कानकोंडेपणाची कानगोष्ट

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गर्भनिरोधकाच्या जाहिरातींवरील वेळबंदीने मुलांवरील ‘कुसंस्कार’ थांबतील की फक्त मोठय़ांचा कानकोंडेपणा कमी होईल?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रिपदी सुश्री स्मृती इराणी आल्यानंतर तेथे वाद निर्माण होणार असे भाकीत कोणी वर्तविण्याचीही आवश्यकता नव्हती. ते आता त्या मंत्रालयाचे भागधेयच होते. इराणी यांच्या अकादमिक अर्हतेबद्दल अनेकांच्या मनात शंका असल्या तरी त्यांच्याबाबत एक गोष्ट नक्कीच निशंकपणे सांगता येते, की त्यांना दूरचित्रवाणी या क्षेत्राबद्दलची अनुभवजन्य माहिती आहे. त्यांनी अनेक वर्षे हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केलेला असून, त्यातील काही अत्यंत लोकप्रियही होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीसंचिताचा उपयोग या खात्याचा कारभार पाहताना त्यांना होईल असे त्यांच्या समर्थकांना वाटत असल्यास नवल नव्हे. परंतु तसे काही घडल्याचे दिसत नसून, माहिती-प्रसारण खाते हेही त्यांच्या दृष्टीने वस्त्रोद्योग, शिक्षण वा तत्सम खात्यांप्रमाणेच असल्याचे दिसते. तेथे आपल्या अंगभूत पांडित्याच्या योगे त्या रीतसर वाद निर्माण करणार हे ठरलेलेच होते. त्यातील ताजा वाद म्हणजे पुरुषांच्या गर्भनिरोधकाच्या – कंडोमच्या – जाहिरातींवर लादलेल्या वेळमर्यादेचा. या जाहिराती दिवसाउजेडीच काय, पण रात्री दहा वाजता घराघरांत सामसूम होईपर्यंत दाखविण्यास बंदी घालण्याचे निर्देश इराणी यांच्या माहिती-प्रसारण खात्याने दिले आहेत. या जाहिराती खासकरून लहान मुलांच्या दृष्टीने असभ्य आहेत. त्यांच्यात ‘अनारोग्यकारक वर्तना’प्रति आकर्षण निर्माण करणाऱ्या आहेत. सबब त्या त्यांच्या दृष्टीस पडू नयेत, अशी इराणी यांची यामागची भावना आहे. आता प्रश्न लहान मुलांचा आल्यानंतर खरे तर सगळाच वाद जेथल्या तेथे जिरायला हवा होता. मुले म्हणजे देवाघरची फुले हे तर झालेच. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती देशाचे भवितव्य असतात. त्यांच्यावर वाईट संस्कार होणार असतील, तर त्या गोष्टी ठेचून नाहीशा केल्या पाहिजेत, असे म्हणणे सोपे आहे. शिवाय त्यास आक्षेप घेतल्यास त्या व्यक्तीस संस्कृतीपासून राष्ट्रापर्यंतच्या यच्चयावत् गोष्टींचा विरोधक म्हणूनही बाद करता येणे शक्य आहे. किंबहुना तसे करण्यास सुरुवातही झालेली आहे आणि म्हणूनच हा वाद नेमका काय आहे, गर्भनिरोधकाच्या त्या जाहिरातींना ठरावीक काळात बंदी घालण्यामागील भूमिका काय आहे ते आपण समजून घेणे आवश्यक आहे.

