अस्सल धनवानांच्या साधेपणात एक सहजसौंदर्य असते आणि ते जीवन-विन्मुख नसतात. राहुल बजाज यांचा साधेपणा असा सहज होता..

सरकार मनमोहन सिंगांचे असो की आताचे- जे खटकणारे आहे, ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले..

देशाचे गृहमंत्री साक्षात अमित शहा यांना ‘तुमच्या राज्यात दहशतीचे वातावरण आहे’ असे सुनावण्याची हिंमत असलेले राहुल बजाज हे प्रस्थापित उद्योगपतींतील बंडखोर. ही बंडखोरीची खुमखुमी बहुधा त्यांच्यात मराठी संबंधांतून आली असावी. असे काही केल्याखेरीज त्यांना स्वस्थ बसवत नसे. आपल्या उद्योगपतींच्या सतत सत्ताशरण जगात आपण एकटे पडतो याचीही जाणीव त्यांना असे. ‘मला बळी जाताना पाहणे तुम्हास आवडते’ असे आपल्या सहव्यावसायिकांनाही सुनावण्यास ते कमी करीत नसत. तीन वर्षांपूर्वी २०१९ साली आर्थिक दुर्गतीसाठी सरकारी धोरणांस जबाबदार धरण्याच्या धाडसी कृत्यानंतर तेच झाले. या प्रसंगी उपस्थित असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजाज यांची टीका ही ‘राष्ट्रविरोधी भावनांस’ कशी खतपाणी घालू शकते अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर आपली सुरक्षा हीच देशाची सुरक्षा असे मानणाऱ्या अन्य उद्योगपतींनी सीतारामन यांच्या सुरात सूर मिसळला. पण तरीही राहुल बजाज डगमगले नाहीत. ‘आम्ही देशविरोधी नाही, तुमच्या इतकेच देशप्रेमी आहोत.’ असे बाणेदार उत्तर या उद्योगपतीने दिले आणि वर करोना-कालीन टाळेबंदी लादून अर्थविश्वाचा गळा घोटू नका असेही सुचवले. त्यानंतर समाजमाध्यमांतील बिनडोक जल्पकांच्या झुंडींनी त्यांच्याविरोधात रान उठवले. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरणलकव्याविरोधात आवाज उठवणारेही राहुल बजाज होते, याचा सर्वानाच सोयिस्कर विसर पडला. तरीही त्याची आठवण करून देण्याची गरज राहुल बजाज यांना वाटली नाही. हे असे एकटय़ाने, ठामपणे, स्वत:वर पूर्ण विश्वास दाखवत उभे राहणे हे त्यांच्या मोठेपणाचे एक इंगित.

अन्यथा अमेरिकेत हार्वर्डला शिकून आलेले, संपूर्ण शहरी तोंडवळा असलेले नवविवाहित राहुल यांनी आकुर्डीसारख्या तत्कालीन ओसाड परिसरास आपले घर मानले नसते. आजही जातिवंत पुणेकर शहराची हद्द शनिवारवाडय़ाशी संपते असेच मानतो. शहरातून पिंपरी आदी परिसरात बदली झाल्यास त्याचे प्राण कंठाशी येतात. अशा वेळी ५५ वर्षांपूर्वी, १९६५च्या आगेमागे मुंबईतील सुखासीन आयुष्य सोडून ‘बजाज ऑटो’ घडवण्यासाठी राहुल यांनी त्या वेळी गावठाणही नसलेल्या, माळरानी आकुर्डीतील कारखान्यालाच आपले घर मानले. वास्तविक मुंबईत राहून जा-ये करण्याची सुविधा त्यांना होती. पण मी माझ्या कामगारांजवळच राहणार ही त्यांची इच्छा. तेथेच, कंपनीच्या आवारातच त्यांनी घर बांधले आणि राहुल-रूपा हे पतीपत्नी कामगारी वातावरणातच रमले. तीन तीन पाळय़ांत सुरू असणाऱ्या कारखान्याच्या परिसरालाच घर मानणे हे आज वाटते तितके सोपे नाही. ते याबाबत इतके ठाम होते की पुण्यात राहण्याचा शिष्टसंमत पर्यायही त्यांनी निवडला नाही. त्यांच्या पत्नी रूपा या मराठी. ‘आयसीएस’ अधिकाऱ्याची कन्या. त्यांची मध्यमवर्गीय मूल्ये त्या कमलनयन बजाज यांची सून झाल्यावरही कायम होती. त्याचमुळे राजीव, संजीव आणि कन्या सुनयना या त्यांच्या अपत्यांचेही बालपण मराठी वातावरणातच गेले आणि त्याचा कोणताही कमीपणा या कुटुंबास वाटत नाही. हे सर्वच उत्कृष्ट मराठी बोलतात आणि नाटय़गीतेही ऐकतात. छटाकभर यशाने हुरळून जात आपली मातीशी असलेली नाळ नाकारणारे आसपास उदंड असताना देशातील दुचाकी उद्योगाच्या या एकेकाळच्या अनभिषिक्त सम्राटाचे ‘जसा आहे तसा’च दाखवणारे वर्तन लोभस होते. हे झाले व्यक्तिगत.

