती व्यवस्था म्हणजे शासन. आजच्या एकविसाव्या शतकात हे काही आपण जसेच्या तसे स्वीकारू शकत नाही. कारण ही व्याख्या शासनाला दैवत्वाकडेच नेताना दिसते. नृप हा शासक म्हणजे परमेश्वराचा अवतार असा राजकीय विचार प्रबळ असलेल्या काळात कदाचित ते सोयीचेही ठरले असेल, परंतु आज शासन व्यवस्थेला हे दैवी रूप आपणांस ठरवूनही देता येणार नाही. याचे कारण या व्यवस्थेवरील अनेक बंधने आणि नियंत्रणे. ही व्यवस्था कोणतीही, म्हणजे अगदी हुकूमशाही असली, तरी तिच्यावर काही बंधने असतातच. हुकूमशहालाही अंतिमत: लोकांचे मान्यता या अर्थाने ‘सँक्शन’ असावे लागते. हुकूमशहा हा कितीही मनमानी करणारा असला, तरी आपण कसे लोकहितवादी आहोत हे तो सातत्याने दाखवीत असतो, ते केवळ प्रसिद्धीची हौस म्हणून नव्हे. लोकशाहीची तर गोष्टच वेगळी. तेथे शासन हे भलेही त्यागी, पवित्र, सर्व ज्ञान ज्यात साठवलेले आहे असे मानले गेले, तरी हे शासन चालविणाऱ्या व्यक्तींबाबत तसे कदापि म्हणता येणार नसते. केवळ बहुमताच्या जोरावर ते शासक झालेले असले तरी तेथे सार्वभौम असते ती जनताच. जनतेचे हे सार्वभौमत्व, तिने शासनव्यवस्थेवर घातलेली बंधने आणि नियंत्रणे येतात ती संविधानातून. ही कायद्याच्या राज्याची लोकांनीच लोकांना दिलेली सनद. ती आपण स्वीकारली त्या दिवसाची स्मृती म्हणून आपण दर वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करतो. तसा तोही एका उपचाराचाच भाग. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे, जयंत्या-मयंत्यांचे सोहळे करण्यापासून कशा ना कशाचे सप्ताह साजरे करण्यापर्यंतचे अनेक उद्योग आपण करीत असतो. हे एकूणच आपल्या उत्सवप्रियतेला साजेसेच. परंतु संविधान दिन ही केवळ उत्सवी जल्लोषाची बाब असता कामा नये. ती तशी होत असेल, तर ते बदलले पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. संविधानाविषयीचा आदर, त्यावरील विश्वास ही केवळ एका दिवशी मिरविण्याची गोष्ट नसून, ती नागरिकाच्या दैनंदिन जगण्याचा भाग असला पाहिजे. आज जागतिकीकरणोत्तर काळात नव-आर्थिक-वसाहतवादासारख्या शक्तींचा दबाव देशोदेशीच्या शासनव्यवस्थांवर येत आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे जग जवळ आल्याचे भ्रम निर्माण होत असतानाच ते अधिकाधिक विलगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. व्यक्ती आणि टोळ्या असा एक नवाच संघर्ष उभा राहत आहे. अशा स्थितीत सामान्य नागरिकाला आधार उरणार आहे तो संविधानाधिष्ठित शासनव्यवस्थेचाच. तेव्हा जपले पाहिजे ते आपणच आपल्याला प्रदान केलेले संविधान.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on constitution of india
First published on: 25-11-2017 at 02:39 IST