‘मी मुसलमान वा ख्रिश्चन नाही. मी पत्रकार आहे आणि जो कोणी सत्ताधीश, सामर्थ्यवान असेल..  त्यांना प्रश्न विचारणे हे माझे धर्मकृत्य’- रॉबर्ट फिस्क

चांगला पत्रकार हा इतिहासाचा साक्षीदार, भाष्यकार आणि किती चांगला काळ-निरूपणकार होऊ शकतो याचा धडा रॉबर्ट फिस्क आपणास घालून देतात..

Rani Mukerji reacts on feud with sister Kajol
“मतभेद सर्वत्र होतात, पण…”, काजोलबरोबरच्या वादावर स्पष्टच बोलली राणी मुखर्जी; दोघींचं नातं काय? जाणून घ्या
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…

‘‘पश्चिम आशियाचे इतिहास कथन मला भेटल्याखेरीज पूर्ण होऊ शकत नाही,’’ असे साक्षात ओसामा बिन लादेन यास ज्यांच्याबाबत वाटले ते रॉबर्ट फिस्क वयोमानपरत्वे उद्भवणाऱ्या आजारातून मायदेशी आर्यलड येथे सोमवारी निवर्तले. पश्चिम आशियावर प्रेम करणाऱ्या कोणालाही रॉबर्ट फिस्क यांना वगळून पुढे जाता येणार नाही. या प्रदेशातील अथांग वाळवंट, त्या वाळवंटाखाली दडलेले तितकेच अथांग तेल, यातून उद्भवलेल्या संघर्षांचे वर्तमान एका बाजूला आणि दुसरीकडे मानवी संस्कृतीचा भव्य आणि शोकात्म इतिहास. या सगळ्याची जाणीव असल्याखेरीज या परिसरातील घडामोडी समजून घेता येत नाहीत आणि त्यांचा अन्वयार्थ समजायला लागला की त्या परिसरावर प्रेम जडल्याखेरीज राहात नाही. रॉबर्ट फिस्क हे असे या परिसराच्या प्रेमात पडलेले होते आणि या परिसराविषयीचे गैरसमज दूर करीत अनेकांना आपल्याप्रमाणे त्याविषयी प्रेमाकर्षण वाढवण्याचे काम इमानेइतबारे करीत होते. फार कमी भाग्यवंत असे असतात की त्यांची प्रेमाराधना हाच पोटापाण्याचा व्यवसाय असतो. फिस्क अशा काहींतील एक. व्यवसायाने पत्रकार. इंग्लंड- आर्यलड ही जन्मभूमी. पण कर्मभूमी मात्र पश्चिम आशियातील रखरखीत वाळवंट. जवळपास चार दशके त्यांनी या परिसरातून बातमीदारी केली. आपल्याला आयुष्यात असा एक तरी प्रसंग अनुभवता यावा अशी इच्छा जातिवंत पत्रकारांना ज्या घटनांबाबत असते तशा डझनभर, वा अधिकच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे, रॉबर्ट फिस्क हे साक्षीदार होते. पण तितकेच त्यांचे महत्त्व नाही. इतिहास घडवणाऱ्या या सर्व घटनांचे उत्तम भाष्यकार ही त्यांची खरी ओळख. त्यांच्या निधनानंतर तरी त्यांच्या कार्याची महती समजून घ्यायला हवी.