उद्योगपती म्हणून राहुल बजाज त्या काळाच्या पुढे होते. समाजवादी वातावरणात मुळात उद्योग स्थापणेच अवघड. सर्व कायदेकानूंचे पालन करण्यातच रक्त आटत असे. अशा वातावरणात वडिलांचा हात सोडून राहुल यांनी दुचाकी आणि तिचाकी वाहनांची मुहूर्तमेढ रोवली. कमी किंमत आणि उत्तम दर्जा हे त्यांच्या वाहनांचे वैशिष्टय़. वास्तविक दुचाकी आणि तिचाकी बाजारात त्यांची मक्तेदारी होती. तिचा फायदा घेत त्यांना वाटेल तशी किंमतवाढ करता आली असती. तसे त्यांनी केले नाही. त्यामुळेच मक्तेदारीविरोधातील सरकारी खात्यास १९७१ सालीदेखील राहुल बजाज यांच्या उद्योग व्यवहाराचे कौतुक करावे लागले. त्या वेळी ‘बजाज’ची ‘प्रिया’ स्कूटर मध्यमवर्गाची प्रगती निदर्शक होती तर ‘चेतक’धारी घर हे प्रगती साध्य केलेल्यांचे चिन्ह होते. हा ‘मारुती’ वाहनांच्याही आगमनाआधीचा काळ. पेडल मारत सायकल आणि आयुष्य ढकलणाऱ्या मध्यमवर्गास राहुल यांच्या स्वयंचलित दुचाकींनी गती दिली. त्याकाळी मालकीची स्कूटर असणे हेदेखील स्वप्न असे. राहुल बजाज हे या मध्यमवर्गीय स्वप्नांचे सौदागर. या स्वप्नांच्या पंखावर प्रगतीची शिडी चढलेल्या त्याच मध्यमवर्गातील विचारशून्यांनी अलीकडच्या काळात पुण्याच्या केविलवाण्या सार्वजनिक वाहतुकीचे खापर राहुल बजाज यांच्यावर फोडायला सुरुवात केली होती. ही सरकारवर बजाज यांनी केलेल्या टीकेची शिक्षा. मेंढरीमानसिकतेत सामील न होणाऱ्या प्रत्येकालाच ती आपल्याकडे भोगावी लागते.

