दानाच्या संकल्पनेला लागलेली धंदेवाईक मानसिकतेची कीड कधीच नष्ट करता येणार नाही.. हेच अवयवदानाबाबतही होत आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवैधपणे किडनी प्रत्यारोपणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही कारवाई होऊ  नये यासाठी वैद्यकीय व्यवसायातील काही दिग्गजांनी ज्या तऱ्हेने आपली प्रतिष्ठा रॅकेटबहाद्दरांच्या पाठीशी उभी करून दबावाची सारी हत्यारे उपसली, ते पाहता, वैद्यकीय व्यवसायाच्या सेवाभावाच्या प्रतिज्ञेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..

अवयवदानाची वाढती गरज आणि अवयवदात्यांची तुटपुंजी संख्या यांतील प्रचंड तफावत ही देशापुढील आजची समस्या नाही. अवयव निकामी झाल्यामुळे वा योग्य वेळी प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्यामुळे भारतात दर वर्षी चार लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. ही निराशादायी स्थिती संपुष्टात आणण्यासाठी देशात  अवयवदानाची चळवळ आता मूळ धरू लागली असली, तरी या दानाचे महत्त्व लोकांना पटण्याआधीच अवयवदानाच्या बुरख्याआड लपलेल्या काळ्या धंद्यांचे मुखवटे  फाटून दानामागचे धंदे उजेडात येत आहेत. असे होते, तेव्हा चळवळीला खीळ बसतेच, पण दान या सर्वश्रेष्ठ संकल्पनेभोवतीही संशयाचे धुके दाटू लागते. गेल्या पंधरवडय़ापासून मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी चोरी प्रकरणाचा गाजावाजा सुरू झाल्याने अवयवदानाच्या चळवळीआडून सुरू झालेल्या एका भयाण धंद्याचे वास्तव उजेडात येऊ  पाहात आहे. कदाचित, हिरानंदानी किडनी रॅकेट हा या काळ्या धंद्याच्या हिमनगाचे एक टोक असेल, या धंद्याचा मोठा भाग दडलेलाच असल्याने तो किती विस्तारला आहे, हे अजून उजेडातही आले नसेल, पण जेव्हा कधी, आणि -जर कधी- ते उजेडात आलेच, तर समाजात कधी काही चांगले घडेल किंवा नाही याविषयीच्या शंकांचे मनामनावर दाटलेले मणामणांचे ओझे कदाचित आणखीच असह्य़ होईल. दान ही संकल्पना परमार्थाचे परमोच्च साधन मानली जाते. या संकल्पनेत निरपेक्षभाव अभिप्रेत असतानाही, ‘सर्वश्रेष्ठ दान’ किंवा ‘महादान’ म्हणून मोठय़ा गौरवाने ज्याचा उल्लेख केला जातो त्या अवयवदानाला मात्र, धंदेवाईकपणाची कीड लागली आहे. हिरानंदानी हे त्याचे एक ताजे उदाहरण. पण हा धंदेवाईकपणा काही प्रथमच उजेडात आलेला नाही. फसवणुकीने मूत्रपिंडे काढून घेऊन त्यांची विक्री करण्याची व त्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्या गरजू रुग्णांची अनेक प्रकरणे याआधीही उजेडात आली आहेतच. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा अशी प्रकरणे उघडकीस येतात, तेव्हा तेव्हा त्याची पाळेमुळे खणून काढण्याच्या प्रतिज्ञाही केल्या जातात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना, अधिक कडक कायदे अमलात आणण्याची ग्वाही समाजाला दिली जाते, काही दिवस याची चर्चा होत राहते आणि कालांतराने प्रकरणाची धग शमून ते शांत होत विस्मृतीच्या कप्प्यात जाऊन बसते. असा काही काळ जातो आणि पुन्हा एखादे नवे प्रकरण समोर येते व पुन्हा त्याच वल्गना, तीच आश्वासने बरसू लागतात.

हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटनंतर याच इतिहासाची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. गुरुवारी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अवयवदानाची राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याची घोषणा केली, त्याच वेळी हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेट प्रकरणात अटक झालेल्या पाच डॉक्टरांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले होते. त्याआधीच्या काही दिवसांतील घडामोडी तर नाटय़पूर्ण होत्या. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर समाज आणि वैद्यकीय व्यावसायिक यांच्यात एक अदृश्य तरीही स्पष्ट अशी दरी निर्माण झाली. अवैधपणे किडनी प्रत्यारोपणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही कारवाई होऊ  नये यासाठी वैद्यकीय व्यवसायातील काही दिग्गजांनी ज्या तऱ्हेने आपली प्रतिष्ठा रॅकेटबहाद्दरांच्या पाठीशी उभी करून दबावाची सारी हत्यारे उपसली, ते पाहता, वैद्यकीय व्यवसायाच्या सेवाभावाच्या प्रतिज्ञेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही संघटनांनी तर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया बंद करण्याचे इशारेच देऊन दबावाचा मार्ग चोखाळला. या इशाऱ्यावरून वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये मतभेद आहेत आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्याचे इशारे देणाऱ्या संघटनांचे कान तेथूनच पिळले जात आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाजू असली, तरी एखाद्या व्यवसायाची नैतिक प्रतिष्ठा आणि धंदेवाईक नीती यांतील भेद मात्र यातून अधोरेखित होऊ  पाहात आहे. शिवाय, अशा प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे, त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि त्याचा निवाडा करणाऱ्या न्यायव्यवस्था यांनाही ते एक आव्हानच ठरते. त्यामुळेच, दानाच्या संकल्पनेला काळे फासण्याच्या कृती आणि प्रवृत्तींना अगोदर आटोक्यात आणणे हे या व्यवस्थांसमोरील पहिले आव्हान ठरणार आहे. तसे झाले तरच अवयवदानामागील दानाच्या संकल्पनेचे पावित्र्य समाजाला पटविणे सोपे होईल, अन्यथा दात्याची भावना दानाची असली, तरी त्यातूनही धंद्याची बरकत शोधणाऱ्यांच्या जमातीच फोफावत जातील आणि दानाच्या संकल्पनेला लागलेली धंदेवाईक मानसिकतेची कीड कधीच नष्ट करता येणार नाही. अगोदरच, धंदेवाईकपणामुळे व्यावसायिक नीती खुंटीवर टांगल्याच्या आरोपातून वैद्यकीय व्यवसायाला मोठय़ा बदनामीचा सामना करावा लागत असताना, उजेडात येणाऱ्या अशा प्रकरणांत, तांत्रिक बाबींची ढाल करून तपासाच्या विरोधात उभे ठाकण्याने या व्यवसायाभोवतीच्या वादालाच आणखी खतपाणी मिळणार आहे. तसेही, व्यवसायातील तीव्र स्पर्धा, कमाईच्या रकमांची आखून दिली जाणारी उद्दिष्टे आणि त्यापायी कळत नकळत व्यावसायिक नैतिकतेचा दिला जाणारा बळी यांमुळे आरोग्यव्यवस्था संकटातच सापडली आहे. ज्याच्यावर विश्वासून आपल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मन मोकळे करावे अशी फॅमिली डॉक्टर ही व्यवस्था या जीवघेण्या व्यावसायिकतेनेच गिळून टाकली आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भात र्सवकष कायदा देशात अस्तित्वात आहे. मेंदूच्या मृतावस्थेतील रुग्णाच्या अवयवदानासंबंधीचे निर्णय घेण्याचे, त्याची शहानिशा करण्याचे व त्यानुसार अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणेची स्वयंस्पष्ट चौकट अस्तित्वात असतानाही त्या चौकटी मोडण्याचे धाडस करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोर कारवाईची गरज आता स्पष्ट झाली आहे. भारतात दर वर्षी पाच लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मरण पावतात. यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाख रुग्णांपैकी जेमतेम एक हजार रुग्णांना यकृतदानातून नवजीवन मिळते. तर किडनी प्रत्यारोपणासाठी सव्वादोन लाख रुग्ण प्रतीक्षा करीत आहेत, तर किडनीदात्यांची संख्या फक्त पंधरा हजारांच्या आसपास आहे. दहा लाखांहून अधिक नेत्ररुग्ण नेत्रदात्याच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा मागणी आणि पुरवठा यांमध्ये प्रचंड तफावत तयार होते, तेव्हा साहजिकच अशा टंचाईसदृश परिस्थितीत, पुरवठादाराचा भाव वधारतो. मग सौदेबाजी सुरू होते आणि कदाचित जाहिरातबाजी सुरू होऊन धंदेवाईकपणा बोकाळतो. मुंबईसारख्या महानगरात, केवळ व्यसनांच्या आहारी गेलेल्यांनी पैसे मिळविण्याचा मार्ग म्हणून रक्तदानासाठी रांगा लावल्याच्या बातम्या काही वर्षांपूर्वी गाजल्या होत्या. गरिबीचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्यांनी अवयवदानाचा मार्ग चोखाळल्याच्या बातम्याही अधूनमधून येतच असतात. प्रत्यारोपणातून नवजीवन मिळविण्याची आस असलेले व त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी असलेले रुग्ण वा त्यांचे नातेवाईक आणि आर्थिक गरजेपोटी अवयव विकायला काढणारे गरजू अशा दोन बाजू जेव्हा तयार होतात, तेव्हा दलालांची साखळी सक्रिय होते. पैसे मिळवून देणाऱ्या कोणत्याही धंद्यात हे होत असते. अनैतिक धंद्यांत हे प्रमाण थोडे अधिकच असते. त्यामुळेच, व्यावसायिक प्रतिष्ठेचे पांढरेशुभ्र अंगरखे अंगावर चढवून अनैतिक धंद्यांतील अशा साखळ्यांना बळ देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची पहिली गरज ओळखली पाहिजे. ते होत नसेल, तर महामेळावे भरवून किंवा महामिरवणुका काढून जनजागृती करण्याच्या महामोहिमा हीदेखील केवळ पैशाची उधळपट्टीच ठरेल व त्यामागील हेतूचे गांभीर्यच हरवून जाईल. असे प्रकार रोखण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती आपल्याकडे आहे व त्यासाठी हाती असलेले सारे बळ कठोरपणे वापरण्याचीही तयारी आहे, हे समाजाला दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे सरकारने ओळखले पाहिजे.

 

 

 

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand increasing in organ donation in india
First published on: 20-08-2016 at 02:56 IST