सत्ताधाऱ्यांकडून देशद्रोही वा आक्रस्ताळा ठरवला गेलेल्या कोणाही बुद्धिजीवीची जी गत होते, तीच शाहिदुल आलम यांचीही होणार, असे दिसते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहिदुल आलम हा एक बांगलादेशी मुसलमान.. तेव्हा त्याच्या देशाकडून त्याच्यावर अन्याय समजा झालाच असेल, तर भारताने किंवा जगाने काय एवढे वाटून घ्यावे? कशाला करावी ओरड? शाहिदुल आलमला कोणत्याही कायदेशीर वॉरंटविना त्याच्या राहत्या घरातून ‘उचलले’, कोठडीत डांबले आणि मग त्याच्यावर देशविरोधी कारवाया वगैरेचे आरोप ठेवले, तर काय हरकत आहे .. असेच बांगलादेशच्या विद्यमान सरकारला वाटले असेल, तर त्या सरकारचा या अटकेमागचा साधासरळ हिशेब किती चुकला, हे जगभर होणाऱ्या चर्चेतून आता दिसू लागले आहे. गार्डियन या लंडनच्या वृत्तपत्राने त्याच्या अटकेची बातमी केली. मग न्यूयॉर्क टाइम्स, ‘टाइम’ साप्ताहिक आदींनीही शाहिदुल आलमवर कसा अन्याय झाला आहे आणि बांगलादेश सरकारच्या दमनशाहीचेच हे उदाहरण ठरते, असा सूर लावला. भारतातले समाजवादी विचारांचे बुद्धिजीवी आणि कलावंतही शाहिदुल आलमच्या बाजूने बोलू लागले.

याचे कारण शाहिदुल आलम हा कुणी ऐरागैरा किंवा य:कश्चित इसम नव्हे. जागतिक कीर्तीचा तो छायाचित्रकार. वय ६३, पैकी साधारण १२ वर्षांचा- लिव्हरपूल विद्यापीठात जैवतंत्रज्ञान आणि जनुकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण आणि लंडन येथून सेंद्रिय रसायनशास्त्रात पीएच.डी. करण्याचा- काळ वगळता उर्वरित ५१ वर्षे त्याने बांगलादेशातच घालविली. छायाचित्रणाचा छंद लंडनमध्ये असताना लागला, पण मायदेशी परतल्यावर, १९८४ ते १९९० या काळात जनरल ईर्शाद यांची छुपी हुकूमशाही संपवण्यासाठी जे तरुण रस्त्यांवर उतरले, त्या आंदोलकांची छायाचित्रे शाहिदुलने टिपली. ईर्शाद सरकार पडले. आंदोलकांचा नैतिक विजय झाला. तेव्हा या लढय़ातील क्षण टिपणाऱ्या छायाचित्रांचे जे प्रदर्शन शाहिदुलने ढाक्याच्या सर्वात मोठय़ा झैनुल (अबिदीन) कलादालनात भरवले, त्यास अवघ्या तीन दिवसांत सुमारे चार लाख प्रेक्षकांनी भेट दिली होती. पुढल्या दशकभरात ‘वर्ल्ड प्रेस फोटो’ या अतिप्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत शाहिदुल विजेता ठरलाच, पण त्या स्पर्धेचे परीक्षकपदही त्याने अनेकदा सांभाळले. केवळ कलावंताच्या मस्तीत न जगता त्याने संस्थात्मक कार्यही उभारले. सन १९८९ मध्ये त्याने स्थापलेली ‘दृक’ ही छायाचित्र-संचयिका आज दक्षिण आशियातील अनेक छायाचित्रकारांची उत्तमोत्तम छायाचित्रे जगास पुरविते आहे. त्याच वर्षी -म्हणजे सुमारे २९ वर्षांपूर्वी त्याने ‘पाठशाला’ ही छायाचित्रकार घडविणारी शैक्षणिक संस्था सुरू केली, तिचे अनेक शिष्य आज छायाचित्रकार म्हणून नाव कमावत आहेत. सन २००० पासून शाहिदुलने ढाक्यात सुरू केलेला ‘छबी मेला’ हा वार्षिक छायाचित्र-मेळ्याचा उपक्रम तर, जगभरातील छायाचित्रकारांना एकत्र आणतो आहे. रघू राय, सॅबेस्तिओ साल्गादो यांसारख्या दिग्गजांनी शाहिदुलच्या या उपक्रमशीलतेचेच नव्हे, तर त्याच्या कलादृष्टीचेही कौतुक केले आहे. अमुकच धर्माची अस्मिता न स्वीकारता, मानवतावादाचे दर्शन त्याने त्याच्या कामातून- त्याच्या फोटोंमधून – घडवले आहे. तेही एकदा नव्हे- अनेकदा. शाहिदुल केवळ एक बांगलादेशी नागरिक नव्हे.. विश्वनागरिकत्वाचे भान असलेला एक बुद्धिवंत आहे. हेच तर त्याला नडले. जसे ते आजवर अनेकांना, त्यांच्या-त्यांच्या देशांमध्ये नडले होते. नडण्यासाठी त्या अनेकांनी जे केले होते, तेच शाहिदुलने केले : स्वदेशातील विद्यमान सरकारच्या दमनशाहीबद्दल तो खरे ते बोलला.