पण त्याबद्दल राहुल यांची तक्रार नव्हती. महात्मा गांधींचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांचे हे नातू. जमनालाल यांना दोन मुलगे. कमलनयन आणि रामकृष्ण. जमनालाल वयाच्या ५२ व्या वर्षीच गेले. त्यांची दोन्ही मुले आधी महात्मा गांधी आणि नंतर विनोबा भावे यांच्या संस्कारसावलीत वाढलेली. जमनालाल यांनी आपले सारे काही गांधीचरणी अर्पण केलेले. म्हणजे बजाज समूहाचा उद्योगविस्तार हा स्वातंत्र्यानंतरचा. आज खासगी क्षेत्रातील सर्वात यशस्वी साखर कारखान्यापासून वित्तसेवेपर्यंत अनेक क्षेत्रांत बजाज समूह अत्यंत यशस्वींत गणला जातो. त्याचे श्रेय या सर्वाच्या गांधीवादी मूल्यांत आढळेल. नफा हवा, पण ग्राहकांची मान मुरगाळून नाही, तो आपल्या उत्पादन दर्जातून यावा यावर या सर्वाचा विश्वास. अस्सल धनवानांच्या साधेपणात एक सहजसौंदर्य असते आणि ते जीवन-विन्मुख नसतात. जेआरडी टाटा, रतन टाटा ही या अशा बलाढय़ांच्या साधेपणाची अन्य काही उदाहरणे. यांच्याप्रमाणेच राहुल बजाज आणि आता राजीव-संजीव यांचा साधेपणा असा सहज आहे. गांधीवादी म्हटले की सौंदर्यासक्तीस नाक मुरडणारे असा एक समज आपल्याकडे आहे. तो चुकीचा कसा, याचे बजाज कुटुंबीय हे उदाहरण. उद्योगसाम्राज्य उभारताना मुंबईत कलादालन निर्माण करण्याइतकी रसिकता या कुटुंबाने दाखवलेली आहे.

म्हणून राहुल बजाज यांचे सर्व काही निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. १९९१ नंतर भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले असता मर्यादित नियंत्रणवादाचे समर्थन करणारा उद्योगपतींचा एक गट त्या वेळी सक्रिय होता. ‘बॉम्बे क्लब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटाचे राहुल हे म्होरके. ‘बॉम्बे डाईंग’चे नुस्ली वाडिया आदींचा सहभाग असलेल्या हा क्लब परदेशी उद्योगांस भारतात मुक्त प्रवेश दिला जाऊ नये या मताचा होता. म्हणजे सरकारचे नियंत्रण नको, पण म्हणून परदेशी उद्योगांचे आपल्याला न झेपणारे आव्हानही नको असे या गटाचे मत. देशांतर्गत बाजारात मक्तेदारी असलेल्या काही माध्यमगृहांनीही त्याचे समर्थन केले. हा खरेतर विरोधाभास. त्याच्या मुळाशी या उद्योगपतींस सुरुवातीच्या काळात भोगाव्या लागलेल्या यातना असतीलही. पण त्या काळात संधी असतानाही राहुल बजाज यांनी स्वत: मक्तेदारीचा मोह टाळला. पण आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र असमान स्पर्धा नकोशी वाटू लागली.

कोणाही सक्रियाच्या आयुष्यात विरोधाभास असतातच. राहुल बजाज त्यास कसे अपवाद असणार? त्यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडू गेल्यास या विरोधाभासांचा आकार अगदीच नगण्य असा. आपल्या उद्योगविश्वास फारशी न जमणारी आणखी एक गोष्ट राहुल बजाज यांनी सहज करून दाखवली. ती म्हणजे आपल्या हयातीतच आपल्या उद्योगांची दोन मुलांत वाटणी. अर्थसेवाविषयक उद्योग संजीव यांच्याकडे गेले तर दुचाकी आणि अन्य वाहन उद्योगांची धुरा राजीव यांच्याकडे आली. आज या दोन्हीही शाखांस नफ्याच्या भरघोस लोंब्या लगडलेल्या दिसतात. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याच हाताने वाटण्या करून आपल्या चिरंजीवांचे बहरणे पाहण्याचे भाग्य राहुल बजाज यांस लाभले. त्यांची सहचारिणी रूपा या काही वर्षांपूर्वी निवर्तल्या. शनिवारी राहुल बजाज यांच्या परिपूर्ण आयुष्याची अखेर झाली. प्रस्थापितांतील या बंडखोरास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.