‘आपल्याच’ पक्षाचे मतदार आपल्याच विरोधात जातातच कसे, असा तिसऱ्या जगातील लोकशाह्य़ांना पडणारा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना भेडसावत आहे, तो का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर निवडणुकीच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प हा विषय संपायला हवा. तथापि, हिडीस शिमगा संपला तरी कवित्व रेंगाळावे त्याप्रमाणे पराभवानंतरही ट्रम्प आपल्या उद्योगांनी आपले हरणे किती आवश्यक होते हे दाखविण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. एरवी त्यांच्याबाबतच्या घडामोडींची दखल घेतली जाण्याची गरज नव्हती. पण विद्वेषाधारित राजकारणी जाता जातादेखील पक्षाचे किती नुकसान करू शकतो याचा नमुना ट्रम्प यांच्या या उद्योगांत असल्याने त्यांचा ऊहापोह करणे क्रमप्राप्त ठरते. असे करण्याचे दुसरे कारण म्हणजे, येत्या बुधवारी- ६ जानेवारीस अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडणुकीतील प्रतिनिधीवृंदाच्या मतांची मोजणी होईल. परंपरा अशी की, ही केवळ प्रक्रिया असते आणि त्यातून निवडणुकीच्या जाहीर निकालात फारसा बदल होत नाही. म्हणजे बुधवारच्या मतमोजणीत निर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता असायला हवी. पण त्यातही अडथळे आणण्याचे ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू असून, या निवडणुकीचा निकाल बुधवारच्या मतमोजणीत उलथून पाडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे हा सर्व विषय समजून घेणे गरजेचे ठरते.

अमेरिकी घटनेनुसार अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल दोन पातळ्यांवर मोजला जातो. त्यासाठी जनप्रिय मते (पॉप्युलर व्होट्स) आणि प्रतिनिधीवृंदाची मते (इलेक्टोरल कॉलेज) अशा दोन पातळ्यांवर मतदान होते. जनप्रिय मते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकडून होणारे मतदान. त्याचे मोल फक्त लोकप्रियता जोखण्यापुरतेच. म्हणजे केवळ जनप्रिय मतांवर अध्यक्ष निवडला जात नाही. त्यासाठी प्रतिनिधीवृंदातील बहुमत मिळणे महत्त्वाचे. तसे न झाल्याने २०१६ साली डेमोकॅट्रिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन दणदणीत जनप्रिय मते मिळूनही पराभूत झाल्या. कारण प्रतिनिधीवृंदाचा कौल रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने गेला. या प्रतिनिधीवृंदातील मतदार कोण, हे ठरवण्याचा अधिकार या दोन पक्षांचा. माजी अथवा राज्य/शहर पातळीवरचे राजकारणी वा लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी आणि इतकेच काय, पण अध्यक्षीय उमेदवारांचे निकटवर्तीय यांनाही प्रतिनिधीवृंदात मतदार म्हणून नोंदले जाते. मात्र विद्यमान काँग्रेसचे सदस्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी हे प्रतिनिधीवृंदात सहभागी होऊ शकत नाहीत. संपूर्ण अमेरिकेतील मिळून या प्रतिनिधीवृंदातील मतदारांची संख्या असते ५३८. त्यातून यशस्वी होण्यासाठी किमान २७० मते मिळणे आवश्यक. या वेळच्या निवडणुकीत विजयी जो बायडेन यांना प्रतिनिधीवृंदात ३०६ मते मिळाली, तर ट्रम्प यांना २३२ मतांवर समाधान मानावे लागले. ट्रम्प यांच्यासाठी ही बाब अधिक वेदनादायक अशासाठी, कारण गत निवडणुकीत बरोबर इतकीच मते ट्रम्प आणि क्लिंटन यांना मिळाली होती. फरक इतकाच की, त्या वेळी ट्रम्प यांच्या पारडय़ात ३०६ मते होती, तर हिलरी क्लिंटन यांना २३२. आताचे चित्र बरोबर त्याच्या उलट. म्हणजे राजकीय नियतीने ट्रम्प यांच्यावर एकाअर्थी उगवलेला सूडच हा.

हेच कटू सत्य ट्रम्प यांच्या अजूनही पचनी पडत नसून बुधवारची मतमोजणी हाणून पाडावी अथवा त्यातील मतदानात काही ना काही करून बदल करता यावा असा त्यांचा प्रयत्न आहे. वरवर पाहता तो हास्यास्पद आणि केविलवाणा असला तरी तो तितकाच धोकादायक आहे. या मतदानाचा अर्थ असा की, रिपब्लिकन पक्षाने ‘आपले’ म्हणून प्रतिनिधीवृंदात सहभागी करून घेतलेल्या मतदारांनीही ट्रम्प यांच्याकडे पाठ फिरवली. अमेरिकी लोकशाहीचे हे एक वैशिष्टय़ आणि मोठेपण. लोकप्रतिनिधींना पक्षादेशाच्या जोखडात बांधण्याची वेठबिगारी लोकशाही त्या देशात नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी विविध मुद्दय़ांवर स्वत:च्या पक्षाविरोधातही मतदान करू शकतात. हाच आपला अधिकार वापरून रिपब्लिकन पक्षाच्या अनेकांनी ट्रम्प यांच्या मागे उभे राहणे टाळले. ट्रम्प यांच्या रागाचे हे कारण आहे. ‘आपल्याच’ पक्षाचे मतदार आपल्याच विरोधात जातातच कसे, असा तिसऱ्या जगातील लोकशाह्य़ांना पडणारा प्रश्न ट्रम्प यांना भेडसावताना दिसतो. त्यातूनच हा गृहस्थ परिपक्व लोकशाहीसाठी किती अपरिपक्व आहे हे सिद्ध होते.

गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी याचीच आणखी एकदा जाणीव करून देणारे पाऊल उचलून ट्रम्प यांना हादरा दिला. त्या देशाच्या वार्षिक संरक्षण धोरणास नकाराधिकाराने रोखण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता. अमेरिकेतील डेमोकॅट्र्स आणि रिपब्लिकन अशा उभय पक्षांनी एकमताने मंजूर केलेल्या रिवाजानुसार त्या देशात दरवर्षी संरक्षण धोरण हे सीनेटमध्ये चर्चेस येते आणि त्यावर साधकबाधक चर्चा होऊन त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या/बदल करून उभयपक्ष ते मंजूर करतात. त्याच प्रथेप्रमाणे यंदाही हे धोरण चर्चेस आले. पण पराजयामुळे फुरंगटून बसलेल्या ट्रम्प यांनी नकाराधिकार वापरून ते अडवले. परिणामी संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अनेक धोरणात्मक मुद्दे अधांतरी लटकले. अखेर ट्रम्प यांच्या नकाराधिकारावरच सीनेटमध्ये मतदान झाले आणि अध्यक्षांच्या निर्णयास केराची टोपली दाखवण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. ट्रम्प यांच्या नकाराधिकारावर वरवंटा फिरवण्याच्या बाजूने ८१ मते पडली, तर ट्रम्प यांच्या बाजूने अवघी १३. खुद्द रिपब्लिकन पक्षानेही आपल्या या नेत्याविरोधात मत नोंदवले. इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांच्या या अशा वागण्यास आणि देशविरोधी कृतीस जास्तीत जास्त विरोध करून ती हाणून पाडायला हवी असे रिपब्लिकन पक्षाने सर्वानुमते ठरवले. हे म्हणजे ट्रम्प यांच्या निवडणुकीय जखमांवर मीठ आणि वर लाल तिखट चोळण्यासारखे. साहजिकच ट्रम्प यांच्या संतापाचा स्फोट झाला असून त्यानंतरचे त्यांचे ट्विटराविष्कार जगाने पाहिले. या मतदानात ट्रम्प यांचे कडवे समर्थक असलेले ओक्लाहोमाचे रिपब्लिकन सीनेटर जेम्स इनहोफ यांनी भर सीनेटमध्ये भाषण करून आपल्या पक्षबांधवांना ट्रम्प यांच्या विरोधात मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. त्याचा परिणाम झाला असणार. कारण ट्रम्प यांचे ऐकण्याऐवजी बहुसंख्य रिपब्लिकन सीनेटर्सनी त्यांच्या विरोधात मतदान केले.

या पाठोपाठ टेक्सासच्या न्यायालयानेही ट्रम्पसमर्थकांची नोव्हेंबरातील निवडणुकीचे निकाल रद्दबातल करण्याबाबतची याचिका फेटाळून लावली. टेक्सास हे प्राधान्याने रिपब्लिकन राज्य. बुश पिता-पुत्र हे टेक्सासचेच. या निवडणुकीतही ट्रम्प यांना टेक्सासने ५२ टक्के मते दिली. त्यामुळे ट्रम्प यांची त्या राज्यातील प्रतिनिधीवृंदाच्या ३८ मतांचीही बेगमी झाली. म्हणून या राज्यातील न्यायालयाकडून ट्रम्प यांना आशा होती. त्यासाठी ट्रम्प यांच्या समर्थकांनी निवडणूक निकालाविरोधात याचिका दाखल करून हा निकाल उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. उपाध्यक्ष माइक पेन्स यांना या खटल्यात प्रतिवादी करून त्यांच्याकरवी हे काम करण्याचा ट्रम्पसमर्थकांचा कावा. त्यासाठी या समर्थकांनी शंभर वर्षे जुन्या एका कायद्याचा आधार घेऊन चलाखी केली. तथापि,

न्या. जेरेमी केरनॉडल यांनी ती ओळखली आणि अशा प्रकारची मागणी करण्याचा अधिकार अर्जदारांना नाही, असे स्पष्ट करत ही याचिका फेटाळून लावली. मधल्या मध्ये पेन्स यांचे मात्र हसे झाले. आपल्या अध्यक्षाच्या दुराग्रहासमोर मान तुकवावी की देशाचे व्यापक हित लक्षात घेऊन काहीएक स्पष्ट भूमिका घ्यावी, हे न सुधरल्याने महासत्तेचे हे उपाध्यक्ष किंकर्तव्यमूढ होऊन गेले.

परंतु रिपब्लिकन पक्षाचा सामुदायिक विवेक काही प्रमाणात आणि न्यायालयाचा पूर्णपणे शाबूत असल्याने पेन्स यांच्यावरचा अनवस्था प्रसंग टळला आणि अमेरिकी लोकशाही अधिक झळाळून निघाली. इतकी छीथू झाल्याने रिपब्लिकन पक्षात आता मोठी चलबिचल दिसते. ट्रम्प यांचे हे झेंगटे खांद्यावरून कधी एकदा उलथून टाकता येईल असे त्या पक्षातील विवेकींना झाले आहे. तथापि, लोकशाहीतही साध्या वेशातील हुकूमशाही प्रवृत्तींना काही प्रमाणात का असेना पाठिंबा असतोच. रिपब्लिकन पक्षात तसा तो काहीसा अजूनही ट्रम्प यांना आहे. परिणामी हा पक्षच दुभंगल्याचे चित्र सामोरे येते. हे त्या पक्षाचेच पाप. स्वपक्षातील आत्मकेंद्री, अतिरेकी नेत्यास वेळीच आवर घातला नाही तर पुढे काय होते, याचा हा धडा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump us election 2020 mppg
First published on: 04-01-2021 at 01:47 IST