आयरिश/ ब्रिटिश पत्रकारांना मुळातच स्थानमाहात्म्याची एक आघाडी मिळालेली असते. फिस्क यांनाही ती मिळाली. उत्तर आर्यलड ज्या वेळी वांशिक वादात आणि हिंसाचारात होरपळत होते त्या वेळी ‘द टाइम्स’साठी त्यांना बेलफास्ट येथून बातमीदारीची संधी मिळाली. ‘आयआरए’चा हिंसाचार हा त्या वेळी जगात गाजत होता. (या समस्येवरचा ‘मायकेल कॉलिन्स’ हा नितांत सुंदर चित्रपट अनेकांच्या स्मरणात असेल.) फिस्क यांनी त्याचे वार्ताकन केले. सत्तरच्या दशकातील पोर्तुगालमधील बंड आणि नंतरची अस्थिरता त्यांना अनुभवता आली. त्यानंतर मात्र आयुष्याच्या अखेपर्यंत फिस्क एकाच परिसरात ठाण मांडून राहिले. तो म्हणजे पश्चिम आशिया. १९७९ सालच्या ऐतिहासिक घटनेचे- म्हणजे तोपर्यंत पॅरिसमध्ये निर्वासित असलेले अयातोल्ला रूहल्ला खोमेनी आपली मायभूमी इराणमध्ये जेव्हा अवतरले तेव्हा- फिस्क तेथे होते. खोमेनी यांचा इराणप्रवेश, शहा महंमद रझा पेहलवी यांचे पलायन, नंतरची ‘इस्लामी क्रांती’, तेहरानमधील अमेरिकी दूतावासातील ओलीस नाटय़ आणि नंतर दशकभर चाललेले इराण-इराक युद्ध या साऱ्या घटनांचे फिस्क हे जिवंत साक्षीदार आणि त्याचे रसरशीत बातमीदार. त्या वेळी अमेरिकी नौदलाकडून एक प्रवासी विमान ‘चुकून’ पाडले गेले. त्यात ३०० प्रवाशांनी हकनाक प्राण गमावले. त्यातील अमेरिकी बेदरकारपणाचा तपशील देणारी फिस्क यांची बातमी एव्हाना ‘टाइम्स’ची मालकी ज्यांच्याकडे आली त्या रूपर्ट मर्डॉक यांनी दाबली. त्याचा निषेध म्हणून फिस्क यांनी ‘टाइम्स’ सोडून ‘द इंडिपेंडंट’ची कास धरली ती शेवटपर्यंत.

नंतर लेबनॉन, बैरूत, सीरिया अशा अनेक धगधगत्या वृत्तकुंडांकडे फिस्क आकर्षित झाले. या सर्व इतिहासावर थॉमस फ्रीडमन यांचे ‘फ्रॉम बैरूत टु जेरुसलेम’ गाजण्याआधी त्या जिवंत, दाहक वर्तमानाचे उत्कृष्ट वार्ताकन आणि त्यावरील पुस्तक (‘पिटी द नेशन’) हे फिस्क यांचे आहे. अलीकडच्या काळात पश्चिम आशियाच्या बातमीदारीची एक सुरक्षित पद्धत बनून गेली आहे. दुबईत बसायचे आणि परिसरावर लिहायचे. फिस्क यांनी या पत्रकारितेचे वर्णन ‘हॉटेल रिपोर्टिग’ असे केले आहे. त्यांना ही कातडीबचाऊ पत्रकारिता अजिबात मान्य नव्हती. ती त्यांनी कधीही केली नाही. अफगाणिस्तानात बातमीदारी करताना गोऱ्या वर्णामुळे ते त्या देशातून पळून जाऊ पाहणाऱ्या निर्वासितांच्या तावडीत सापडले. फिस्क यांचा जीवच जायचा. पण त्यातीलच काही अफगाणांना हे ‘त्यातले’ नाहीत हे उमगल्यावर त्यांनी फिस्क यांचा जीव वाचवला. या प्रसंगावर भाष्य करताना फिस्क एका अक्षराने अफगाणांना बोल लावत नाहीत. ‘‘पाश्चात्त्यांनी जसे त्यांना वागवले तसेच ते पाश्चात्त्यांशी वागणार’’ ही फिस्क यांची प्रतिक्रिया.