म्हणजे काय झाले, हे सांगण्यासाठी जरा बांगलादेशात गेल्या काही दिवसांत काय चालू होते, हेही पाहावे लागेल. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आपापल्या गणवेशांत दररोज रस्त्यांवर उतरत होते २९ जुलैपासून. निदर्शने करीत होते. वाहतूक रोखत होते. निमित्त झाले बसगाडीने दोघा विद्यार्थ्यांना चिरडल्याचे; पण दोनच का? अशा कैक विद्यार्थ्यांनी आजवर प्राण गमावले आहेत. अवघ्या साडेसोळा कोटी लोकसंख्येच्या या देशात दररोज २० बळी वाहनांखाली जातात. हे मरणसत्र थांबवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आले. तेव्हाच, दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या बसगाडीच्या मालकाचे नातलग आणि बांगलादेशचे जलवाहतूकमंत्री शाहजहान खान यांनी मुक्ताफळे उधळली- ‘ भारतासारख्या मोठय़ा देशांतही गाडीखाली माणसे मरतात. पण तेव्हा कुणी आंदोलन नाही करत’! निदर्शने आणखी तीव्र होण्यास एवढे कारण पुरले. आंदोलन हिंसक नसेल तर त्याचा प्रभावच पडत नाही, हाच संस्कार झालेल्या या किशोरवयीन मुलांनी काही बसगाडय़ा पेटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहनांचा चालकवर्ग या किशोर-किशोरींच्या अंगावर लाठय़ाकाठय़ाच नव्हे तर सुरेचाकू घेऊन धावून गेला. चालकांचे असे सशस्त्र आक्रमण सुरू झाल्यावर मुले ते चुकवण्यासाठी पळू लागली आहेत, हे दृश्य ढाक्यात दोन-तीन दिवसांत जेव्हाजेव्हा दिसले, तेव्हा पोलीस जणू आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात, त्याच चौकांत पानतंबाखू खात, थुंकत होते.

‘‘हे जे चालले आहे ते भयावह आहे.. सरकारचा आशीर्वाद असलेले खासगी गुंड सरळ हल्ला करतात, कायदा हातात घेतात, पोलीस काहीच करत नाहीत’’ असा त्रागा शाहिदुल आलम यांनी आधी स्वत:च्या फेसबुक खात्यावर व्यक्त केला. मग ‘अल जझीरा’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ढाक्याचे वृत्त दाखवतानाच, शाहिदुल आलम यांना त्यांचे मत विचारले, ‘हा संताप तात्कालिक आहे की मोठे कारण आहे त्यामागे?’ या प्रश्नावर शाहिदुल बोलू लागले- ‘‘हो.. मोठं कारण आहे.. खूप मोठं आहे कारण..  बँकांमधला पैसा लुटला जातो आहे सरकारी आशीर्वादाने. माध्यमांची मुस्कटदाबी सुरू आहेच. कायदेबाह्य़ हत्यासुद्धा भरपूर होताहेत देशभर. काही वेळा काही जण गायब होतात – किंवा गायब केले जातात, त्यांची हाक ना बोंब. नीट जगायचं तर, खंडणी मोजावी लागते जिथेतिथे. लाचखोरीला पारावार उरलेला नाही. शिक्षणाचं क्षेत्रसुद्धा भ्रष्टाचारानं बरबटलंय..’’

देशाची बदनामी आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधक वक्तव्य करण्याविरोधातील कायद्याचे कलम जसे दंडशक्ती बाळगणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेत असतेच असते, तसेच बांगलादेशातही आहे. बांगलादेशातील ‘माहिती- संज्ञापन तंत्रज्ञान कायदा- २००६’ हा अमेरिकी ‘पॅट्रियट अ‍ॅक्ट -२००१’ पेक्षा अधिक ताकदवान आहे आणि २०१३ पासून त्याला ‘डिजिटल सिक्युरिटी अ‍ॅक्ट’द्वारे आणखी सशक्त केले जात आहे. या अशा कायद्याची शक्ती लाभलेले कोणतेही सरकार, आपली बदनामी म्हणजेच राष्ट्रद्रोह, असे समजून कारवाई करू शकते. शाहिदुल आलम यांच्यावर झालेली कारवाई यास अपवाद नाही.     ४ ऑगस्टपासून सुमारे आठवडाभर कोठडीत राहून त्यांची प्रकृती बिघडली असली, पोलिसी छळामुळेच प्रकृती बिघडल्याचे त्याच्या पत्नीने ढाका उच्च न्यायालयाकडे केलेल्या याचिकेत म्हटले असले, तरीही जामीन नाकारताना ‘प्रकृतीची नव्याने तपासणी करा’ एवढा आदेश उच्च न्यायालय देते आहे. शाहिदुलची सुविद्य पत्नी रहनुमा अहमद ही आता १३ ऑगस्टला पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे दाद मागेल. एकंदर, बाकीच्यांवर जरब बसवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून देशद्रोही किंवा आक्रस्ताळा ठरवला गेलेल्या कोणत्याही बुद्धिजीवीची जी गत होते, तीच शाहिदुल आलम यांचीही होणार, असे दिसते.

छायाचित्राला काहीजण ‘प्रकाशचित्र’ म्हणतात. सकारात्मक शब्द आहे तो. सावल्या दाखवण्याऐवजी आम्ही प्रकाशाने चित्र काढतो, अशा अर्थाचा. समाजाची सद्य:स्थिती दाखवणारे शाहिदुल यांच्यासारखे लोक मात्र ‘छाया’चित्रण करीत असतात. सरकारच्या वा एकंदर प्रस्थापितांच्या मते जे नकारात्मक ठरेल, असे चित्रण करीत असतात. त्या चित्रणाबद्दल त्यांना अद्दल घडवण्याचे काम प्रस्थापित करतातच. सकारात्मक की नकारात्मक हा शब्दच्छल न करता ज्यांना वास्तव पाहायचे आहे, ते आज शाहिदुल आलमच्या बाजूने उभे राहात आहेत.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladesh government scared of photographer shahidul alam
First published on: 11-08-2018 at 01:59 IST