या बंदीहुकमाचा प्रारंभ होतो तो ‘अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया’ (आस्की) या संस्थेपासून. देशातील जाहिरातींच्या दर्जाचे नियमन करणारी ही मंडळी. एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातींमधून त्याबद्दलची चुकीची माहिती वा गैरवाजवी दावे तर केले जात नाहीत ना, यावर हे मंडळ लक्ष ठेवते. अशा एखाद्या जाहिरातीबद्दल प्रेक्षक वा ग्राहक या संस्थेकडे तक्रार करू शकतो. गर्भनिरोधकाच्या काही जाहिरातींबाबत अनेक प्रेक्षकांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचे या संस्थेचे म्हणणे असून, त्याबाबत काय करावे अशी विचारणा संस्थेतर्फे माहिती-प्रसारण मंत्रालयाकडे केली आणि त्यावरून मंत्रालयाने सर्व वाहिन्यांना त्याबाबत तंबी दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्रालयाने त्या जाहिरातींवर बंदी घातली नसून, त्यांच्या प्रक्षेपणाची वेळ मर्यादित केली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत आता त्या जाहिराती दाखविता येणार नाहीत. यातून काय होणार? तर लहान मुलांच्या नजरेस त्या पडणार नाहीत व त्यांच्या मनावर विकृत परिणाम होणार नाहीत. हे सारेच अत्यंत हास्यास्पद आहे. त्याहीपेक्षा हे सारे आपल्या पारंपरिक ढोंगीपणातून आलेले आहे. येथे भीती लहान मुलांच्या मनावर कोणते परिणाम होतात याची नसून, ती मुले आसपास वावरत असताना त्या जाहिराती पाहताना आपणा मोठय़ांना जो कानकोंडेपणा येतो त्याची आहे. हे तथ्य मान्य करण्यास अर्थातच आपली मानसिक तयारी नसते. याचे कारण त्या तथ्याचा संबंध थेट आपल्या मनातील पारंपरिक ढोंगीपणाशी आहे, लैंगिकतेशी जोडलेल्या पापभावनेशी आहे. मुळात काम हा पुरुषार्थ मानणारी, शृंगार हा एक महत्त्वाचा रस मानणारी आपली परंपरा. कामभावनेमागे केवळ प्रजोत्पादनाचीच आणि आपले पिढीसातत्य टिकविण्याचीच प्रेरणा नसून, त्यातून दैवी आनंद मिळू शकतो हे मानणारी आपली परंपरा. मंदिरांपासून धर्मग्रंथांपर्यंत ठिकठिकाणी तिचा गौरव करण्यात आलेला आहे. मधुराभक्ती हे त्याचेच एक उन्नत उदाहरण. परंतु मधल्या अंधारयुगात कधी तरी कामाला गौणत्व आले, स्त्री ही मोक्षमार्गातील धोंड मानली जाऊ लागली, पावित्र्याच्या भोंगळ कल्पनांचा गल्बला वाढला, जे जे सुखकारक ते ते त्याज्य असा भाव मूळ धरू लागला आणि एक अत्यंत विसंगतीसंपृक्त असे विचारविश्व आपण ओढून घेतले. तेथे संन्यासाला, संसारत्यागाला, कामभावना कापरासारखी जाळून टाकण्याला महत्त्व प्राप्त झाले आणि मग त्यातून निर्माण झालेले ढोंग या थराला गेले, की संन्यास सोडून संसाराला लागलेल्या एखाद्या सज्जनाने आपली लहान लहान मुले मागे ठेवून नदीत आत्महत्या करणे हे धर्मकार्य मानले जाऊ लागले. अशा विचारप्रवाहात गटांगळ्या खाणारे आपण मूलत कानकोंडे असणे यात नवल काहीही नाही. या सामाजिक कानकोंडेपणाच्या प्रवाहाला कोठे तरी वाट हवीच होती. ती एकीकडे आपण ग्राम्य-गालीसारख्या भाषिक कृतींतून तरी दिली किंवा जे स्वतला अधिक सुसंस्कृत मानतात त्यांनी लैंगिक भावना नाकारण्यातून दिली. यावर प्रश्न असा येतो, की मग जे चार भिंतींआड करायचे ते आता तुम्ही उघडय़ावर आणणार का?

उघडय़ावर मुळीच आणू नये. आधुनिक संस्कृती मानणारे सुसंस्कृतजन तसे म्हणणार नाहीत. कारण या संस्कृतीत खासगीपणा आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही दोन्ही हातात हात घालून चालणारी मूल्ये आहेत असे मानले जाते. ती कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशिपच्या विरोधातच जातात. आणि येथे तर सेन्सॉरशिप लादण्यात आली आहे ती सामाजिक महत्त्वाच्या उपयोजित वस्तूच्या जाहिरातीवर. ज्या देशात एका वर्षांत सुमारे दोन कोटी ४० लाख महिला अपेक्षा नसताना गर्भवती होतात आणि जेथे गर्भपाताचे प्रमाण एका वर्षांत एक कोटी ५६ लाख एवढे आहे, त्या देशात कंडोम या गर्भनिरोधक साधनाची उपयुक्तता किती आहे ते लक्षात यावे. असे असताना ते साधन म्हणजे मुलांमध्ये विकृत कुतूहल जागृत करणारे आहे, त्याबाबत बोलणे हेही लज्जास्पद आहे अशी भावना कोणाच्या मनात असेल, तर ती आजच्या काळाचे माप लावायचे, तर देशद्रोहीच म्हणावी लागेल. राहता राहिला मुद्दा मुलांच्या संवेदनशील मनांचा. तर त्याबाबत आपण खरोखरच संवेदनशील असावयास हवे, हे मान्यच. आणि म्हणूनच त्या मुलांच्या मनावर हिंसा, भ्रष्टाचार, लिंग असमानता, कायद्यास न जुमानण्याची बेफिकिरी अशा भावनांचे संस्कार होऊ नयेत ही आपली प्राथमिकता असावयास हवी. ती जाणीव काही आपल्या सुसंस्कृत मनांना शिवल्याचे दिसत नाही.

वस्तुत आपणांस खरोखरच कशाबाबत कानकोंडेपण यायला हवे, तर ते दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सास-बहूछाप मालिकांतून दिल्या जाणाऱ्या पुरुषप्रधान संदेशांतून. अश्लीलपटांची नायिका करीत असलेल्या जाहिराती आपल्याला कानकोंडे करीत असतील, तर मग आपल्याला काळजी घ्यावी लागेल ती छुपी लैंगिकता प्रसारित करणाऱ्या अनेक जाहिरातींबाबतही. कारण ते अधिक घातक असते. आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठीही. पण त्याचा ना आपल्याला पत्ता असतो, ना इराणी यांच्या मंत्रालयाला. याचा अर्थ त्या जाहिरातींवर वा मालिकांवर बंदी घालावी असा नाही, तर त्यांबाबत आपण सजग व्हावे. बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेतून आपल्या मना-माणसांवर अनेकानेक प्रकारची आक्रमणे होतच राहणार आहेत. त्या अर्थव्यवस्थेला हव्या त्या भावना आणि विचार आपल्यात मुरवले जाणारच आहेत. ते कधी बाजारातील उत्पादनांसंबंधीचे असतील, कधी निवडणुकीतील नेत्यांबाबतचे. त्याची नीट जाणीव नसेल, तर आपण असेच सतत कानकोंडे राहणार. ते बाजार व्यवस्थेच्या सोयीचेच असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Condom ads banned from 6 am to 10 pm in india