यावरून फिस्क यांनी कोणाच्या नजरेतून या परिसराची बातमीदारी केली हे ध्यानात येईल. ऑटोमन साम्राज्य लयाला गेल्यानंतर पाश्चात्त्यांनी या परिसरावर कमालीचा अन्याय केला आणि तेलासाठी तर या परिसरावर अत्याचारच केले, असे त्यांचे अभ्यासांती मत बनले होते. त्यामुळे इस्रायलचा लबाड हिंसाचारही त्यांनी तितक्याच प्रामाणिकपणे मांडला. त्या देशाने सुयोग्य प्रचार आणि प्रोपगंडा यांच्या आधारे स्वत:विषयी ‘बिचारा इस्रायल’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. पण वास्तव समजून घेण्यासाठी फिस्क यांच्यासारख्यांची साधना कामी येते. हे वास्तव समजून सांगण्याशी फिस्क यांनी कधीही तडजोड केली नाही. मग समोर ओसामा बिन लादेन असो की अमेरिका वा इंग्लंड यांचा कोणी सत्ताधीश. ओसामा याने तर फिस्क यांना धर्मातराची लालूच दाखवली. ओसामाच्या सर्वाधिक मुलाखती फिस्क यांच्या नावे असाव्यात. त्यातील काही तर ओसामाच्या ‘गुहेत’ जाऊन घेतल्या गेल्या आहेत. अशाच एका मुलाखतीप्रसंगी फिस्क यांना खिंडीत पकडत ओसामाने फिस्क यांनी धर्मातर करावे असे सूचित केले. ‘‘तुमच्यात एक मला सच्चा मुसलमान दिसतो,’’ अशी साखरपेरणी करीत ओसामाने फिस्क यांच्या धर्माबाबत विचारणा केली. त्यावर फिस्क यांचे उत्तर हे आजच्या काळात दीपस्तंभ ठरेल : मी मुसलमान वा ख्रिश्चन नाही. मी पत्रकार आहे आणि जो कोणी सत्ताधीश, सामर्थ्यवान असेल- यात तुम्हीही आलात- त्यांना प्रश्न विचारणे हे माझे धर्मकृत्य. त्यामुळे माझा धर्म कोणता यास काहीच अर्थ नाही.

म्हणूनच ‘तटस्थ पत्रकारिता’ हे एक थोतांड आहे, असे फिस्क मानत. या शब्दप्रयोगाची त्यांना मनस्वी चीड होती आणि ती त्यांनी अनेकदा व्यक्त केली. ‘‘प्रत्येकास प्रश्न विचारणे हे आपले काम. जो अधिक सामर्थ्यवान त्यास अधिक प्रश्न आणि अधिक कडवे प्रश्न. हे जर आपले कर्तव्य असेल तर त्याच्या पूर्तीसाठी अशक्तांची बाजू घेणे हे आवश्यकच,’’ असे म्हणत फिस्क ‘तटस्थ’ पत्रकारितेचे समर्थन करणाऱ्यांस खोडून काढत. प्रत्यक्ष सत्ता आणि सत्ताकेंद्रे यावर अंकुश ठेवणे हे(च) पत्रकाराचे खरे काम आहे असे फिस्क मानत. त्यांच्या सत्ताकेंद्राच्या व्याख्येत ओसामासारख्या व्यक्तीही येत ही बाब उल्लेखनीय. फिस्क यांच्या या सच्च्या बातमीदारीने पश्चिम आशियाच्या अनेक संघर्षांत पाश्चात्त्य देशांची धोरणेच खोटी पडली. पण फिस्क यांनी आपला बाणा सोडला नाही. चूक आपल्या मायभूमीची आहे, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करावे अशी चलाखी त्यांनी कधीही केली नाही. आपली बांधिलकी ही पत्रकारितेशी आहे, अन्य कशाशी नव्हे हे त्यांच्या पत्रकारितेतून दिसते.

म्हणूनच त्यांचे लिखाण वाचणे हे आनंदाइतकेच भान आणणारे असते. त्यांचे ‘काँक्वेस्ट ऑफ द मिडलईस्ट’ हे जवळपास दीड हजार पानी पुस्तक जरी वाचले तरी त्यांची साधना लक्षात येऊन त्यांच्याविषयीचा आदर दृढ होईल. चांगला पत्रकार हा इतिहासाचा साक्षीदार, भाष्यकार आणि किती चांगला काळ-निरूपणकार होऊ शकतो याचा धडा न शिकवताही फिस्क आपणास घालून देतात. पश्चिम आशियातील त्यांची बातमीदारी याची साक्ष आहे. तेथील वाळवंटाच्या या वाग्गेयकारास मन:पूर्वक आदरांजली.